पंतप्रधाननरेंद्र मोदी हे गरिबांचे तारणहार आहेत. देशातील गरिबांच्या गरजा आणि आकांक्षा या दोन्हींचेही भान ठेवून मोदीजींनी गेल्या सात वर्षांत पंतप्रधान म्हणून काम केले आहे. गरिबांच्या मूलभूत गरजा पूर्ण होण्यासाठी सरकारने मदतीचा हात दिलाच पाहिजे, या भावनेने त्यांनी केंद्र सरकारच्या योजना राबवल्या. त्याचबरोबर गरिबांनी गरिबीतून बाहेर पडून स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे, यासाठीही पुढाकार घेतला.
पंतप्रधान झाल्यावर मोदीजींनी देशातील गरिबांसाठी एक मूलभूत आणि महत्त्वाचे काम केले. नरेंद्र मोदी यांनी गरीब कल्याणचे पहिले काम केले ते म्हणजे लोकांची बँकेमध्ये खाती उघडली. जनधन योजना! माझ्या देशात एकही माता भगिनी ही चुलीवर स्वयंपाक करणार नाही, तिला गॅस मिळाला पाहिजे, या निर्धाराने मोदी सरकारने १६ जुलै २०२१पर्यंत ८ कोटी ३ लाख ३९,९९३ उज्ज्वला गॅस कनेक्शन दिली. देशात शौचालये बांधण्यासाठी पुढाकार घेतला. सर्वसामान्य घरातील कोट्यवधी महिलांचा महत्त्वाचा प्रश्न सुटला.
२ कोटी ८१ लाख ६९ हजार ७२४ घरांना वीज पुरवठा सुरू झाला. मोदीजींनी गहाणवट न देता कर्ज देणाऱ्या मुद्रा योजनेत होतकरू तरुणांना कर्जवाटप केले. पंतप्रधान कौशल्य योजनेमधून ९२ लाख तरुणांना कौशल्य प्रशिक्षण दिले. केवळ बारा रुपयांमध्ये अपघात विमा योजना लागू केली. असंघटित कामगारांसाठी अटल पेन्शन योजना आणली. दरमहा केवळ ४२ रुपये एवढी रक्कम १८ ते ६० वयाच्या कालावधीत टाकुन साठ वयानंतर तहहयात एक हजार रुपये पेन्शन मिळणार. आता ती मर्यादा पाच हजार रुपयांपर्यंत केली आहे. त्यासाठी दरमहा २१० रुपये भरण्याची गरज आहे. अठरापेक्षा अधिक वयाची व्यक्ती या योजनेत सहभागी झाली तर हप्ता वाढतो. साठनंतर दरमहा पाच हजार रुपये पेन्शन मृत्यूपर्यंत मिळणार. पुरुषाचा मृत्यू झाल्यानंतर पत्नीला पाच हजार रुपये पेन्शन मृत्यूपर्यंत मिळणार. दोघांच्या मृत्यूनंतर मुलांना साडेआठ लाख रुपये मिळणार.
आतापर्यंत तीन कोटी सहा लाख लोकांनी या योजनेचा फायदा घेऊन आयुष्य सुरक्षित केले आहे. लॉकडाऊननंतर गरीब महिलांच्या खात्यात तीन महिने दरमहा प्रत्येकी पाचशे रुपये, तीन महिने उज्ज्वला गॅस योजनेमधला गॅस सिलिंडर मोफत, अपंग आणि वृद्धांना जी पेन्शन मिळते त्यामध्ये तीन महिन्यात हजार रुपये जास्तीचे अशी मदत केली. त्याचबरोबर ऐंशी कोटी लोकांना येत्या नोव्हेंबरपर्यंत प्रतिमाणसी पाच किलो तांदूळ किंवा पाच किलो गहू मोफत उपलब्ध केले. त्यांनी राबविलेला गरीब कल्याणाचा अजेंडा हा भाजपचा राजकीय कार्यक्रम किंवा डावपेचाचा भाग नाही तर मूलभूत विचार आहे.