- प्रा. डॉ. विश्राम ढोले(समाजमाध्यमांचे अभ्यासक)
गेल्या काही वर्षांपासून समाज माध्यमकेंद्रित आंदोलनं (‘सोशल मीडिया ॲक्टिव्हिजम’) जगभरात सुरू आहेत, आता त्याचे ‘राजकीय आयाम’ही दिसू लागले आहेत. या समाजमाध्यमी आंदोलनांना मुख्यत्वे दोन चेहरे दिसतात.एक म्हणजे मुळात जे आंदोलन प्रत्यक्षात जमिनीवर सुरू आहे, त्याची व्याप्ती आणि गतिमानता समाजमाध्यमं वाढवतात. दुसरं म्हणजे काही गोष्टी सुप्त असतात, त्यांची ठिणगी समाजमाध्यमात पडते आणि त्यातून आंदोलन आकार घेतं. उदाहरणार्थ दिल्लीत शेतकरी आंदोलन प्रत्यक्ष सुरू आहे, समाजमाध्यमातील अभिव्यक्ती नंतर सुरू झाली. तेच निर्भया प्रकरणानंतर झालेल्या आंदोलनाचं.
समाजमाध्यमातील अभिव्यक्तीने त्या आंदोलनाला आधार दिला. त्याउलट ‘मीटू’ हे आंदोलन. जे प्रत्यक्षात नव्हतं, मात्र समाजमाध्यमातच त्याची ठिणगी पडली आणि ते सुरू झालं. त्यानं वेगही घेतला. तोच मुद्दा ‘ऑक्युपाय वॉल स्ट्रीट’ या आंदोलनातही दिसतो. आताशा तिसरा टप्पा म्हणजे काही आंदोलनं जमिनीवर आणि समाज माध्यमात एकाच वेळी सुरू होतात.या आंदोलनांचा आपण विचार करतो तेव्हा त्यांच्या प्रकृतीही लक्षात घेतल्या पाहिजेत. काही आंदोलनं ही हाय रिस्क-हाय स्टेक आंदोलनं असतात. काही लो रिस्क-लो स्टेक आंदोलनं असतात. हाय रिस्क-हाय स्टेक आंदोलनं म्हणजे, प्रस्थापितांविरुद्ध, सरकारविरुद्ध, लोकशाही वा एकाधिकारशाही शासन निर्णयांविरुद्ध किंवा पोलिसांसह अन्य दमन यंत्रणांविरुद्ध होणारी आंदोलनं. ही आंदोलनं व्यवस्थात्मक बदल मागतात. दुसरा प्रकार म्हणजे लो रिस्क-लो स्टेक आंदोलनं. ही अशी आंदोलनं जी काही विशिष्ट व्यक्ती अगर गोष्टींविरुद्ध असतात, जी विशिष्ट परिघात घडतात. उदाहरणार्थ मीटू आंदोलन.
या दोन्ही प्रकारच्या आंदोलनात आता समाजमाध्यमांचा सहभाग, तिथली अभिव्यक्ती दिसते. मात्र लो रिस्क-लो स्टेक आंदोलनात समाजमाध्यमं उत्तम प्रभावशाली भूमिका बजावू शकतात. सकारात्मक-सर्जनात्मक गोेष्टी घडवणाऱ्या आंदोलनातही समाजमाध्यमं उत्तम काम करतात. म्हणजे कुणाच्या विरोधात नाही, तर सर्वांनी मिळून एकत्र येण्याच्या गोष्टी. अर्थात कुणाला मदत करणं, काही जीवनशैलीविषयक बदल करणं यासाठी ही माध्यमं प्रभावी ठरतात.मात्र, जिथे हाय रिस्क आंदोलनं असतात, प्रस्थापित व्यवस्थांविरुद्ध, व्यवस्थात्मक बदलांसाठी जी आंदोलनं होतात, त्या आंदोलनांच्या संदर्भात मात्र समाजमाध्यमांच्या काही मर्यादा लक्षात येतात. अशा आंदोलनात कृतिशीलता ही फक्त शब्दांची नसते तर जमिनीवर, रस्त्यावर प्रत्यक्ष कृतीतही ती आवश्यक असते. याचा अर्थ व्यक्त होणं कमी महत्त्वाचं आहे, असं नाही. मात्र, प्रत्यक्ष त्या काळातील कृती हे आजवरच्या यशस्वी आंदोलनांचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे. लोकसहभाग, लोकसंपर्क, लोकनेता, लोकसंवर्धन हे सारं या प्रत्यक्ष आंदोलनात महत्त्वाचं असतं.
अगदी साधं उदाहरण घ्या. १९४२ साली गांधीजींनी दिलेली ‘चले जाव’ची हाक. त्या आंदोलनात गांधीजींसारखा लोकनेता होता, काँग्रेसचं मजबूत संघटन होतं. आंदोलन सुरू झालं आणि त्यानंतर लोकसहभाग वाढला आणि लोक प्रत्यक्ष कृती करायला पुढे आले. आंदोलन प्रत्यक्ष जमिनीवर उभं राहिलं. लोकसहभाग, लोकसंपर्क, लोकनेता, लोकसंवर्धन हे सारं नसेल तर केवळ समाजमाध्यमातील अभिव्यक्तीच्या जोरावर आंदोलनं यशस्वी होत नाहीत.समाजमाध्यमांची एक ताकद म्हणजे आंदोलनांसाठी आवश्यक लोकसंपर्काचं काम ही समाजमाध्यमं उत्तम करतात. लोकसमन्वयही करतात, आंदोलनांची व्याप्ती आणि गतिमानता वाढवतात. आंदोलनाशी ज्यांच्या थेट संबंध नाही, त्यांच्यापर्यंत ही आंदोलन पोहोचवतात.
त्यामुळे प्रत्यक्ष आंदोलनांना समाजमाध्यमातील अभिव्यक्तीची मदत होऊ शकते.मात्र फक्त मदतच होते का? - तर ते तसं सोपं नाही.१. एकतर समाजमाध्यमं ही काही फक्त आंदोलकांच्याच ताब्यात नसतात. ती त्यांच्या मालकीची नसतात, त्यावर अन्य कुणाची मालकी असते.२. आंदोलक जशी समाजमाध्यमं वापरतात, तसे विरोधकही समाजमाध्यमं जोरकसपणे वापरू शकतात.३. आंदोलनाबाबतची माहिती कलुषित करणं, आंदोलकांमध्ये फूट पाडणं हेही समाजमाध्यमांवर केलं जाऊ शकतं. समाज माध्यमं दुधारी आहेत.४. बॉट्स तयार करून, फेक अकाउंट्स तयार करून, त्यांच्या वापराने प्रत्यक्ष आंदोलनात अराजक-गोंधळ निर्माण करणंही शक्य, सोपं आहे. ५. आंदोलनाच्या निमित्ताने लोक समाजमाध्यमात एकत्र येतात, ते नातेसंबंध तात्कालिक, क्षीण असतात. समाजमाध्यमी आंदोलनात चटकन सहभागी होणंही सहज शक्य असतं आणि त्यातून माघार घेणंही. ६. पण, जी आंदोलनं प्रत्यक्ष जमिनीवर घडतात त्या आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णयही सहज सोपा नसतो आणि त्यातून माघार घेण्याचा निर्णयही चटकन घेता येत नाही. प्रत्यक्ष जमिनीवर एकत्र येऊन आंदोलन करणाऱ्यांमध्ये जे ‘सामाजिक नातं’ तयार होतं, ते घट्ट असतं. त्यातून ही आंदोलनं दीर्घकाळ चालतात.७. समाजमाध्यमात तसं होत नाही. ज्या आंदोलनांचं इंधनच मुळात समाजमाध्यमातून येतं, त्यांचे बंध कमकुवत असतात. आंदोलनासाठीची धार पुरेशी असतेच, असं नाही.८. या साऱ्याचा विचार करता, मुळात हे समजून घ्यायला हवं की, ज्या आंदोलनात आपण केवळ समाजमाध्यमातून भाग घेतो आहोत, म्हणजे प्रत्यक्षात जमिनीवर आपण त्या आंदोलनात सहभागी नाही ते नक्की काय आहे? त्याचा विस्तार काय आहे?९. हे आंदोलन नक्की कुणापर्यंत पोहोचतं आहे, त्याचा इतिहास, पार्श्वभूमी काय आहे याची माहिती घ्यायला हवी. १०. जी आंदोलनं केवळ समाजमाध्यम केंद्री आहेत, त्या आंदोलनांसाठी आपण समाजमाध्यमं वापरतो आहोत की, त्यांचा वापर करून कुणीतरी आपलाच वापर करून घेते आहे हेही बारकाईने तपासले पाहिजे.११. समाजमाध्यमी आंदोलनांसाठीच नाही, तर प्रत्यक्ष आंदोलनांसाठीही अभिव्यक्ती ही एक कृती असली तरी ती शाब्दिक अभिव्यक्ती ही काही पोकळ नसते. त्या शब्दांचा-संवादाचा समाज प्रक्रियेवर परिणाम होतो. ही अभिव्यक्ती समाजमाध्यमी असली तरी तिचे समाजस्वास्थ्यावर परिणाम काय होतील याचाही विचार करायला हवा.