बी. व्ही. जोंधळे
‘कोरोना’च्या वैश्विक महामारीच्या पार्श्वभूमीवर आज आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती घरात बसून साजरी करीत आहोत. आंबेडकरी चळवळीच्या इतिहासात ही पहिली वेळ असावी की, अनुयायांना जल्लोष करून, मिरवणुका काढून जयंती साजरी करता येत नाही. यात काही गैर आहे असेही नाही. कोरोनाचे संकट संपलेले नाही. घरात बसून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडत असताना भीमजयंती कशी साजरी करावी, याचे आत्मचिंतन करण्याची उत्तम संधी चालून आली आहे. तिचा भीमानुयायांनी चांगला उपयोग करून घेतला पाहिजे असे वाटते.
बाबासाहेबांनी हजारो वर्षे अस्पृश्यतेच्या नरकात पिचत पडलेल्या दलित समाजाची अस्पृश्यतेच्या जखडबंद तुरुंगातून मुक्तता केल्यामुळे त्यांच्या अनुयायांनी वाजत-गाजत त्यांची जयंती साजरी करणे स्वाभाविक आहे; पण प्रश्न असा आहे की, बाबासाहेबांचे आम्ही भक्त आहोत की अनुयायी? भक्त म्हटले की, बाबासाहेबांचे दैवतीकरण करून जयघोष केला की जबाबदारी संपते; पण अनुयायी म्हटले की, त्यांचे विचार कृतीत आणणे अपरिहार्य होऊन बसते. तेव्हा मुद्दा हा की, बाबासाहेबांच्या नावाचा जयघोष करताना आपण त्यांच्या समग्र सामाजिक परिवर्तनाचे स्वप्न खरोखरच साकार केले आहे काय? निदान त्या दिशेने प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत काय? त्यांनी आयुष्यभर मूल्याधिष्ठित राजकारण केले; पण व्यक्तिगत स्वार्थासाठी पक्ष बदलला नाही, तर काळाची गरज ओळखून स्वत:चे स्वतंत्र पक्ष काढले आणि आम्ही? व्यक्तिगत स्वार्थाखातर त्यांच्या रिपब्लिकन पक्षाची मोडतोड करून तत्त्वशून्य युती-आघाड्या करीत आलो. आता तरकाय? धर्मांध पक्षाशी युती करून सत्तेच्या खुर्च्या जशा उबवत आहोत, तसेच धर्मांध पक्षांना मदत करणाऱ्या राजकीय रणनीतीही आखत आहोत. बाबासाहेबांनी दलित समाजाला ‘शासनकर्ती जमात व्हा’ असा संदेश दिला. याचा अर्थ वाटेल त्याच्याशी तडजोड करून सत्तेच्या खुर्च्या मिळवा, असा होतो काय? नाही, तर मूल्याधिष्ठित राजकारण करा व प्रसंगी संविधान वाचविण्यासाठी समविचारी पक्षांशी सहकार्य करा, हेच त्यांना अभिप्रेत होते. राजकारणासोबत आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक सत्ता मिळवा, जीवनाच्या सर्वांगात प्रवेश करा, असाही त्यांच्या संदेशाचा खरा अर्थ आहे; पण या संदेशाचा सोयवादी अर्थ काढून आपण दलित-शोषित समाजाची फसवणूक करणारे राजकारण करीत आलो. जातिअंत हे बाबासाहेबांचे जीवनध्येय होते. जाती मोडणे ही बहुसंख्याकांची खरी जबाबदारी आहे; पण आपण तरी खरेच जातिमुक्तझालो आहोत काय? राजकारण व धम्म ही माझ्या रथाची दोन चाकं आहेत, असे बाबासाहेबांनी म्हटले होते. त्यांच्या राजकीय संकल्पनेची आपण मोडतोड केलीच आहे; पण त्यांनी दु:खमुक्त,शोषणमुक्त समाजाच्या पुनर्रचनेसाठी जो बौद्ध धम्म दिला त्याचे तरी मनोभावे पालन आपण करतो काय? बाबासाहेबांनी प्रत्येकाने सामाजिक ऋण फेडले पाहिजे, असे सांगून ठेवले. आपण किती सामाजिक ऋण फेडतो, हे कोण तपासणार? प्रश्न अनंत आहेत. याचे चिंतन भीमजयंतीच्या निमित्ताने तरी करणार आहोत का नाही, हा खरा प्रश्न आहे.
दलितेतर पुरोगामी विचारवंतांनीही आत्मशोध घेण्याची गरज आहे. दलितांचे प्रश्न ही राष्ट्रीय समस्या आहे. दलितेतर पुरोगामी विचारवंतांची जबाबदारीही म्हणूनच मोठी आहे. प्रश्न आहे तो, बाबासाहेबांच्या जयंतीस सामाजिक अभिसरणाचे स्वरूप यावे म्हणून ते काय करतात हा! बहुसंख्याक समाजाचे मानसिक परिवर्तन करावयाचे, तर बाबासाहेबांची जयंती त्यांनी त्यांच्या पेठा-वस्त्यांतून साजरी करायला नको काय? दलितविरोधी मानसिकतेची तीव्रता ग्रामीण भागातून मोठी आहे. तिथे जयंती हाच अनेकांच्या पोटदुखीचा विषय असतो. मोठ्या प्रमाणात दलित अत्याचार तिथेच होतात. तेव्हा पुरोगामी विचारवंतांनी किमान जयंती काळात तरी (खरे तर सतत) ग्रामीण भागात जाऊन स्वकीयांचे प्रबोधन करायला नको काय? पण असे होत नाही. बाबा आढावांनी उभारलेल्या ‘एक गाव-एक पाणवठा’च्या धर्तीवर सामाजिक अभिसरणास चालना देणारे उपक्रम राबविले जात नाहीत. तात्पर्य, दलितेतर पुरोगामी विचारवंतांनी ग्रामीण भागात जाऊन जनजागृती करणे गरजेचे आहे.(लेखक राजकीय, सामाजिक विश्लेषक आहेत)