कावेरीचं पाणी ढवळलं!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2023 09:48 AM2023-05-19T09:48:51+5:302023-05-19T09:49:10+5:30
सिद्धरामय्या मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेतृत्व डी.के. शिवकुमार यांच्याकडे ठेवून पक्षश्रेष्ठींनी त्यांना उपमुख्यमंत्रिपद देऊन समन्वय साधला आहे. आता कावेरीचे पाणी ढवळून निघाले, ते कर्नाटकच्या जनतेच्या अपेक्षापूर्तीसाठी नितळ हाेईल, हीच अपेक्षा.
कर्नाटक प्रदेशातील सर्वांत समृद्ध विभाग म्हणजे जुना म्हैसूर प्रांत हाेय. ब्रिटिशकालीन काळात म्हैसूर संस्थानचे अधिपती कृष्णा राजा वडियार यांनी म्हैसूरजवळ कावेरी नदीवर १९११ मध्ये धरण बांधायला घेतले. ते १९२४ मध्ये पूर्ण झाले आणि म्हैसूर ते बंगळुरू हा पट्टाच सुपीक झाला. दुष्काळ कायमचा हटला. या विभागात कृषिप्रधान असा मुख्यत: वक्कलिगा शेतकरी समाज आहे. कृष्णराजा वडियार यांच्या कर्तृत्वाने समृद्धी आल्याने संपूर्ण कावेरी नदीचे खाेरे समृद्ध झाले.
स्वतंत्र भारतात कर्नाटक राज्याची स्थापना झाल्यानंतर याच विभागातील राजकीय नेत्यांचे वर्चस्व राहिले. एच. हनुमंतय्या, निजलिंगप्पा, देवराज अर्स, एच.डी. देवेगाैडा ते एस.एम. कृष्णा आदी नेतृत्वांनी राजकारण गाजविले. पाच दिवसांपूर्वी कर्नाटक विधानसभेची चाैदावी निवडणूक पार पडली. काँग्रेस पक्षाने १३५ जागा जिंकत निर्विवाद बहुमत मिळविले. या बहुमतासाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाविरुद्ध चार हात करणारे दाेन्ही नेते जुन्या म्हैसूर विभागातील हाेते. परिणामी, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांच्यात लागलेल्या शर्यतीने कावेरी नदीचे पाणी ढवळून निघाले.
नितळ पाण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या या नदीवरील म्हैसूर, चामराजनगर, मंड्या, रामनगर, बंगळुरू ग्रामीण हे जिल्हे आणि बंगळुरू शहर ढवळून निघाले. माजी मुख्यमंत्री एस. सिद्धरामय्या आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी.के. शिवकुमार दोघेही मुख्यमंत्रिपदासाठी दावा ठाेकून हाेते. दाेघेही अनुभवी, लाेकप्रिय, कर्नाटकाच्या राजकारणातील काेनाकाेपरा माहीत असलेले असल्याने पक्षश्रेष्ठींची पंचाईत झाली. सिद्धरामय्या यांनी विविध सरकारमध्ये अर्थमंत्री म्हणून १३ वेळा राज्याचा अर्थसंकल्प मांडला आहे. सलग पाच वर्षे मुख्यमंत्री म्हणून काम केले आहे. गेली पाच वर्षे सलग विराेधी पक्षनेता हाेते.
दलित, मुस्लीम, धनगर आदी समाजांत ते अत्यंत लाेकप्रिय आहेत. दुसऱ्या बाजूला बंगळुरूजवळच्या कनकपुराचे डी.के. शिवकुमार वयाच्या २३ व्या वर्षी तत्कालीन लाेकप्रिय नेते एच.डी. देवेगाैडा यांच्याविरुद्ध लढले आणि हरले हाेते. त्यानंतर सलग आठ वेळा ते निवडून येत आहेत. मंत्रिमंडळात काम केले आहे. अत्यंत धडाडीचा नेता, अशी त्यांची प्रतिमा आहे. या दाेन्ही बाजू पक्षश्रेष्ठींपुढे ठेवताना त्यांनी एकमेकांची उणीदुणीही मांडली. सिद्धरामय्या यांना २०१३ ते १८ सलग पाच वर्षे मुख्यमंत्रिपदी असताना पुन्हा काँग्रेसचे सरकार सत्तेवर आणता आले नाही, असा आक्षेप शिवकुमार यांनी घेतला. शिवाय विराेधी पक्षनेता असताना २०१९ च्या लाेकसभा निवडणुकीत २८ पैकी २७ जागांवर काँग्रेसची हार झाली. एकमेव खासदार निवडून आले ते कनकपुरा मतदारसंघातून शिवकुमार यांचे बंधू डी.के. सुरेश. ही जागा जिंकण्याचे यश आपलेच आहे आणि उर्वरित अपयश सिद्धरामय्या यांचे आहे, येणाऱ्या २०२४ च्या लाेकसभा निवडणुकीचे आव्हान आहे, अशी बाजू शिवकुमार यांनी मांडली. मात्र, याच शिवकुमार यांना लक्ष्य करण्यासाठी ईडी, सीबीआय, प्राप्तिकर विभाग आदींनी शिवकुमार यांच्यावर दावे दाखल केले आहेत. शिवाय त्यांना अटक झाली हाेती. ते ५० दिवस तिहार तुरुंगात हाेते.
कर्नाटकातील भाजप सरकारच्या भ्रष्ट कारभाराविरुद्ध जनतेने काैल दिला आहे, तेव्हा भ्रष्टाचाराचे आराेप असलेला नेता कसा काय मुख्यमंत्रिपदावर राहू शकताे, असा खडा सवाल सिद्धरामय्या यांनी आपली बाजू पक्षश्रेष्ठींपुढे मांडताना केला हाेता. मतमाेजणीच्या दुसऱ्या दिवशी नवनिर्वाचित आमदारांची पहिली बैठक झाली, त्यात सर्वाधिक आमदारांची पसंती सिद्धरामय्या यांना हाेती, असा निष्कर्ष काँग्रेसचे प्रभारी सुरजेवाला यांनी पक्षश्रेष्ठींपुढे ठेवला हाेता. या दाेन्ही नेत्यांच्या दाव्या-प्रतिदाव्यांमुळे कर्नाटकच्या राजकारणात चार दशके काढलेल्या काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचीही काेंडी झाली. विधिमंडळ पक्षाने नेता निवडीचे सर्वाधिकार त्यांना दिले असले तरी दाेन्ही नेत्यांत बेबनाव हाेता कामा नये; अन्यथा कावेरी खाेऱ्यातच गडबड सुरू हाेऊ शकते. आगामी लाेकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची तयारी सुरू असताना एका माेठ्या राज्यात गटबाजी चालू राहणे काँग्रेसला परवडणारे नाही. एका खासदाराचा अपवाद वगळता कर्नाटकचे लाेकसभेत सर्व खासदार भाजपचे आहेत.
विधानसभेची निवडणूक स्थानिक प्रश्नांवर लढविण्याची या दाेन्ही नेत्यांची युक्ती फळाला आली. सिद्धरामय्या मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेतृत्व डी.के. शिवकुमार यांच्याकडे ठेवून पक्षश्रेष्ठींनी त्यांना उपमुख्यमंत्रिपद देऊन समन्वय साधला आहे. आता कावेरीचे पाणी ढवळून निघाले, ते कर्नाटकच्या जनतेच्या अपेक्षापूर्तीसाठी नितळ हाेईल, हीच अपेक्षा.