हिंदी चित्रपटसृष्टीत, दाक्षिणात्य नायिकांनी नेहमीच वर्चस्व दाखवले आहे. वैजयंतीमालापासून हा सिलसिला सुरू झाला होता. त्यात १९७० ते २०१७ पर्यंत ज्या दाक्षिणात्य नायिकेने आपले वर्चस्व गाजविले ती ‘श्रीदेवी’ अचानक काळाच्या पडद्याआड झाली. तिची एक्झिट कुणाच्याही ध्यानीमनी नव्हती. तिची ही एक्झिट मनाला चटका लावून गेली. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, असे म्हणतात, त्याप्रमाणे श्रीदेवीने आपल्या अभिनयाचा करिश्मा वयाच्या चौथ्या वर्षी, ‘कंदन करू नई’ या तामिळ चित्रपटात दाखविला होता आणि पहिल्याच प्रयत्नात नुसती लोकप्रियता मिळवली नाही, तर बालकलाकार म्हणून केरळ सरकारचा पुरस्कार मिळवला. या मल्याळम चित्रपटातील तिच्या अभिनयाकरिता केरळ सरकारने तिला पारितोषिक देऊन सन्मानित केले.हिंदी चित्रपटसृष्टीत १९७५ साली बालकलाकार म्हणून सर्वप्रथम तिचे आगमन झाले, ते ‘ज्युली’ या चित्रपटात. खर तर बॉबीच्या यशावर पाय ठेवून निर्मात्यांनी काढलेला ‘ज्युली’ हा एक प्रेमपट; परंतु या चित्रपटात देखील तिने आपली छाप पाडली, मग मात्र तिला मागे वळून पाहावे लागले नाही. १९७८ साली ‘सोलवा सावन’ या चित्रपटाद्वारे प्रवेश केला. आपल्या पहिल्याच चित्रपटात तिला अभिनय दाखविण्याची संधी मिळाली व तिने या संधीचे सोने केले. इतकेच नव्हे तर या नंतर आलेला ‘सदमा’ या चित्रपटातील कमल हसन बरोबरच्या तिच्या अभिनयाला तोड नव्हती. सदमा या सिनेमामधील मनोरुग्ण मुलीची भूमिका रसिक आजही विसरू शकले नाहीत. या चित्रपटात तिचे ते मांजराच्या पिलाला पाहून ‘हरिप्रसाद’ अशी साद घालणे किंवा ओरडणे आजही कानावर तसेच ऐकू येते. पहिल्या दोन चित्रपटांत खरोखरच आपला अभिनय तिने जिवंत केला होता. सदमानंतर तिने आपली जोडी जितेंद्रसोबत जमवली. नायिका म्हणून जितेंद्रसोबत ‘हिम्मतवाला’ मध्ये दाखल झाली व हा चित्रपट सुवर्ण महोत्सवी यश घेऊन गेला. यानंतर टिपिकल हिंदी चित्रपटाची नायिका म्हणून तिने जाग उठा इन्सान, ‘अकलमंद’, तोहफा, मवाली, इन्कलाब, सरफरोश, बलिदान, नया कदम हे चित्रपट स्वीकारले; परंतु हे करीत असतानाच अभिनयाला संधी देणारे चित्रपटदेखील यशस्वी केले. त्यापैकी नगिना या चित्रपटात तिची इच्छाधारी नागीण नजरेत भरली. याचदरम्यान यश चोप्रासारख्या निर्माता दिग्दर्शकाची नजर तिच्यावर गेली व चांदनी हा चित्रपट तिला मिळाला. या चित्रपटात ऋषी कपूर व विनोद खन्ना हे दोन नायक तिच्यासोबत होते. आपल्या प्रियकरावर निस्सीम प्रेम करणारी प्रेयसी तिने रंगवली होती. प्रेमाचा त्रिकोण सांगणाºया यशराजच्या या सिनेमात श्रीदेवीने आपल्या अभिनयाची छाप तर सोडलीच; परंतु एका गाण्यात पार्श्वगायनदेखील केले. ‘रंगभरे बादलसे’ या गीतात तिचा आवाज ऐकायला मिळाला. चांदनी या चित्रपटात तिला आपला नृत्याविष्कार दाखविण्याची संधी मिळाली. हेमा मालिनीचा ‘सीता और गीता’ हा दुहेरी भूमिका असलेला चित्रपट गाजला होता. याच चित्रपटाचा रिमेक करताना श्रीदेवीने आपल्या वेगळ्या अभिनयाचे रंग भरले. रसिक प्रेक्षकांना हेमा मालिनीच्या अभिनयाची आठवण येऊ दिली नाही. हा चित्रपट रिमेक आहे हे तिने विसरायला लावले. ‘चालबाज’मधील तिची ही भूमिका प्रेक्षकांना आवडली. ‘मिस्टर इंडिया’ या चित्रपटात तिने महिला पत्रकाराची भूमिका केली होती; परंतु याच चित्रपटात चार्ली चापलिनचा प्रसंग असा काही सादर केला की, प्रेक्षकांची हसता हसता मुरकुंडी वळून गेली. खुदा गवाहमध्ये