भाऊ, राज्यात काय होईल? कोण जिंकेल?
By यदू जोशी | Published: May 24, 2024 09:55 AM2024-05-24T09:55:59+5:302024-05-24T09:57:53+5:30
सगळ्या प्रमुख पक्षांच्या ताटात थोडेथोडे पडेल, एक ताट पंचपक्वान्नाचे तर दुसरे ताट रिकामे अशी स्थिती नसेल, असे एकूण चित्र दिसते आहे!
यदु जोशी, सहयोगी संपादक, लोकमत
महाराष्ट्रातील चावडीवर, गल्लीगुल्लीत, सरकारी कार्यालयांमध्ये सध्या हाच विषय चर्चेचा आहे. प्रत्येक जण विचारत आहे की भाऊ, काय होईल? कोण जिंकेल? सोशल मीडियाने प्रत्येकालाच पत्रकार आणि विश्लेषक बनविले आहे. जितकी माणसे तितके तर्क दिले जात आहेत. बहुतेक सगळ्या लढती अटीतटीच्या झाल्या आहेत. रामदास आठवलेंची भाषा वापरायची तर, ‘निवडणूक झाली आहे घासून, कोणीच सांगू शकत नाही ठासून’.
दोनचार जण सोडले तर लाखा-लाखाच्या फरकाने महाराष्ट्रात कोणी निवडून येणार नाही असे वाटते. महाराष्ट्राची स्वत:ची हवा असते, दक्षिणकडून आलेल्या हवेचा परिणाम इथे होत नाही, उत्तरेकडून धडकणारे वारेही चालत नाहीत इथे. आपल्याकडे निवडणूक पाच टप्प्यांमध्ये झाली; पण पाच वेगवेगळी समीकरणे नव्हती, प्रत्येक मतदारसंघाचा वेगळा हिशेब होता. त्यामुळेच अख्ख्या महाराष्ट्रासाठीचे एकच विश्लेषण करणे कठीण आहे. वर्धेचे गणित वेगळे होते, बाजूच्या चंद्रपूरचे वेगळे होते. बुलढाण्यात जे झाले त्याचा अकोल्याच्या राजकीय स्थितीचा संबंध नव्हता. ठाण्याचे विषय वेगळे होते अन् बाजूच्या भिवंडीत वेगळेच घडत होते.
नेत्यांपेक्षा लोकशक्ती मोठी असते, ही लोकशक्ती महाराष्ट्रात यावेळी अव्यक्त होती आणि तिने नेत्यांना गोंधळात टाकले आहे. विदर्भात शेतमालाच्या भावाचा मुद्दा होता, मराठवाड्यात मराठा आंदोलनाचा सर्वात मोठा परिणाम होता. मुंबईत भाजप-शिंदे विरुद्ध ठाकरे होते. बारामतीत पवार विरुद्ध पवार होते. या सगळ्यांचा निकालावर परिणाम झाला तर महायुतीला ४१ चा गेल्यावेळचा आकडा गाठणे कठीण आहे; पण मोदी फॅक्टर या सगळ्यांच्याही वर असेल तर महायुतीत जल्लोष राहील!
एकंदरीत राज्यात सगळ्यांनाच कमी-जास्त जल्लोष करायला मिळेल, असे वाटते. मोदींच्या नावावर कोणीही चालून जाईल, असे समजून ज्यांना उमेदवारी दिली त्यातले काही आपटतील. सगळ्या प्रमुख पक्षांच्या ताटात थोडेथोडे पडेल, एक ताट पंचपक्वान्नाचे तर दुसरे ताट रिकामे असे होणार नाही. मोदी उद्या पंतप्रधान झाले तरी त्यात महाराष्ट्राचे योगदान गेल्यावेळेइतके भक्कम नसणार असे संकेत मिळाले आहेत. ४ जूनला निकाल येईल, ‘कही खुशी, कही गम’ असेल; पण निकालाचा गुलाल उधळताना सामाजिक सौहार्दही टिकेल, याची काळजी घ्या. कारण महिना-दीड महिन्याच्या प्रचारात एकमेकांना जिव्हारी लागतील, असे अनेक विषय अनेकांकडून झाले आहेत. त्याचे पडसाद निकालानंतर उमटू देऊ नका एवढेच!
अजितदादांचे काय सुरू आहे?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपसोबत मिसळले. पाण्यात साखर विरघळावी तसे नाही; पण बरेचसे मिसळले. अजित पवारांचे मात्र अजूनही तसे होऊ शकलेले नाही. सोबतच्या काही जणांची पूर्वीची नाळ अजून तुटलेली नाही.
प्रचार ऐन भरात असताना शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना सहानुभूती मिळत असल्याचे विधान मंत्री छगन भुजबळ यांनी केले. एक धनंजय मुंडे तेवढे पंकजा मुंडेंसाठी दिवसरात्र एक करत होते, तेवढे अजित पवारांच्या अन्य मंत्र्यांबाबत ठळकपणे जाणवले नाही. हसन मुश्रीफ कोल्हापूरची निवडणूक संपल्याबरोबर श्रमपरिहारासाठी विदेशात निघून गेले. अजित पवारांच्या आमदारांचे प्रमुख कार्यकर्ते दिंडोरी मतदारसंघात शरद पवार गटाचे काम करत असल्याच्या तक्रारी भाजप, शिंदेसेनेकडून झाल्या. रोहित पवार अजितदादांवर आरोप करत असताना त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठीची आघाडी अजित पवारांसोबतच्या तरुण मंत्र्यांनी सांभाळल्याचे दिसले नाही.
कायमचे वैर होईल इतके ताणायचे नाही असे अंडरस्टँडिंग दोन्ही गटांमध्ये दिसते. शिवाजी पार्कवरील मोदींच्या सभेला अजित पवार गेले; पण बाकी शिंदेंच्या उत्साहाने ते महायुतीसाठी प्रचाराला भिडले नव्हते. ते बरेच दिवस बारामतीत अडकून पडले. त्यांच्याकडून अपेक्षित सहकार्य मिळाले नसल्याची भाजपची भावना असून ती दिल्लीला कळविली जाणार असल्याचे कळते.
प्रचारकाळात अजितदादा आजारी पडले. आश्चर्य म्हणजे ते आजारी असल्याचा खुलासा शरद पवार यांनी केला. अशा घटनाक्रमातूनच मग संशय वाढत जातो. मोक्याच्या वेळी अजितदादा आजारी पडतात, हा अनुभव असल्याने त्यांचा आजार राजकीय असतो, अशी टीका होते. त्यांचे आमदार सहा महिन्यांनी आपल्या विधानसभा निवडणुकीचा विचार करून लोकसभेच्या प्रचारात वावरले, हेही काही ठिकाणी जाणवले.
शिंदेसेनेला १५ पैकी किती जागा मिळतील, हा भाग अलाहिदा पण युतीधर्म पाळत त्यांनी भाजपसाठीही तेवढीच मेहनत घेतली याची नोंद दिल्लीत नक्कीच होईल. आम्ही कोणत्याही परिस्थितीत दहाच्या खाली येणार नाही, असे शिंदे खासगीत सांगत आहेत. अजितदादा प्रचारात महाराष्ट्रभर फिरले नाहीत की भाजपचीच तशी इच्छा नव्हती, हाही प्रश्न आहेच. भाजपच्या परंपरागत मतदारांना अजित पवारांना सोबत घेणे फारसे रुचलेले नाही, तेव्हा त्यांना महाराष्ट्रभरात न फिरवलेलेच बरे, असा विचार तर भाजपमधील काही नेत्यांनी केला नव्हता?- ते भाजपपासून अंतर राखून होते की भाजप त्यांच्यापासून?
जाता जाता : नाशिकमध्ये उद्धवसेनेकडून ज्यांना उमेदवारी मिळणार अशी सुरुवातीपासून चर्चा होती, त्यांना ती मिळाली नाही आणि सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजेंना उद्धव ठाकरेंनी उमेदवारी दिली. ज्यांचे नाव आधीपासून चर्चेत होते त्यांनाच उद्धव यांनी संधी दिली असती तर तिथे सुरत पॅटर्न घडला असता, असे म्हणतात. याची कुणकुण मातोश्रीला लागली आणि जवळपास ठरलेल्या नावाऐवजी वाजे उमेदवार झाले, अशी चर्चा आहे.
yadu.joshi@lokmat.com