नंदकिशोर पाटीलसंपादक, छत्रपती संभाजीनगर
शरद पवार परवा मराठवाड्याच्या दौऱ्यावर येऊन गेले. त्यांच्या या दोनदिवसीय दौऱ्यावर नजर टाकली तर भेटीगाठी, कार्यक्रमांची रेलचेल होती. वय आणि दुर्धर आजाराची पर्वा न करता तरुणांना लाजवेल, अशा उत्साहाने ते शेकडो किलोमीटर प्रवास करून लोकांना भेटत आहेत. जनसंपर्काच्या बाबतीत त्यांची बरोबरी करील, असा दुसरा नेता सध्या तरी नाही. निवडणूक आली की, काही जण बाहेर पडतात. मात्र, पवार त्यास अपवाद आहेत. आपला मतदारसंघ सोडून ते महाराष्ट्राचा कानाकोपरा पिंजून काढत असतात. त्यांच्या गाडीला ‘जीपीएस’ बसविण्याची गरज नाही. सगळे रस्ते त्यांना ठाऊक आहेत. शरद पवारांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यांच्या निर्णयाशी, भूमिकेशी सहमत असो अथवा नसो. पवारांना ते आपला नेता मानतात. प्रत्येक गावात त्यांचा असा एक तरी ‘चाहता’ आहे.
परवाच्या दौऱ्यात त्यांनी आपला हाच जुना गोतावळा जमविला होता. कवी ना. धों. महानोर यांच्या पळासखेडा गावाची भेट असो, की प्राचार्य प्रतापराव बोराडे यांची श्रद्धांजली सभा. पवार स्वत: जातीने हजर राहिले. जुन-नवे नेते, साहित्यिक, कलावंत आणि सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांना भेटले. ‘राखीव’ वेळेत पंचतारांकित हॉटेलात आराम न करता त्यांच्या भेटीगाठीचा सिलसिला सुरू होता! या भेटणाऱ्या लोकांची यादी पाहिली तर ज्यांचा राजकारणाशी दुरान्वयानेही संबंध नाही, अशांची संख्या अंमळ अधिकच निघेल!
मराठवाडा आणि पवारअजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर शरद पवार एकाकी पडतील, खचून जातील, असे भाकीत अनेकांनी वर्तविले होते. मात्र, उलट ते अधिक जोमाने कामाला लागल्याचे दिसले. शरद पवार यांचे मराठवाड्याशी जुने नाते आहे. या प्रदेशाने पवारांना नेहमीच साथ दिली आहे. त्यांच्या ‘पुलोद’ मंत्रिमंडळात माजलगावचे सुंदरराव सोळुंके उपमुख्यमंत्री होते. याच मंत्रिमंडळाने विद्यापीठाच्या नामांतराचा पहिला ठराव केला होता. शरद पवारांनी स्थापन केलेल्या समाजवादी काँग्रेस पक्षालादेखील मराठवाड्यातून चांगला प्रतिसाद मिळाला होता. तात्पर्य काय तर, या प्रदेशाशी, इथल्या माणसांशी त्यांची जुनी नाळ आहे. परवाच्या दौऱ्याकडे यादृष्टीने पाहिले तर जुने खाते ‘रिन्यूव्हल’ करण्याचा प्रयत्न दिसतो.
बीड का निवडले? राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर खा. पवार स्वाभिमान सभा घेत आहेत. मराठवाड्यातील पहिली सभा त्यांनी बीडला घेतली. सभेसाठी बीडची केलेली निवड खूप सूचक आहे. ज्यांना उपमुख्यमंत्रिपद दिले, मंत्री केले-त्या सुंदरराव सोळंके यांचे चिरंजीव आ. प्रकाश सोळंके आणि ज्यांना राजकारणात आणून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद दिले, नंतर मंत्री केले ते धनंजय मुंडे हे दोघेही अजित पवारांसोबत गेले. शिवाजीराव पंडितांचे चिरंजीव अमरसिंह पंडित यांनीही तोच मार्ग निवडला. थोरल्या पवारांच्या हे खूप जिव्हारी लागणारे आहे. मराठवाड्यात राष्ट्रवादीचे आठपैकी चार आमदार बीड जिल्ह्यात आहेत. सोळंके, मुंडे यांच्यासह बाळासाहेब आजबे हे अजितदादांसोबत, तर संदीप क्षीरसागर हे थोरल्या पवारांसोबत आहेत. संख्याबळ असमान आहे; पण...
परळीत होणार घमासान धनंजय मुंडे यांचा समावेश मंत्रिमंडळात झाल्याने विधानसभेच्या जागेवर अर्थातच त्यांचा दावा असणार. परिणामी, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना परळीऐवजी दुसरा पर्यायी मतदारसंघ शोधावा लागेल किंवा लोकसभेला उभे राहावे लागेल. भाजपने पंकजा यांना लोकसभेला उमेदवारी दिली तर विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांचे काय? स्व. गोपीनाथराव मुंडे यांना मानणारा मोठा वर्ग या जिल्ह्यात आहे. मुंडे यांच्या कन्यांवर अन्याय झाला तर हा वर्ग वेगळी भूमिका घेऊ शकतो. परळीतील या संभाव्य ‘जर-तर’चा विचार करून शरद पवार यांनी बबन गिते यांच्या माध्यमातून ‘नवा भिडू’ रिंगणात आणला आहे. येत्या काळात परळी हे नव्या राजकीय संघर्षाच्या केंद्रस्थानी आले तर नवल वाटू नये!
पवार विरुद्ध पवार!मराठवाड्यात धनंजय मुंडे (परळी), प्रकाश सोळंके (माजलगाव), संदीप क्षीरसागर (बीड), बाळासाहेब आसबे (आष्टी), संजय बनसोडे (उदगीर), बाबासाहेब पाटील (अहमदपूर), चंद्रकांत नवगिरे (वसमत) आणि राजेश टोपे (घनसावंगी), असे राष्ट्रवादी काँग्रेसचे आठ आमदार आहेत. यापैकी टोपे, क्षीरसागर आणि नवगिरे हे थोरल्या पवारांसोबत, तर उर्वरित पाच दादांसोबत आहेत. त्यामुळे उद्या या आठही मतदारसंघांत एकार्थी शरद पवार विरुद्ध अजित पवार असाच सामना होणार आहे. कारण, परळी, माजलगाव, आष्टी, उदगीर आणि अहमदपूर मतदारसंघात थोरल्या पवारांनी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. ‘माझे वय झाले असेल; पण तुम्ही माझे अजून काय पाहिलंय?’ शरद पवारांचा हा इशारा ‘समझने वालों को काफी है!’nandu.patil@lokmat.com