आलिया भट्ट आणि राहुल गांधी यांना चेष्टेचा विषय करण्यासाठी समाजमाध्यमांवर जेवढी प्रदीर्घ मोहीम चालली, तेवढी कदाचित अन्य कोणासाठीही चालली नसेल. हे सगळे कोणी आणि का केले, याविषयी पुष्कळ चर्चा होते; परंतु खात्रीलायकरीत्या कोणाचे नाव घेणे बरोबर नाही. मुद्याची गोष्ट अशी की, आलियाने आपल्या उत्तम अभिनयाने काही वर्षांपूर्वी तिच्याविषयीची भ्रामक कल्पना मोडीत काढली आणि आता राहुल गांधी यांना तशी संधी मिळाली आहे. मात्र, त्यांच्यापुढील आव्हाने संपलेली नाहीत.
राहुल ही जबाबदारीपासून पळणारी व्यक्ती आहे, अशी त्यांची प्रतिमा मोठ्या परिश्रमाने तयार केली गेली. त्यांच्या कामात सातत्य नसते, असेही म्हटले गेले. २००४ साली त्यांनी अमेठीतून निवडणूक लढवली आणि ते संसदेत पोहोचले. त्यानंतर १० वर्षे त्यांचे सरकार होते; पण त्यांनी मंत्रिपद घेतले नाही. कित्येक वेळा आपल्या सरकारच्या धोरणांवर टीकाटिप्पणी करताना त्यांनी मागे-पुढे पाहिले नाही. शेवटी २०१७ साली ते पक्षाचे अध्यक्ष झाले; परंतु २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा वाईट पराभव झाल्यानंतर त्यांनी राजीनामा देऊन टाकला आणि एखाद्या नव्या व्यक्तीला ही जबाबदारी दिली पाहिजे, असे म्हटले. संसदेत पद स्वीकारण्याची गोष्ट असेल, तर २०१४ नंतर काँग्रेसकडे कोणताही पर्याय उपलब्ध नव्हता. विरोधी पक्षनेतेपदासाठी कोणत्याही पक्षाकडे लोकसभेतील किमान १० टक्के म्हणजे ५४ जागा असणे अनिवार्य आहे. २०१४ साली काँग्रेसला केवळ ४४ आणि २०१९ मध्ये केवळ ५२ जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद पक्षाकडे येणे शक्य नव्हते.
२०२४ च्या निवडणुकीत काँग्रेसला ९९ जागा मिळाल्या तेव्हा राहुल गांधी आता विरोधी पक्षनेतेपद स्वीकारतील, की या पदापासून स्वतःला दूर ठेवतील, असा प्रश्न लोकांच्या मनात उभा राहिला. राहुल यांनी केवळ पदच स्वीकारले नाही, तर ज्या प्रकारे त्यांनी आपले म्हणणे मांडले त्यावरून त्यांच्यात नव्या राहुल गांधींचा भास होत आहे. सरकारकडे राजनैतिक शक्ती आहे; परंतु विरोधी पक्ष भारतीय लोकांच्या आवाजाचे प्रतिनिधित्व करत आहे, असे ते सभापतींना म्हणाले. संसदेचे कामकाज चालवायला विरोधी पक्ष मदत करील; परंतु हे सहकार्य विश्वासाने पार पाडणे महत्त्वाचे आहे.
संसदेचे काम किती शांततेत होते, हे महत्त्वाचे नसून सामान्य माणसाचे म्हणणे मांडायला किती परवानगी मिळते, हे पाहणे महत्त्वाचे आहे. विरोधी पक्षांचा आवाज दडपून टाकून संसद शांततेत चालवणे शक्य आहे; परंतु हा मार्ग लोकशाहीविरोधी होईल. घटनात्मक अधिकारांचे रक्षण करणे सभापतींची जबाबदारी आहे.राहुल गांधी यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे ते भविष्यात कशी वाटचाल करतील, याचा संकेत मिळाला आहे. विरोधी पक्षनेता या नात्याने राहुल गांधी अशा पदावर आले आहेत की, ते टेबलावर पंतप्रधानांच्या समोरासमोर असतील. विरोधी पक्षनेतेपदाला कॅबिनेटचा दर्जा मिळतो. तो सर्व विरोधी पक्षांचे नेतृत्व तर करतोच; परंतु त्याचबरोबर पब्लिक अकाउंट, पब्लिक अंडरटेकिंग आणि एस्टिमेट कमिटीसारख्या महत्त्वपूर्ण समित्यांचा सदस्यही असतो. संयुक्त संसदीय समित्या आणि निवड समित्यांतही विरोधी पक्षनेत्याची भूमिका महत्त्वाची असते.
अंमलबजावणी संचालनालय (ईडी), सीबीआय, केंद्रीय सतर्कता आयोग, केंद्रीय माहिती आयोग, लोकपाल, निवडणूक आयुक्त, तसेच राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष अशा पदांच्या नियुक्त्या या निवड समित्या करतात. नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी एकमेकांवर तिखट शब्दबाण सोडत राहिले; परंतु टेबलावर ते समोरासमोर बसतील तेव्हा एकमेकांकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन कसा असेल, हे पाहणे लक्षवेधी ठरेल. सभापती ओम बिर्ला यांना त्यांच्या आसनाकडे राहुल ज्या प्रकारे घेऊन गेले ते पाहता आशा निर्माण झाली; परंतु आणीबाणीची आठवण काढली गेल्यामुळे मिठाचा खडा पडला. आणीबाणीसाठी लोकांनी इंदिरा गांधी यांना शिक्षा दिली होती आणि पुन्हा सत्तेवरही आणले होते. हा विवाद नात्यात आग लावणारा आहे.
सरकार चालवण्याचा मोठा अनुभव मोदींकडे असून, ते कूटनीतीतही मुरलेले आहेत. अशा स्थितीत राहुल गांधी यांच्या समोर मोठे आव्हान असेल. जर ते आज यशस्वी झाले, तर एक परिपक्व नेता म्हणून त्यांना नवी ओळख मिळेल, हे नक्कीच. जे लोक त्यांची प्रतिमा बिघडवण्याचा हर प्रकारे प्रयत्न करत आले, त्यांना जोरदार उत्तरही मिळेल. राहुल गांधी अत्यंत समजदार नेता असल्याचे मला जाणवले आहे. देशाची नस जाणण्यासाठी त्यांनी ‘भारत यात्रा’ केली; जशी महात्मा गांधी आणि विनोबाजींनी केली होती. जाणकारांकडून ते विषय समजून घेत असतात. फालतू गोष्टीत त्यांना अजिबात रस नसतो. खोट्याला ते आसपासही येऊ देत नाहीत. त्यांच्या किचन कॅबिनेटबद्दल जाणकार मंडळी प्रश्न निर्माण करत राहिली; परंतु बदलत्या काळानुसार ते त्यातही सुधारणा नक्की करतील.
कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत काढलेल्या भारत जोडो यात्रेने त्यांचे व्यक्तिमत्त्व बदलले आहे. यात्रेच्या वेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले होते, ‘त्या राहुल गांधी यांना मी खूप मागे सोडून दिले आहे. आता मी तो राहुल गांधी राहिलेलो नाही.’ राहुल गांधी यांनी त्या राहुलला खरोखरच मागे टाकले आहे का, ते आता पाहायचे.