प्रयोग म्हणून प्रथमच साठ तास चालवलेल्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाला रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिल्याने नाट्य परिषदेचा उत्साह दुणावला असला, तरी आता आपणच वाढवलेल्या अपेक्षांच्या पूर्ततेचे आव्हान त्यांना पेलावे लागणार आहे. मुंबई-पुण्याच्या वर्तुळात रेंगाळणारी नाट्य परिषद राज्यस्तरीय व्हावी, अन्य ठिकाणच्या रंगकर्मींना-नाट्यप्रवाहांना त्यात स्थान मिळावे, असा प्रचार करत नाट्य परिषदेत सत्ताबदल झाला आणि मुलुंडला झालेल्या नाट्यसंमेलनात रंगभूमीच्या वेगवेगळ्या प्रवाहांचा समावेश करत तो प्रत्यक्षातही आला. आताही बालरंगभूमी, हौशी-प्रायोगिक अशा रंगभूमींना नवे बळ देण्याचा निर्धार करण्यात आला. नाट्यप्रशिक्षण केंद्र, तालमीची जागा, नाट्यसंकुलाचा विस्तार असे अनेक मुद्दे हाती घेण्याची घोषणा झाली. यातील रंगभूमीचा इतिहास मांडण्याचा मुद्दा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निकाली काढला, पण उरलेल्या आश्वासनांच्या पूर्ततेचे आव्हान मोठे आहे. नाटकावरील अन्य माध्यमांच्या आक्रमणाचा मुद्दा संमेलनाध्यक्षा कीर्ती शिलेदार यांनी मांडला, पण त्यावर संमेलनात पुढे काहीच दिशादर्शन झाले नाही. अन्य माध्यमे हे आव्हान आहे की संधी हेच न ठरल्याने त्यावर कुणी काही भूमिकाच घेतली नाही. तसाच प्रकार नाटकवेडा महाराष्ट्र ही ओळख पुसली जाण्याच्या भीतीचा. एकीकडे नाटक भव्य व्हावे, अशी अपेक्षा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली आणि तिला दुजोरा देताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कलाकृतीच्या दर्जाचा मुद्दा मांडला. नाटकाच्या भव्यतेसाठी रसिकांनी जादा किंमत मोजण्याची तयारी ठेवावी, असेही सुचवण्यात आले, पण सध्याच्या रंगभूमीवरून प्रेक्षकासमोर जे मांडले जाते आहे त्यातील किती त्याला रुचणारे आहे? प्रेक्षक नाटकाकडे वळत नाही याचा अर्थ त्याला मनोरंजनाचे अन्य पर्याय खुले आहेत आणि त्यांचा दर्जा नाटकापेक्षा उजवा आहे; हा जर असेल तर त्यासाठी नेमके काय करणार याची जबाबदारी न स्वीकारताच संमेलन पार पडले. तेथे रसिकांनी कलाकृतींचा आस्वाद घेतला. ६० तासांचा प्रयोग यशस्वी झाला आणि परिषदेचे अध्यक्ष म्हणतात तसे रंगकर्मींचे गेटटुगेदर पार पडले. पण या साऱ्याचा रंगभूमीची चळवळ पुढे नेण्यास काय उपयोग झाला, याचे उत्तर नाट्यकर्मींना मिळालेच नाही. सर्व प्रवाह एकत्र आणले, त्यांना मुंबईत सादरीकरणाची संधी दिली; यातच जर संमेलनाचे फलित मोजायचे असेल तर त्यासाठी सांस्कृतिक कार्यमंत्र्यांना स्वागताध्यक्ष करून एवढा मोठा घाट घालण्याची काय आवश्यकता होती, हा मुद्दा उरतोच. त्यामुळे हुरूप वाढलेली नाट्य परिषद पुढील काळात रंगभूमीला बळ देण्यासाठी प्रत्यक्षात काय करते त्यावरच सारी भिस्त आहे.
दीर्घांकानंतरचे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 4:45 AM