डॉ. एस.एस. मंठाअलीकडे राजकारणाचे स्वरूप क्रिकेट सामन्याप्रमाणे होऊ लागले आहे आणि राजकारण्यांनी क्रिकेटच्या प्रशासनाचे रूप धारण केले आहे. त्यात लोकसभेच्या निवडणुका या पाच दिवसीय कसोटी सामन्याप्रमाणे असतात. राज्यांच्या निवडणुकींना वन डे मॅचचे स्वरूप प्राप्त होते, तर पोटनिवडणुका या २०-२० सामन्याप्रमाणे असतात. भाजपला टीम इंडिया समजावे तर राज्ये ही अन्य देशांच्या क्रिकेट टीमचे रूप धारण करतात. दोन्ही प्रकारच्या सामन्यांत विरोधकांची कामगिरी सुमार दर्जाची असते. त्यात काही खेळाडूच हे चमक दाखवीत असतात, तर बाकीचे आल्सो रॅन प्रकारचे असतात. भारतात होणारे सामने टीम इंडिया जिंकत असते, पण अन्य देशांत खेळताना मात्र जिंकताना कष्ट पडतात. दोन्हीमध्ये असलेले हे साम्य लक्षात घेण्याजोगे आहे. काही ठिकाणी मॅच फिक्सिंगचे प्रकारही घडतात, ज्याची तपास संस्थांकडून चौकशी होऊन अंतिम निर्णय न्यायालयात होतो. क्रिकेटप्रमाणेच राजकारणातही वेडेपणा पाहावयास मिळतो आणि तो वर्षानुवर्षे सुरूच असतो.
नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र आणि हरयाणाच्या निवडणुकांमध्ये हेच पाहावयास मिळाले. पण या वेळी विजयाचा करंडक लोकांनी प्राप्त केला. या वेळी सत्तेत असणाऱ्यांनी आणि विरोधकांनीही निवडणूक निकालाविषयी समाधान व्यक्त केले आहे. या वेळी कुणीही ईव्हीएमची चर्चा केली नाही. यावरून पूर्वीपेक्षा या निवडणुका अधिक पारदर्शक होत्या, असे वाटू लागले आहे. त्यामुळे अर्थातच निवडणूक आयोगही समाधानी असेल. या वेळी खरा विजय लोकांचा झाला. त्यांनी दलबदलूंचा जसा मुखभंग केला तसाच मोठमोठ्या सम्राटांनाही बाहेरचा रस्ता दाखवला. आपण वॉशिंग मशीनचे काम करतो, असे राजकीय पक्षांनी समजू नये. जेथे डाग असतात ते वॉशिंग मशीनही स्वच्छ करू शकत नाही. लोक डाग ओळखतात आणि त्यांची वेळ आली की आपले मत व्यक्त करतात. महाराष्ट्रात शक्तिशाली राजाला फारसे नाव नसलेल्या व्यक्तीकडून पराभव पत्करावा लागला, हे चांगले उदाहरण होऊ शकते.राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख हे त्यांना मिळालेल्या यशामुळे समाधानी असतील. त्यांना अपेक्षेपेक्षा जास्त जागा तर मिळाल्याच, पण भाजपचा रथ रोखण्यातही त्यांना यश मिळाले. त्यांनी नेत्यांची दुसरी फळी यशस्वी करून त्यांना अनेक संधी मिळवून दिल्या आहेत. त्यामुळे आता मराठा समाज राष्ट्रवादी काँग्रेसकडे स्वत:चा तारणहार म्हणून बघू लागला आहे. असे असले तरी आपण सत्तेत परत येऊ शकलो, याचा आनंद भाजपला नक्कीच असेल. मराठ्यांचे आधिक्य असलेल्या काही क्षेत्रांत तसेच विदर्भातही त्या पक्षाचा जनाधार कमी झाल्याचे दिसले. त्यामुळे तो परत मिळविण्यासाठी एखाद्या मराठा नेत्याकडे विदर्भाचे नेतृत्व सोपविण्याचा विचार पक्षाला गांभीर्याने करावा लागेल. तसेच हरयाणातही जाट नेत्याचा शोध त्यांना घ्यावा लागेल. तसेच काही काळ अंमलबजावणी संचालनालयासह अन्य एजन्सीच्या हालचालीसुद्धा कमी कराव्या लागतील. कदाचित भाजपच्या मनात वेगळे विचार असू शकतात.
