चीनमधील शेअर बाजार कोसळल्यानंतर भारतीय शेअर बाजारातही त्याची लगोलग प्रतिक्रिया उमटली आणि सलग दोन दिवस मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक घसरला. शेअर बाजार अत्यंत संवेदनशील असल्याने, ग्रीसमधील आर्थिक संकटापाठोपाठ चीनमध्ये शेअर बाजार कोसळल्याने भारतीय शेअर बाजार कोसळले, यात आश्चर्यजनक असे काही नव्हते; परंतु चीनमधील बाजार कोसळणे ही भारतासाठी खरेच धोक्याची घंटा आहे का? काही जाणकारांनुसार, ही भारतासाठी धोक्याची घंटा तर नाहीच; पण साधली तर संधीच ठरेल! चीनमधील संकटात भारतासाठी संधी शोधणारे तज्ज्ञ, २००८ मधील लेहमन ब्रदर्स पेचप्रसंगाची आठवण करून देतात. त्या पेचप्रसंगाच्या वेळीही जगभरातील शेअर बाजार एकापाठोपाठ कोसळले आणि भारतातही चिंतेचे वातावरण पसरले; मात्र कालांतराने भारतीय अर्थव्यवस्था रुळावर आली व नंतर धावायलाही लागली. चीनमधील घटनेचा भारतीय अर्थव्यवस्थेला फायदा होऊ शकतो, असे मानणाऱ्या अर्थतज्ज्ञांच्या मते, या संकटामुळे जगभरातील ग्राहकोपयोगी वस्तूंच्या बाजारावर विपरीत परिणाम होईल व त्यांच्या किमती घसरतील. भारत अशा वस्तूंची आयात, तर सेवांची निर्यात करतो. त्यामुळे वस्तूंच्या किमतीत घसरण होण्याचा भारताला लाभच होईल. भारतीय अर्थव्यवस्थेचे इंजिन प्रामुख्याने देशांतर्गत मागणीच्या इंधनावर धावत असल्याने, चिनी बाजार कोसळल्यामुळे पडणारा मनोवैज्ञानिक प्रभाव लवकरच पुसला जाईल, असेही या तज्ज्ञांना वाटते. चीनमधील संकटाच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह बॅँक व्याजदरातील अपेक्षित कपात पुढे ढकलू शकते आणि तसे झाल्यास जागतिक गुंतवणूकदार अमेरिकेकडे न वळता, भारताकडे वळू शकतील व त्याचा लाभ भारतीय अर्थव्यवस्थेला होईल. सध्याच्या घडीला भारतातील महागाईचा दर नियंत्रणात आहे. या पार्श्वभूमीवर, मान्सूनने साथ दिली आणि नरेंद्र मोदी सरकारने योग्य ती पावले उचलली, तर संभाव्य संकटाचे संधीत रूपांतर करणे शक्य असल्याचे, या तज्ज्ञांचे मत आहे. डिझेलनंतर एलपीजी व रॉकेलवरील अनुदान बंद करून त्यांना नियंत्रणमुक्त करणे, सार्वजनिक गुंतवणूक वाढविणे, बॅँकांना तातडीने भांडवलाचा पुरवठा करणे आणि कायद्याची गरज नसेल ती नियंत्रणे हटविण्याचा वेग वाढविणे, इत्यादी उपाययोजना त्यांनी सुचविल्या आहेत. या उपाययोजनांसाठी नरेंद्र मोदींनी बिहार निवडणूक आटोपण्याची वाट बघू नये; अन्यथा उशीर होईल, असा इशाराही या तज्ज्ञांनी दिला आहे.
संधी साधता येईल?
By admin | Published: July 13, 2015 12:23 AM