गेल्या काही दिवसांत घडलेल्या घटनांनी मी अत्यंत विचलित झालो आहे. बिहारच्या मुजफ्फरपूर शहरातील मुलींच्या सरकारी आश्रयगृहात ७ ते १८ वयोगटातील मुलींवर कित्येक महिने सातत्याने बलात्कार होत राहिले, तरी त्यांचा आक्रोश आपल्या कानावरही पडू नये, हे मोठे क्लेशकारक आहे. मी येथे ‘आपल्या’ हा शब्द संपूर्ण समाज व शासनव्यवस्थेसाठी मुद्दाम वापरला आहे. आतापर्यंत आलेल्या बातम्यांनुसार त्या आश्रयगृहातील ४२ पैकी ३४ मुली लिंगपिसाटांच्या वासनेला बळी पडल्या आहेत. यासंदर्भात ब्रजेश ठाकूर याचे नाव प्रामुख्याने पुढे येत आहे. परंतु शासनव्यवस्थेतील इतरही अनेकांची साथ होती म्हणूनच हा नराधम हे अधम कृत्य करू शकला, हेही तितकेच खरे. गेल्या तीन वर्षांत या आश्रयगृहातून ११ मुली बेपत्ता झाल्याचीही माहिती पुढे आली आहे. या मुलींच्या नशिबी काय आले? त्या आता जिवंत तरी आहेत का? हे कळायला मार्ग नाही. सर्वात मोठे आश्चर्य म्हणजे राज्यात एवढे मोठे वासनाकांड घडूनही ‘सुशासनबाबू’ म्हणून मिरविणारे मुख्यमंत्री नितीश कुमार तब्बल तीन महिने गप्प होते. आता या प्रकरणाचा तपास राज्य सरकारनेच सीबीआयकडे सोपविला आहे.त्याआधी दिल्लीमध्ये तीन लहान मुलींचा व झारखंडमध्ये एका महिलेचा उपासमारीने मृत्यू झाल्याच्या बातम्यांनीही मी सुन्न झालो होतो. मनात विचार येतो की, मंगळावर यान पाठविणारा, चंद्रावर माणूस पाठविण्याची तयारी करणारा आणि स्वत:ची कोठारे भरून अन्नधान्याची निर्यात करणारा माझा भारत देशातील नागरिकांची उपासमार का थांबवू शकत नाही? सुमारे १५ वर्षांपूर्वी दिवंगत राष्ट्रपती व थोर वैज्ञानिक डॉ. ए.पी. जे. अब्दुल कलाम यांना गुजरातच्या आणंद शहरात एका कार्यक्रमात मुलांनी प्रश्न विचारला होता की, तुमच्या मते देशाचा सर्वात मोठा शत्रू कोणता आहे? कलाम साहेबांनी स्वत: उत्तर देण्याऐवजी मुलांनाच त्या प्रश्नाचे उत्तर देण्यास प्रोत्साहित केले. तेव्हा पारुल नावाच्या मुलीने गरिबी हा देशाचा सर्वात मोठा शत्रू असल्याचे उत्तर दिले होते. डॉ. कलाम यांनी अचूक उत्तर दिल्याबद्दल त्या मुलीचे कौतुक केले आणि गरिबीविरुद्धचा लढा जिंकल्याशिवाय आपण खरी प्रगती करू शकणार नाही, असे सांगितले. सरकार एवढ्या योजना राबवीत असूनही उपासमार आणि भूकबळीच्या बातम्या वरचेवर येतच असतात, हे खरंच मोठं दुर्भाग्य आहे. गरिबांच्या तोंडचा अन्नाचा घासही हिरावून घ्यायला नेमके जबाबदार कोण हे कधी शोधले जात नाही की त्यांना काही शासन होत नाही. काही महिन्यांपूर्वी झारखंडमध्ये एका मुलीचा उपासमारीमुळे मृत्यू झाला होता. तपासातून असे पुढे आले की, त्या कुटुंबाकडे रेशनकार्ड होते; परंतु आधार क्रमांकाशी जुळणी न होऊ शकल्याने त्यांना धान्य दिले गेले नव्हते. यावरून खूप टीका झाली, पण एकाही अधिकाऱ्यावर कारवाई झाली नाही. आता दिल्लीत तीन बहिणींचा असाच भूकबळी गेल्याने पुन्हा विषय चर्चेत आला. दिल्ली सरकारने ही घटना दुर्दैवी असल्याचे म्हटले, पण त्यासाठी कुणालाही जबाबदार धरले गेले नाही!