भाजपकडून एक राष्ट्र - एक निवडणूक या तत्त्वाचा पुरस्कार करण्यात येतो. कल्पना चांगली असली तरी त्याचे निष्कर्ष निराशाजनक ठरू शकतात. पण तरीही त्याविषयी विचार करायला हरकत नाही. कारण राष्ट्रीय प्रश्न हे राज्य निवडणुकीत फारसे महत्त्वाचे ठरत नाहीत. हे नुकत्याच झालेल्या निवडणुकांनी दाखवून दिले आहे. त्यामुळे या तत्त्वाचा पुरस्कार केला तर तो भाजपसाठी घातकसुद्धा ठरू शकतो. या निवडणुकीने जातव्यवस्था जिवंत असून ती प्रभावी ठरू शकते, हेही दाखवून दिले आहे. मराठा व जाट या जातींचा प्रभाव या निवडणुकीत दिसून आला.निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना जास्त खूश आहे; कारण त्या पक्षाची सौदेबाजी करण्याची क्षमता वाढली आहे आणि त्यांचा सहकारी पक्ष त्यांच्याशिवाय सत्तेत येऊ शकत नाही. याशिवाय दोन पिढ्यांनंतर त्या पक्षाच्या कुटुंबातील एका व्यक्तीकडे सत्तारूढ होण्याची क्षमता निर्माण झाली आहे, ही त्या पक्षासाठी आनंद देणारी बाब ठरली आहे. विरोधकांना बळ प्राप्त झाले आहे, ही काँग्रेससाठी आनंदाची गोष्ट आहे. महाराष्ट्रात त्या पक्षाकडे विश्वासार्ह नेतृत्व नसताना आणि हरयाणात पक्षांतर्गत कलह असताना दोन्ही ठिकाणी पक्षाला अधिक जागा जिंकता आल्या. फक्त मनसे हा एकच पक्ष अधिक दु:खी असेल. चांगला विरोधी पक्ष देण्याची त्या पक्षाची भूमिका मतदारांना आवडली नाही. त्यामुळे तो पक्ष विरोधक वा सत्तारूढ पक्ष बनू शकला नाही.
या निवडणुकीत अनेक मान्यवर नेत्यांना पराभवाची धूळ चाखावी लागली. ते प्रामुख्याने सगळे दलबदलू नेते होते. ते पुन्हा जुन्या पक्षाकडे परत जातील का? जुना पक्ष त्यांना पुन्हा पक्षात घेईल का? तेव्हा दलबदलू लोकांनी याविषयी आत्मचिंतन करण्याची गरज आहे. जिंकलेल्या आणि पराभूत झालेल्या नेत्यांनी पुन्हा एकदा स्वत:चा नव्याने शोध घ्यावा, हेच जणू मतदारांनी त्यांना सांगितले आहे. निष्ठा नसलेल्या लोकांना सोबत घेऊन कोणतेही युद्ध जिंकता येत नसते. निवडणुका आटोपल्या असल्याने, आता शक्य तितक्या लवकर नवे सरकार सत्तेत यायला हवे. भाजपने या वेळी जनसंदेश यात्रेच्या माध्यमातून प्रचार केला. पण आता लोकांनी दिलेल्या संदेशाकडे त्या पक्षाला लक्ष पुरवावे लागेल.( लेखक राजकीय विश्लेषक आहेत )