तिला; परत दुहेरी भूमिका व तीदेखील अभिनयसम्राट अभिताभ बच्चनसोबत करायला मिळाली. तिची कोणती भूमिका सरस होती हे प्रेक्षक सांगूच शकले नाही. तिने अमिताभजीसमोर दोन्ही भूमिकांत अभिनयाचे रंग भरले. चांदनीच्या यशानंतर आलेला ‘लम्हे’ हा व्यावसायिक यश देऊ शकला नाही; परंतु श्रीदेवीचा अभिनय जबरदस्त होता, जितेंद्रसोबत तिने केलेल्या जवळजवळ २० चित्रपटांंपैकी १६ चित्रपटांना बॉक्स आॅफिस खिडकीवर व्यावसायिक यश मिळाले. ‘जाग उठा इन्सान’ या चित्रपटात तिचा नायक होता मिथुन चक्रवर्ती, यावेळी या दोघांची प्रेमकहाणी रंगवणारे गॉसिप भरपूर झाले; परंतु बोनी कपूर तिच्या आयुष्यात आला आणि दाक्षिणात्य नायिकांची अनुभवी पुरुषाशी लग्न करण्याची परंपरा कायम ठेवली. बºयाच वर्षांनंतर म्हणजे २०१२ साली ‘इंग्लिश विंग्लिश’ या सिनेमामधून तिने पुनरागमन केले. श्रीदेवी परत आल्याचा तिच्या लाडक्या प्रेक्षकांना आनंद झाला. या चित्रपटात एका व्यावसायिकाची इंग्रजी न येणारी पत्नी तिने अशा काही ताकदीने सादर केली की जवाब नही. ‘इंग्लिश विंग्लिश’ या चित्रपटाच्या वेळी तिला भारत सरकारतर्फे ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. २०१७ साली प्रदर्शित झालेला ‘मॉम’ तर जबरदस्त. आपल्या मुलीवर झालेल्या अत्याचाराचा बदला घेणारी खंबीर आई तिने साकारली होती. या दोन्ही चित्रपटांची प्रेक्षकांनी तसेच समीक्षकांनी प्रशंसा केली होती. इतकेच काय फिल्मफेअरचे पुरस्कार बºयाच कालावधीनंतर तिच्या नावावर जमा झाले होते. ‘चांदनी’, खुदा गवाह, गुमराह, लाडला, जुदाई, इंग्लिश विंग्लिश, मॉम या चित्रपटांतील भूमिकांकरिता तिला भारताचा आॅस्कर समजल्या जाणाºया फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. औरंगाबाद शहरात एका पंचतारांकित हॉटेलमध्ये भरलेल्या महिला संमेलनाला ती प्रमुख पाहुणी म्हणून आली होती. त्यावेळी तिच्यासोबत संवाद झाला होता. आपल्या अत्यंत वैविध्यपूर्ण आणि लक्षवेधक भूमिकांमुळे श्रीदेवी आपल्या आठवणीत राहणार आहे. तिच्या चित्रपटातून तिच्यावर चित्रित झालेल्या गाण्यांमधून तिचे दर्शन होत राहील. पैशांकरिता भुकेली असलेली स्त्री आपल्या नवºयाला घटस्फोट देते ही तिची ‘जुदाई’ची भूमिका अविस्मरणीय झाली होती. अलीकडे सामाजिक संस्थांकरिता मदत देण्याकरिता तिने योगदान दिले. तिची काही चित्रपटांतील गाणी विसरणे अशक्यच होय. १) हवा हवाई-मिस्टर इंडिया, २) मेरे हाथो मे-चांदनी, ३) मै तेरा दुश्मन-नगिना, ४) मोरनी बागों में-लम्हे, ५) नैनों मे सपना-हिम्मतवाला, ६) ना जाने कहांसे आई हैं-चालबाज, ७) गौराई माझी लाडाची-लाडाची गं...-इंग्लिश विंग्लिश, हिंदी चित्रपटसृष्टीतील चांदनी निखळली असली तरी तिचे टॉपवरचे स्थान अढळ राहील यात शंका नाही. तिची माधुरी दीक्षितसोबत स्पर्धा लावण्याचा समीक्षकांनी प्रयत्न केला; परंतु तिने हे सर्व झिडकारले होते. ती आपल्या भूमिका विविध ढंगांनी सादर करीत गेली व अचानक १९९८ साली स्टॉप घेतला; परंतु जेव्हा पुन्हा पुनरागमन केले तेव्हा दोन्ही भूमिका पुरस्काराच्या जवळ नेऊन ठेवल्या. जबरदस्त अभिनय, उत्कृष्ट नृत्यांगना डोळ्यातून अभिनय, या सर्व गुणांमुळे ती शेवटपर्यंत टॉपवरच राहिली. तिची एक्झिट रसिकांना स्वीकारणे जड जाणार आहे. आता कुठे दुसरी इनिंग सुरू केली होती, तर नियतीने तिला बाद केले.
सिनेसृष्टीची ‘चांदनी’ निखळली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 12:14 AM