देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जन्मलेले पहिले पंतप्रधान, अटलबिहारी वाजपेयी यांच्याशिवाय सलग दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणारे भारतीय जनता पक्षाचे दुसरेच नेते आणि सलग दुसऱ्यांदा स्पष्ट बहुमतासह सत्ता स्थापन करणारे पहिले गैरकाँग्रेसी नेते, असे भारतीय राजकारणात अनेक मैलाचे दगड रोवणारे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी एकाहत्तरावा जन्मदिन साजरा करीत आहेत. कालच जगप्रसिद्ध टाइम मासिकाने जगभरातील शंभर प्रभावी व्यक्तींची यंदाची यादी जाहीर केली आणि अपेक्षेनुसार त्यात नरेंद्र मोदी यांचे नाव आहेच. या व अशा अन्य मंचांवरील त्यांच्या नावाच्या समावेशाचे अप्रूप वाटू नये इतके ते आता देशवासीयांसाठी सवयीचे बनले आहे.
अनेक कारणांनी यंदाचा मोदींचा वाढदिवस वेगळा व महत्त्वाचा आहे. येत्या ऑक्टोबरमध्ये मोदींच्या राजकीय कारकीर्दीला वीस वर्षे पूर्ण होत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक व नंतर भाजपच्या संघटन फळीत काम केल्यानंतर प्रत्यक्ष राजकारणात येताना त्यांनी ७ ऑक्टोबर २००१ रोजी गुजरातच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. तेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून चारवेळा शपथ व नंतर देशाचे सर्वोच्च नेते ही त्यांची कारकीर्द आणि दुसऱ्या पंचवार्षिकातील उरलेल्या तीन वर्षांमध्ये त्यांच्या सरकारपुढील आव्हाने यांचा आढावा घ्यायला हवा. तो घेताना अर्थातच कोरोना महामारीचे संकट केंद्रस्थानी असेल. विषाणू संक्रमणाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचे वाभाडे निघाले. ऑक्सिजन तुटवड्यामुळे गेलेले जीव, गंगा नदीत वाहून जाणारी प्रेते हे चित्र विषण्ण करणारे होते. विषाणूच्या फैलावासोबतच सर्वच पातळ्यांवर आर्थिक संकट कोसळले. अनेकांची रोजीरोटी हिरावली गेली.
तेव्हा सामान्यांना मदतीसाठी सरकारने अनेक पावले उचलली. कोरोना प्रतिबंधक लसीच्या वितरणाची प्रारंभी डगमगलेली व्यवस्था आता योग्य मार्गावर आली आहे. ढासळणारी अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्यात सरकारचा खूप वेळ गेला. आता तिसऱ्या लाटेची शक्यता धूसर होत असताना देशाची आर्थिक गाडी रुळावर येत असल्याची सुचिन्हे आहेत. औद्योगिक उत्पादन वाढू लागले आहे. बाजारपेठेतील चलनवलन वाढते आहे. तथापि, दुसऱ्या बाजूला गेले जवळपास वर्षभर उत्तर भारतातील शेतकरी राजधानी दिल्लीच्या सीमेवर कृषी कायद्यांविरोधात ठिय्या देऊन बसले आहेत. एकूणच का कालखंड नरेंद्र मोदी यांच्या प्रशासकीय काैशल्याचा कस पाहणारा आहे हे खरे. दुसऱ्या बाजूला मोदी यांच्यापुढे राजकीय आव्हानेही आहेत. गेल्या मे महिन्यात पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाला. त्याचा आधार घेऊन विरोधी पक्षांची मोट बांधण्याचे नव्याने प्रयत्न सुरू झाले आहेत. उत्तराखंड, कर्नाटक, गुजरात या भाजपशासित राज्यांमधील मुख्यमंत्री बदलावे लागले. आसाम विधानसभा निवडणुकीत पक्षाला यश मिळाल्यानंतरही मुख्यमंत्रीपदी हेमंत बिस्वा शर्मा यांच्या रूपाने नवा चेहरा द्यावा लागला.
येत्या वर्षभरात मोदींचे गृहराज्य गुजरात तसेच देशात सत्ता मिळविण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा उत्तर प्रदेश अशा काही राज्यांच्या निवडणुका होत आहेत. त्या जिंकणे मोदींसाठी खूप गरजेचे आहे. या प्रशासकीय व राजकीय आव्हानांशिवाय नरेंद्र मोदी यांचा करिश्माई नेते म्हणून विचार करायला हवा. लहान मुले, तरुण, महिला, ज्येष्ठ नागरिक अशा सर्व वयोगटांमध्ये नरेंद्र मोदींइतके लोकप्रिय सध्या भारतात कोणीही नाही. एकविसाव्या शतकातील प्रभावी व लोकप्रिय जागतिक नेत्यांमध्ये त्यांची गणना होते. पाच ट्रिलियन इकाॅनाॅमीसारखे स्वप्न त्यांनी देशाला दाखविले. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत एकहाती विजय मिळविताना भाजपने पहिल्यांदा सोशल मीडियाचा प्रभावी वापर केला आणि भारतीय राजकारणात प्रचाराच्या माध्यमाचे एक नवे पर्व सुरू झाले. सुरुवातीला या माध्यमांबद्दल नाके मुरडणाऱ्या राजकीय पक्षांनी नंतर तोच मार्ग स्वीकारला. तथापि, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने या नवमाध्यमांचा वापर कमी केला आणि कार्यकर्त्यांच्या फळीवर अधिक भिस्त ठेवली. हा बदल निवडणुकीचे निकाल लागल्यानंतरच राजकीय पंडितांच्या लक्षात आला. ज्या राज्यांमध्ये भाजपचे नेटवर्क आहे, त्याच भागातून भाजपला पुन्हा चांगले यश मिळण्यामागे तेव्हाचे पक्षाध्यक्ष अमित शहा यांची ही रणनीती फायद्याची ठरली. भारत देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहे. हा उत्सव साजरा करताना नरेंद्र मोदींनी घोषित केलेल्या अनेक योजना देशाला नवी दिशा देणाऱ्या ठरतील. त्यासाठी जन्मदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींना शुभेच्छा!