- राजा मानेसोलापूर जिल्ह्यातील जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांना आणि जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनाही जलतज्ज्ञ राजेन्द्रसिंह यांनी उत्कृष्टतेचे प्रमाणपत्र दिले. आता त्या प्रमाणपत्रावर लोकप्रियतेची मोहोर उमटावी...कागदी घोडे कितीही नाचले आणि आकडेवारीची सरबत्ती कितीही झाली तरी ज्या कामासाठी ती चाललेली असते, तिला खऱ्या अर्थाने मान्यता देण्याचे व शिक्कामोर्तब करण्याचे काम त्या क्षेत्रातील ऋषितुल्यांच्या प्रमाणपत्रानंतरच होते. नेमके हेच काम जलतज्ज्ञ राजेन्द्रसिंह आणि अभिनेता नाना पाटेकर यांनी सोलापूर दौऱ्यात जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांच्या बाबतीत केले. जलयुक्त शिवार योजना ही शाश्वत पाण्याची गुरुकिल्ली असल्याचे आता सर्वसामान्य माणसालाही पटू लागले आहे. आपल्या शिवारात पडणाऱ्या पावसाचा थेंबन्थेंब शिवारातच जिरला पाहिजे, त्याशिवाय गत्यंतर नाही हे वास्तव शेतकऱ्याला उमजले आहे. त्याला कृतीची भक्कम जोड देण्याचे काम सोलापूर जिल्ह्यात जिल्हाधिकारी मुंढे यांनी केले. त्याचीच फलनिष्पत्ती म्हणून राज्यात जलयुक्त शिवार कामाच्या आघाडीवर जिल्हा पहिल्या क्रमांकावर आला.लोकसहभाग आणि जलसंवर्धन याचे महत्त्व जाणून जिल्हा प्रशासनाने काम केल्यास किती चांगल्या पद्धतीने गाळ काढण्यापासून ते पुनर्भरणाच्या कामात यश मिळते, हे दिसून आले आहे. जिल्ह्यात जलसंवर्धनाचे मोठ्या प्रमाणावर काम झाले. या वर्षी चांगला पाऊस झाल्यास त्याचे परिणाम निश्चितपणे दिसणार आहेत. त्या कामांची पाहणी करण्यासाठी दोन दिवसांपूर्वी जलतज्ज्ञ राजेन्द्रसिंह जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते.मंगळवेढा तालुक्यातील कामांची पाहाणी केल्यानंतर त्यांनी जे विचार मांडले ते केवळ जिल्हाधिकाऱ्यांच्या कौतुकापुरते मर्यादित निश्चितच नव्हते. दीर्घकालीन वाटचालीला दिशा देण्याचा प्रयत्न त्यांच्या प्रत्येक शब्दात दडला होता.५००-५५० मि.मी. पावसाची सरासरी असलेल्या जिल्ह्याने पीकपद्धती निश्चित करताना पाण्याची उपलब्धता आणि त्याचे नियोजन याचा विचार करायलाच हवा. उजनी धरण उभे राहिले आणि जिल्ह्यात साखर कारखानदारी झपाट्याने वाढली. ३४ साखर कारखाने कार्यरत आहेत तर १६ नियोजित कारखाने उभारणीच्या रांगेत आजही आहेत. दोन लाख हेक्टरपेक्षा अधिक ऊसाचे क्षेत्र जिल्ह्यात आहे. पाणी नसल्याने हे क्षेत्र या वर्षी कमी झालेही असेल, पण ऊस हा या जिल्ह्याचा जिव्हाळ्याचा विषय आहे. साखर कारखाने आणि ऊसशेती या संदर्भात राजेन्द्रसिंह यांनी परखड आणि वास्तववादी विचार मांडले. पीकपद्धती बदलली पाहिजे, याबद्दल कुणाच्याही मनात शंका असायचे कारण नाही. पण ती बदलताना ऊसाची उपेक्षा मात्र होता कामा नये. ऊस ठिबक सिंचन पद्धतीने कमी पाण्यात कसा पोसला जाईल, याची काळजी शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे. सोलापूर ग्रामीण जिल्ह्याचे अर्थकारण साखर कारखानदारीमुळे बदलून गेले, या सत्याकडे डोळेझाक करणे योग्य होणार नाही. जिल्ह्यातील डाळ कारखान्यांची काय अवस्था आहे, हे सर्वांनाच ठाऊक आहे. ती कारखानदारी टिकविण्यासाठी उपाययोजना व्हायला हवी, पण शंभर टक्के ऊस मोडून सर्व काही आलबेल होईल, असे म्हणणे चुकीचे ठरणार आहे. त्यामुळे जलयुक्त शिवारची जिल्ह्यात झालेली चांगली कामे व पावसाळ्यानंतर गावा-गावांना होणारा त्याचा फायदा याचा विचार करून पीकपद्धती या विषयाची नव्याने कृतिशील मांडणी करण्याची गरज आहे. ‘नाम’ने दु:खितांच्या कल्याणासाठी उभारलेल्या चळवळीतले आणखी एक पाऊल नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांनी सोलापूर जिल्ह्यात टाकले. बळीराजा शेतकरी संघटनेचे नेते संजय पाटील-घाटणेकर व उद्योजक कुमार करजगी यांनी ते पाऊल पडण्यासाठी पुढाकार घेतला. आत्महत्त्या या विचाराला नेस्तनाबूत करण्याची प्रेरणा नाना-मकरंद यांच्या भावविवश कार्यक्रमाने दुष्काळग्रस्तांना दिली. राजेन्द्रसिंहांबरोबरच त्या दोघांनीही त्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी मुंढे यांच्या वाटचालीला प्रमाणपत्र दिले. आता या प्रमाणपत्रावर लोकप्रियतेची व लोकाश्रयाची मोहोर उमटविण्याची किमया मुंढे दाखविणार काय, हा खरा दुष्काळग्रस्त जिल्ह्याचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे.