मृत्यू जर अटळ आहे तर त्याचे भय काय बाळगायचे? हा तसा साधा प्रश्न. हिमालयात साधना करणाºया साधूपासून ते आपल्याकडील गल्लीबोळातील भगवे कपडेधा-यापर्यंत व ज्ञानीपासून ते अज्ञानीपर्यंत, सर्वांकडून उपदेशीला जाणारा. तरी मृत्यू नकोसा वाटतो, कारण अटळतेला स्वीकारायची कुणाची तयारी नाही. मृत्यूपाठोपाठ इतरेजनांवर ओढवणारा शोकही आपसूकच नकोसा ठरणारा. म्हणूनच, मृत्यूपश्चात शोकाऐवजी उत्सव साजरा करणारे जेव्हा दिसून येतात तेव्हा त्यांच्यातील निर्मोहित्त्वाला दाद देणे क्रमप्राप्त ठरून जाते.
मरण हे कुणाचेही असो, दु:खदच असते. तरी दीर्घायू राहिलेल्या व सुखा-समाधानाने गेलेल्या व्यक्तीसाठी तिच्या अंत्ययात्रेत भजनी मंडळाला पाचारण करण्याची प्रथा आहे. भजनाच्या घोषात दु:ख वा शोक हलका होण्याची भावना तर असतेच, शिवाय जाणाºयाला दिल्या जाणाºया निरोपाचे ते एकप्रकारचे उत्सवीकरणही असते. मृत्यूपश्चातच्या शोकात मोडकळून पडण्याऐवजी त्यातले सत्य स्वीकारण्याची शक्ती लाभावी म्हणून दशक्रिया विधीच्या दिनी प्रवचनही ठेवले जाते. दशक्रिया किंवा संबंधित विधीवरून सध्या सुरू असलेला वाद-विरोध हा भाग वेगळा; परंतु यानिमित्तच्या प्रवचनात थोरांचे, संतांचे यासंदर्भातले दाखले देत जीवनाचे क्षणभंगूरत्व मांडले जाते. जीव-जगत काय, हे सांगतानाच पंचत्वाचे निरूपण यात केले जाते. जे ज्या मातीतून निर्माण झाले आहे, ते त्या मातीतच मिळणार, असा भावगर्भ आशय त्यामागे असतो. त्याची एक वेगळी फिलॉसॉफी आहे. ती सहज संदर्भाने या माध्यमातून मांडली जाते. ती ‘फिलॉसॉफी’ कोणती, तर‘‘मरताना ज्याच्या राम आला मुखे, धन्य त्याचा सुखा, पार नाही!’’
या संतवचनाचा अर्थ असा की, ज्याने आयुष्य सदाचरणात घालविले असेल तो सुखाने जाईल, त्याची इहलोकीची यात्रा सुफळ ठरेल. पं. जवाहरलाल नेहरू यांनीही मृत्यूबद्दल सांगितलेली एक वेगळी बाब येथे उद्धृत करता येणारी आहे. ‘मृत्यूने नवे जीवन मिळते. जो मृत्यूला मानत नाही किंवा स्वीकारत नाही, त्याला जगणेसुद्धा समजत नाही’, असे नेहरू म्हणत. खूप मोठा आशय व तत्त्वज्ञान या विचारधनात सामावलेले आहे. या साºयाची चर्चा येथे कशासाठी, तर गेल्या आठवड्यात उत्तर प्रदेशातील नोएडात हरिभाई लालवाणीनामक व्यक्तीची अंत्ययात्रा बॅण्डबाजा लावून काढण्यात आली व त्यात त्याच्या मुली डान्स करीत सहभागी झाल्याचे वाचावयास मिळाले म्हणून. लालवाणी यांच्या इच्छेनुरूप हे असे केले गेले; परंतु मृत्यूचे हे उत्सवीकरण खरेच सत्य स्वीकारण्याची मनाची तयारी घडविणारेच म्हणता यावे. या संदर्भात प्रख्यात हास्यकवी काका हाथरसी यांचेही उदाहरण देता यावे. आयुष्य लोकांना हसविण्यात वेचलेल्या या कवीने आपल्या निधनानंतर चितेच्या साक्षीने हास्यकवी संमेलन घेण्याची इच्छा प्रदर्शित केली होती; त्यानुसार ते घेतले गेले होते म्हणे.
विशेष म्हणजे, आपल्याकडे मृत्यूचा असा उत्सव करण्याचे प्रकार चर्चित ठरत असतानाच या उत्सवाची प्रथा जपून त्याबद्दल कमालीची संवेदना जपणा-या एका समुदायाची माहितीही समोर आली आहे. इंडोनेशियाच्या साऊथ सुलावेसी प्रांतातील टोराजा समुदायात ही मृत्यूच्या उत्सवाची प्रथा आहे. या समुदायातील लोक मृत्यूपश्चात आनंदोत्सव तर साजरा करतातच; पण मृतदेहासोबत फोटोही काढतात व एका विशिष्ट रसायनाच्या लेपनाने तो मृतदेह जपूनदेखील ठेवतात. व्यक्ती कधीही मृत्युमुखी पडत नसते, अशी त्यांची त्यामागील श्रद्धा व धारणा आहे. ऐकावे ते नवल, या प्रकारात मोडणारीच ही बाब म्हणायला हवी. पण आहे तिथे तशी प्रथा. शेवटी श्रद्धेला कसा व कोण धक्का लावू शकेल? इजिप्तमध्ये ‘ममीज’ आहेत, तसेच हे म्हणायचे. इजिप्तमध्ये ख्रिस्तपूर्व २००० काळातील देह ‘ममीफिकेशन’ करून जपून ठेवले गेले आहेत. त्याची स्वतंत्र ‘व्हॅलीज आॅफ किंग्ज्’ तेथे असून, जगभरातील पर्यटकांच्या आकर्षणाचे व उत्सुकतेचे ते एक केंद्र ठरले आहे.
थोडक्यात काय तर, मृत्यू हा जीवनाचा अंतिम पडाव असून, त्याबाबतची अपरिहार्यता स्वीकारता आली पाहिजे. जे भल्याभल्यांना जमत नाही. मृत्यूनंतरचा शोक स्वाभाविक असला तरी, गीतोदेशाप्रमाणे कोण काय घेऊन आले, की काय घेऊन जाता येणार आहे? मग असे असेल तर शोक तरी कशाचा करायचा? येथे याच संदर्भाने प्रख्यात कव्वाल अजिज नाझा यांच्या अतिशय गाजलेल्या रचनेचा उल्लेख करता येणारा आहे. ‘चढता सूरज धिरे धिरे ढलता है ढल जायेगा...’मधील ‘खाली हाथ आया है, खाली हाथ जायेंगा’चे वास्तव स्वीकारण्याचा हा विषय आहे. हे रिकाम्या हाती जाणे निर्मोहत्त्वाशी संबंध साधणारे आहे. जगण्यातील कसल्याही सुखाशी, इच्छा-आकाक्षांशी मोह न ठेवणारी व्यक्तीच या अवस्थेपर्यंत पोहोचू शकते. देहाची नश्चरता स्वीकारणे त्यातूनच शक्य होते. नोएडातील लालवाणी कुटुंबातील कन्यांनी तेच सत्य स्वीकारले म्हणायचे.