गेल्याच आठवड्यात बातमी होती की, दिल्ली-आग्रा एक्स्प्रेस हायवेची साईड लेन अचानक खचली व एक मोटार ५० फूट खाली खड्ड्यात पडली. रस्त्याच्या या भागाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले म्हणूनच रस्ता असा अचानक खचला, हे वेगळे सांगायला नको. चीनमध्ये अशी घटना घडली तेव्हा दोषी ठरलेल्याला लगेच फासावर लटकविले गेले. आपल्याकडे असे स्वप्नातही होणार नाही. मी जगभर फिरत असतो व तेथील रस्ते पाहिल्यावर आपल्याकडचे रस्ते त्या दर्जाचे नाहीत, हे मला वारंवार जाणवते. आपल्याकडे सपाट, गुळगुळीत रस्ता अभावानेच दिसतो. सिमेंटच्या नव्या रस्त्यांवरही मोटारीला धक्के बसतात. जगातील इतर अनेक देशांत रस्त्यावरून प्रवास करताना पोटातील पाणीही हलत नाही. यावरून आपल्याकडे रस्ते बांधताना ते उच्च दर्जाचे बांधले जातील याकडे लक्ष दिले जात नाही, असे दिसते. कंत्राटदार व सरकारी अभियंते यांच्या अभद्र युतीमुळे नवे रस्ते निकृष्ट बांधले जातात व त्यांची दुरुस्ती आणि देखभालही नीट होत नाही. आता मुंबईचीच अवस्था पाहा. रस्ते एवढे खराब आहेत की गणेशोत्सवात श्रींच्या मूर्ती धडधाकटपणे आणायच्या कशा व विसर्जनाला न्यायच्या कशा, याची गणेश मंडळांना चिंता पडली आहे. आगमन व विसर्जन मिरवणुकांच्या मार्गावरील रस्त्यांचे खड्डे लगेच बुजविण्याचे आश्वासन महापालिकेने दिले आहे. पण दरवर्षी एवढे खड्डे पडतातच कसे, याचे उत्तर कुणीच देत नाही. यासाठी कोणा अभियंत्याला वा कंत्राटदाराला जाब विचारून त्याच्यावर कारवाई केल्याचे दिसत नाही.आता आसाम धुमसत आहे. राष्ट्रीय नागरिकत्व रजिस्टरच्या (एनआरसी) अंतिम मसुुद्यात ४० लाख व्यक्तींची नावे नसल्याने मोठा वाद सुरू आहे. अन्य कोणत्याही राज्यात नागरिकांच्या अशा याद्या तयार केल्या जात नाहीत. भारतात सुमारे तीन कोटी विदेशी नागरिक राहत असावेत, असा एक अंदाज आहे. मुळात ही परिस्थिती कशी निर्माण झाली, असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. इतक्या मोठ्या संख्येने लोक आपल्या देशात बेकायदा घुसून वर्षानुवर्षे राहतात, मग प्रशासन काय झोपले होते का? आता आसाममध्ये अशी यादी तयार केली तरी त्याचा उपयोग काय? अंतिम यादीत जे विदेशी ठरतील त्यांना पाठवणार कुठे? त्यांना स्वीकारायला कोणता देश आपणहून तयार होईल? असे बेचैन करणारे असंख्य मुद्दे आहेत. पण हे सर्व का होते याचा आपल्याला खोलात शिरून विचार करावाच लागेल. राष्ट्रीय भावनेचा अभाव हे याचे एक प्रमुख कारण आहे. राष्ट्रभावना नसली की राष्ट्रीय चारित्र्यही घडणार नाही.