भारतीय महिलांनी १३ वर्षांनी आशिया चषक पटकावला.आता पुढील वर्षी होणाºया विश्वचषक स्पर्धेतही आपला महिला संघ नक्कीच बाजी मारेल, पण त्यासाठी देशवासीयांनी प्रोत्साहन देणे खूप आवश्यक आहे आणि हे जेव्हा होईल तेव्हाच खºया अर्थाने म्हणता येईल ‘चक दे इंडिया’...२००७ साली शाहरुख खानची प्रमुख भूमिका असलेला ‘चक दे इंडिया’ हा महिला हॉकीवर आधारित चित्रपट चांगलाच गाजला. परंतु, या चित्रपटाचे टायटल साँग हॉकीच्या तुलनेत भारतीय क्रिकेटच्या यशासाठी जास्त वापरले गेले. जेव्हा कधी क्रिकेटच्या मैदानात टीम इंडियाने बाजी मारली, तेव्हा प्रत्येक न्यूज चॅनल्स तसेच मैदानावरही ‘चक दे इंडिया’ गाणे वाजवले जायचे. मात्र, गेल्या काही वर्षात भारतीय हॉकीने केलेल्या प्रगतीकडे पाहता खºया अर्थाने ‘चक दे इंडिया’ गाजतंय. काही दिवसांपूर्वीच भारताच्या पुरुष संघाने ढाका येथे मलेशियाला २-१ असे नमवून तिसºयांदा आशिया चषक पटकावला, तर रविवारी भारताच्या महिलांनी अत्यंत चुरशीच्या अंतिम सामन्यात चीनचा पेनल्टी शूटआऊटमध्ये ५-४ असा पराभव करत दुसºयांदा आशिया चषक उंचावला.१९८३ साली भारताने क्रिकेट विश्वचषक उंचावल्यानंतर देशात क्रिकेटने आपले हातपाय पसरण्यास सुरुवात केले. आज क्रिकेटचे वर्चस्व मोडणे जवळपास अशक्य असले, तरी इतर खेळातील चमकदार यश भारतीयांना लक्ष देण्यास भाग पाडत आहे. भारतात खेळ म्हणजे केवळ क्रिकेट नाही, याची या निमित्ताने का होईना पण थोडी जाणीव देशवासीयांना होत आहे. ज्यावेळी कधी आॅलिम्पिक स्पर्धा जवळ येते, तेव्हाच देशात त्या मर्यादित काळापुरते क्रीडा वातावरण निर्माण होते. आपला देश आॅलिम्पिकमध्ये कितपत मजल मारणार, कोणत्या खेळामध्ये किती पदक येतील, नेमबाजी, बॅडमिंटन, टेनिस या खेळातून संधी असतीलही, पण हॉकीमध्ये किमान एक तरी पदक मिळालेच पाहिजे, अशा अनेक चर्चा यावेळी रंगतात. खेळाडूंना पदक मिळवण्यासाठी कठोर मेहनत घ्यावी लागतेच, मात्र त्याहून अधिक आवश्यकता असते ती प्रोत्साहनाची, पाठिंब्याची आणि विश्वासाची.प्रत्येक खेळाडू आॅलिम्पिकमध्ये आपल्या देशासाठी जीव तोडून मेहनत घेत असतो. कित्येक महिने आपल्या घरापासून दूर राहून केवळ आॅलिम्पिक पदक नजरेसमोर ठेवून स्वत:ला सज्ज करत असतो. त्यामुळेच तर, कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदक स्वीकारल्यानंतर वाजले जाणारे राष्ट्रगीत ऐकल्यावर त्या खेळाडूला आनंदाश्रू अनावर होतात. पण एक भारतीय क्रीडाप्रेमी म्हणून आपल्याला ही मेहनत दिसत नाही किंवा आपण ती मेहनत जाणून घेण्याचा प्रयत्नही करत नाही. त्यामुळेच जेव्हा कधी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय खेळाडूंना अपयश येते तेव्हा सहजपणे प्रतिक्रिया मिळते की, आपल्या खेळाडूंकडून काही होणार नाही.यंदा आशिया चषक स्पर्धेच्या पुरुष व महिला जेतेपदांवर कब्जा करून भारताने वर्चस्व मिळवले खरे, पण त्यातही ‘या स्पर्धेत आॅस्टेÑलिया, नेदरलँड, स्पेनसारखे तगडे संघ नव्हते म्हणून भारताला संधी मिळाली,’ असा नकारात्मक सूरही काहींनी उमटवलाच असणार. खेळाडूंना अनेकदा कठोर मेहनतीसह शुभेच्छा मिळणेही तितकेच गरजेचं असतं. जेव्हा कधी संघ किंवा खेळाडू देशासाठी जिंकतो तेव्हा आपल्याला त्या कामगिरीचे अंतिम स्वरूप दिसते. परंतु, या यशासाठी केलेली तपश्चर्या कधीच कळून येत नाही.
चक दे इंडिया...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2017 4:07 AM