तीन महिन्यांत गोव्यातल्या ड्रग्जच्या व्यवसायाची पाळेमुळे उखडून टाकली जातील, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी नुकतेच एका बैठकीनंतर जाहीर केले खरे, पण ड्रग्ज गोव्यातून पूर्णपणे हद्दपार करणे किती कठीण आहे, हे सारेच जाणतात. मनोहर पर्रीकर मुख्यमंत्रिपदी असताना त्यांनीही अशाच घोषणा केल्या होत्या. पण त्यावेळीही त्याचा फारसा परिणाम दिसला नाही. छापे पडत होते, छोटे मासे पकडले जात होते. आत्ताही तेच चित्र आहे.
याबाबतीत सरकारच्या भूमिका स्थानिकांना कायम नाटकी वाटतात, कारण सरकारला एका बाजूने डान्स फेस्टिव्हल हवे, कसिनो जुगार हवा आणि दुसरीकडे ड्रग्ज व्यवसाय संपविण्याची भाषा! इलेक्ट्रॉनिक डान्स फेस्टिव्हलमध्ये दरवर्षी ड्रग्जच्या अतिसेवनाने एकतरी मरतो, तरीही हे फेस्टिव्हल्स होतातच. हा व्यवहार पूर्वी केवळ विदेशी पर्यटकांपुरता मर्यादित होता. आता तर गोव्याच्या ग्रामीण भागातील युवकदेखील ड्रग्जचा पुरवठा करू लागले आहेत. रुमबॉय म्हणून हॉटेलात काम करणारी गोमंतकीय मुले ड्रग्ज सहजपणे हाताळतात. सोनाली फोगाट खून प्रकरणातून बरेच काही उजेडात आले असले, तरी बरेच काही गुप्तही राहिले आहे.
मोपा येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ उभा राहिल्यानंतर वार्षिक एक कोटीहून अधिक पर्यटक गोव्यात येतील. धारगळमध्येे मनोरंजन सिटी उभारण्यास सरकारने मंजुरी दिली. त्या परिसरात गेमिंग झोन असेल. विमानतळ परिसरात लँड कसिनो येतील. गोवा हा मूळ गोमंतकियांचा राहणारच नाही. एका बाजूने पर्यटकांची झुंबड, दुसरीकडे हिंदी भाषिक परप्रांतीय मजूर! सध्या हे चित्र किनारी भागांत दिसतेच आहे, तेच पूर्ण गोव्यात लवकरच दिसू लागेल. पर्यटकांची संख्या वाढत जाईल. ईडीएम, कसिनो वाढत जातील. ड्रग्जचा व्यवहार वाढत जाईल.
स्कार्लेट ह्या ब्रिटिश युवतीचा २००८ साली हणजुणा येथे खून झाला होता, त्यावेळीही कर्लिस बार व रेस्टॉरंट चर्चेत आले होते. आता पुन्हा ड्रग्जच्या विषयावरून ते उजेडात आल्यावर पोलिसांनी त्याला सील ठोकले आहे. मात्र, कर्लिसचे दरवाजे पुन्हा कधी उघडतील ते कळणारदेखील नाही. किनाऱ्यावरील शॅक व्यावसायिक, हॉटेलमधल्या डान्स पार्ट्यांचे आयोजक या सगळ्यांना ड्रग्ज पुरवठादारांची माहिती असते. सनबर्नमध्ये सहभागी होणाऱ्यांना ड्रग्ज मिळविण्यासाठी फार कष्टही घ्यावे लागत नाहीत. गोवा सरकारला पर्यटनाशी निगडीत सगळे धंदे वाढलेले हवे आहेत, मग फक्त ड्रग्जचा बेकायदा धंदा कसा आटोक्यात येईल ?
किनारी भागांतील एक आमदार सांगत होते, रात्री साडेदहानंतर संगीत पार्ट्या नकोच, अशी भूमिका घेतली. पण सरकारला हे मान्य झाले नाही. रात्री अकरानंतरही किनारी भागातील काही ठराविक हॉटेलांच्या परिसरात व किनाऱ्यांवर पार्ट्यांचा घणघणाट सुरू असतो. पर्रीकर सरकार अधिकारावर होते तेव्हा भाजपचा पेडणे तालुक्यातील एक पदाधिकारीच पार्टी आयोजकांना मदत करत असे. शिवोलीचा एक माजी आमदार तर पार्ट्या खुशाल होऊ द्या, असे पर्रीकरांना सांगत असे. गोव्याबाहेरून येणारे, हॉस्टेलमध्ये राहणारे विद्यार्थीही हल्ली ड्रग्ज घेऊन फिरतात. काळ्या काचांच्या गाड्यांमध्ये बसून ड्रग्ज ओढणारी टोळकी उत्तर गोव्याच्या किनाऱ्यांवर दिसतात. तीसवाडीच्या किनाऱ्यांवरही हे चित्र पाहायला मिळते. पणजी व परिसरातही अशी मुले कमी नाहीत.
सध्या मुख्यमंत्री सावंत यांच्या कसोटीचाच काळ आहे. सोनाली फोगाट खून प्रकरणानंतर गोवा पोलीसही अग्निदिव्यातून जात आहेत. वरुन हे ड्रग्जचे जाळे! जमीन बळकावप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी एसआयटी स्थापन केलीच आहे. ड्रग्जला आळा घालण्यासाठीही तेच करावे लागेल...
सदगुरू पाटील, निवासी संपादक, लोकमत, गोवा