राष्ट्रीय चारित्र्य याचा अर्थ असा की, आपले प्रत्येक पाऊल, प्रत्येक प्रयत्न, प्रत्येक विचार राष्ट्रवादाने प्रेरित झालेला असायला हवा. दुर्दैवाने हल्ली राष्ट्रवाद या शब्दालाही राजकीय रंग दिला जात आहे. राजकारणाने राष्ट्रवादाची एक नवीन व्याख्या केली आहे. ती राजकीय रंगाने माखलेली आहे. तुमची विचारसरणी एका ठराविक मुशीतील असेल तरच तुम्ही राष्ट्रवादी अन्यथा देशविरोधी असे समीकरण मांडले जाते. सांप्रदायिक मानसिकता व प्रचारतंत्राने सर्व वातावरण कलुषित करून टाकले आहे. समाज एकसंघ होण्याऐवजी तो जात, भाषा व संप्रदायाच्या नावाने लहान लहान तुकड्यांमध्ये विभागला जात असल्याचे दिसते. यातून बाहेर पडून खरा राष्ट्रवाद आपण लोकांना शिकविला नाही तर देशापुढे गंभीर समस्या उभी राहील. जगात आज जे विकसित म्हणून ओळखले जातात त्यांच्या विकासात नागरिकांमधील राष्ट्रीय चारित्र्य हा मोठा भाग आहे. यामुळे तेथील लोक देशासाठी काहीही करायला तयार होतात. आपल्याकडे राष्ट्रीय चारित्र्याचा अभाव का? आपल्या सर्वांमध्ये राष्ट्रभक्ती आहे, पण राष्ट्रीय चारित्र्य किती जणांमध्ये आहे. रस्त्यावर वाहतूक नियमांचे पालन न करणारा राष्ट्रभक्त असला तरी राष्ट्रीय चारित्र्याच्या दृष्टीने चारित्र्यहीन ठरतो. प्रत्येकाने राष्ट्रीय चारित्र्य अंगी बाणविणे गरजेचे आहे. राष्ट्रीय चारित्र्य नसेल तर बलशाली व सुसंस्कृत राष्ट्राची उभारणी अशक्य आहे! हेही लक्षात घ्या की, राष्ट्रीय चारित्र्य कुठे दुकानात विकत मिळत नाही. ते जन्मापासून मुलांच्या अंगी बाणवावे लागते. राष्ट्रीय चारित्र्य घडविण्यात आपले साधू-संत व समाजव्यवस्था अपयशी ठरली आहे. आता ही जबाबदारी माता-पिता व शिक्षकांनाच पार पाडावी लागेल. आणखी एक गोष्ट मला आवर्जून सांगावीशी वाटते. पं. जवाहरलाल नेहरूंपासून ते नरेंद्र मोदींपर्यंत प्रत्येक पंतप्रधानाने देशाला पुढे नेण्यासाठी नेटाने प्रयत्न केले. स्वत: मोदी १८ तास काम करतात. पण त्यांच्या या अथक परिश्रमाला शासन, प्रशासन व व्यवस्थेची साथ मिळाल्याशिवाय यश कसे मिळणार?हे लिखाण संपविण्यापूर्वी...पोर्तुगालमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय फिजिक्स आॅलिम्पियाडमध्ये भारतीय विद्यार्थ्यांनी देशाचे नाव उज्ज्वल केले. भारतीय संघातील पाचही विद्यार्थ्यांनी सुवर्णपदके पटकाविली. कुणाही देशाच्या संघातील सर्वांनी सुवर्णपदक मिळविण्याची २१ वर्षांतील ही पहिलीच वेळ आहे. भास्कर गुप्ता (मुंबई), लय जैन (कोटा), निशांत अभांगी (राजकोट), पवन गोयल (जयपूर) व सिद्धार्थ तिवारी (कोलकाता) या पाचही विजेत्यांचे भारताची मान उंचावल्याबद्दल मनापासून अभिनंदन. हेच खरे आपले हिरो आहेत.
(चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह)