- अच्युत गोडबोले (अर्थतज्ज्ञ)लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून या वर्षीचा अर्थसंकल्प तयार करण्यात आला आहे़ सर्वसामान्यांना खूश करण्यासाठी हा अर्थसंकल्प तयार केला आहे की खरोखरच तो गरिबांना फायदेशीर ठरणार आहे हे येणारा काळच ठरवेल़ कारण या अर्थसंकल्पात ज्येष्ठ नागरिकांसाठी केलेल्या तरतुदी खूपच चांगल्या आहेत़ रेल्वे स्थानकांवर सरकते जिने उभारण्याचा उपक्रमही प्रवाशांच्या हिताचा आहे़ मात्र २०२२ पर्यंत शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट करू ही घोषणा प्रत्यक्षात खरी होईल का, याबाबत सध्या तरी साशंकताच आहे़ याआधीही सरकारने ही घोषणा केली होती़ शेतकºयांचे उत्पन्न महागाई वजा करून वाढेल की महागाईचा दर धरून त्यांचे उत्पन्न वाढलेले असेल हे सरकारने स्पष्ट केलेले नाही़ महागाईचा दर धरून उत्पन्न वाढणार असेल तर त्याचा फायदा निश्चितच शेतकºयांना होणार नाही़ महागाईचा दर वजा करून उत्पन्न वाढणार असेल तर ते शेतकºयांना लाभदायी ठरेल़ त्यामुळे शेतकºयांच्या उत्पन्नवाढीची घोषणा पूर्ण स्पष्ट व्हायला हवी़ तसेच शेती उत्पादनवाढीचा दर गेल्या तीन वर्षांत कमी झाला आहे़तीन वर्षांपूर्वी हा दर ३़५ टक्के होता़ आता हा दर १़०९ टक्के झाला आहे़ शेती उत्पादनच कमी झाले असेल तर शेतकºयांचे उत्पन्न कसे वाढणार, असा प्रश्न उपस्थित होतो़ शेतकºयांचे उत्पन्न वाढवायचे असेल तर शेती उत्पादन दर वाढायला हवा़ शेती उत्पादन दर १२ टक्के झाला तरच शेतकºयांचे उत्पन्न २०२२ पर्यंत वाढू शकेल, अन्यथा शेतकºयांचे उत्पन्न प्रत्यक्षात वाढणे अशक्य आहे़ शेतकºयांना खर्चापेक्षा ५० टक्के अधिक हमीभाव दिला जाईल, अशी घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे़ ही तरतूद सर्व शेती उत्पादनासाठी असल्याने ती नक्कीच शेतकºयांच्या हिताची आहे़ पण याआधीही काही शेती उत्पादनांसाठी अशाच प्रकारची घोषणा करण्यात आली होती़ अधिक हमीभाव मिळूनही शेतकºयांना ती उत्पादने कमी भावाने विकावी लागत आहेत़ असे असताना ही घोषणा कागदावरच राहणार की याचा फायदा शेतकºयांना होणार हे येणारा काळच ठरवेल़ सर्वसामान्यांना दिलासा देणारी या अर्थसंकल्पातील दुसरी तरतूद म्हणजे कुटुंबाला ५ लाख रुपये आरोग्य विमा मिळणार आहे़ ही घोषणा कोट्यवधी कुटुंबांसाठी लाभदायी आहे़ या घोषणेचा फायदा खासगी कंपन्यांना होणार तर नाही ना, अशी शंकाही उपस्थित होते़ कारण ही घोषणा पूर्णत्वाला नेण्यासाठी सरकार कोठून पैसे आणणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही़ आरोग्य विम्याचे पैसे मिळवण्यासाठी अनेक जण रुग्णालयाची खोटी बिले, रुग्णालयात अॅडमिट असल्याचे बनावट दाखले सादर करतात़ नव्या आरोग्य विमा योजनेने भ्रष्टाचार वाढण्याची भीती आहे़ त्यामुळे या वर्षीचा अर्थसंकल्प सर्वसामान्यांना दिलासा देणारा असला तरी त्याचे यश प्रत्यक्ष अंमलबजावणीवर अवलंबून आहे़
budget 2018 : अंमलबजावणीचे काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2018 12:51 AM