डाॅ. विजय दर्डा - चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह
चंद्रयान-३ चंद्रावर उतरण्याची वेळ जसजशी जवळ येत होती तसतशी भारतवासीयांच्या उरातील धडधड वाढत होती. त्यातच रशियाच्या ‘लुना-२५’ या चंद्रयानाचा चक्काचूर झाल्याची बातमी आली आणि ही धडधड आणखी वाढली. माझे मन सांगत होते, या वेळेला आपल्याला यश येणारच ! - त्याचे एक कारणही आहे. संसदीय समितीचा सदस्य या नात्याने मला अनेकदा इस्रो आणि इतर अंतराळ संशोधन संस्थांमध्ये जाण्याची संधी मिळाली आहे. मी आपल्या शास्त्रज्ञांची निष्ठा, त्यांचे समर्पण, अपुऱ्या साधन सामग्रीनिशी यशासाठी धडपडणारी जिद्द पाहिली आहे.
रशियाचे ‘लुना-२५’ कोसळले त्या दिवशी माझा एक सहकारी म्हणाला, भारताला दक्षिण ध्रुवावरच जाण्याची काय गरज होती? चंद्रावर उतरायचे होते तर कुठेही उतरता आले असतेच की! नाम तो वैसेभी हो जाता, सर!मी त्याला विचारले, चंद्रावर सगळ्यात आधी कोण उतरले? तो म्हणाला, नील आर्मस्ट्राँग. माझा पुढचा प्रश्न होता, दुसरे कोण होते? - तो विचारात पडला. अल्वीन एल्ड्रिनचे नाव त्याच्या लक्षात नव्हते.या सहकाऱ्याला मी म्हणालो, ‘चंद्रावर आतापर्यंत १२ अमेरिकन अंतराळवीर जाऊन आले. सगळ्यात शेवटी हॅरिसन स्मिट गेला होता. चंद्रावर पाऊल ठेवणाऱ्यांच्या यादीत पेटेक कोन्राड, ॲलन बीन, एलन शेफर्ड, एडगर मिशेल, डेव्हिड स्कॉट, जेम्स एर्विन, जॉन यंग, चार्ल्स ड्युक आणि यूजीन सेरनन यांचा समावेश आहे. पण, नील आर्मस्ट्राँगवगळता इतरांची नावे कुणाला आठवतात का? - जो पहिला असतो तो जगाच्या लक्षात राहतो!’
चंद्रावरच्या एखाद्या सोप्या ठिकाणी भारताने चंद्रयान उतरवले असते तर आपला नंबर अमेरिका, रशिया आणि चीननंतर चौथा लागला. चौथ्याला कोण लक्षात ठेवणार? जास्तीत जास्त काळ पूर्णपणे अंधारात राहणाऱ्या अत्यंत कठीण आणि रहस्यमय अशा प्रदेशात चंद्रयान-३ उतरवून भारताने पहिला नंबर मिळवला आहे. इतिहासाच्या पानात याची नोंद झाली आहे.ही पूर्णपणे स्वदेशी योजना आहे. इतक्या कमीत कमी खर्चात हे साध्य केले गेले याचे जगाला आश्चर्य वाटले. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पहिल्यांदा पाऊल ठेवण्याच्या स्पर्धेत रशियाने ‘लुना-२५’ साठी १६०० कोटी रुपये खर्च केले. बेफाम गतीने ते यान निघाले होते. आपल्या शास्त्रज्ञांनी तर याच्या निम्माही खर्च केला नाही. चंद्रयान-३ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवण्यासाठी आलेला खर्च हॉलीवूडच्या अनेक चित्रपटांच्या निर्मितीसाठी येणाऱ्या खर्चापेक्षाही कमी आहे. चंद्राचा दक्षिण ध्रुव जवळपास २५०० किलोमीटर रुंद असून, त्याच्या किनाऱ्यावर आठ किलोमीटरचे खोल विवर आहे. हे सौरमंडळातील सर्वांत जुने विवर मानले जाते.
चंद्रयान- ३ने जी ताजी छायाचित्रे पाठवली त्यातही खोल खड्डे आणि ओबडधोबड जमीन दिसते आहे. त्या खड्ड्यात आणि डोंगरांची सावली असलेल्या भागात तापमान शून्यपासून २०० अंशापेक्षाही खाली जाते. येथे बर्फाचे थर आहेत असे मानले जाते. या भागात पाणी असल्याची शक्यता तपासली जात आहे. चंद्रावर पाणी असण्याची शक्यता २००८ मध्ये पाठवण्यात आलेल्या चंद्रयान-१ने वर्तवली होती. चंद्रावर आणखी काय काय आहे आणि त्याचा पृथ्वीवर काय उपयोग होऊ शकतो हे येणारा काळच सांगेल. माणूस चंद्रावर वस्ती करील ही शक्यताही त्यात आली.या चांद्रमोहिमेतून आपल्याला काय मिळेल? किती मिळेल? - या सगळ्या प्रश्नांची उत्तरे काळच देईल. पण, काहीतरी हाती लागेलच! माणसाने अंतरिक्ष धुंडाळले नसते तर आपली संवाद यंत्रणा अत्याधुनिक झाली असती का? आपण इंटरनेटचे जाळे विस्तारू शकलो असतो का? चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचल्यामुळे भारताची छाती रुंद झाली आहे, हे नक्की! भारतीय अवकाश शास्त्रज्ञांच्या प्रतिभेचे सामर्थ्य जगातील सर्व वैज्ञानिक संस्थानी मान्य केले आहे. भारतीय माणूस आपल्या देशाच्या यानात बसून चंद्रावर जाईल हा दिवस फार दूर नाही. एका क्षेत्रात असा विश्वास कमावला की, इतरही क्षेत्रात त्याचा उपयोग होतो. जगभर आपल्या तिरंग्याचा मान वाढवणाऱ्या आपल्या शास्त्रज्ञांना, विशेषत: महिला शास्त्रज्ञांना सलाम! आज आपल्या संसदेत भले स्त्रियांची संख्या कमी असेल; परंतु इस्रोमधल्या स्त्रियांची संख्या आणि त्यांची गौरवगाथा अद्वितीय आहे.
ही योजना वास्तवात उतरवण्यासाठी देशाचे नेतृत्व सदैव वैज्ञानिकांबरोबर राहिले यात शंका नाही. पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यापासून इंदिरा गांधी, अटलबिहारी वाजपेयी आणि नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत सर्वांचाच दृष्टिकोन व्यापक राहिला आहे. परंतु, जो पाया घालतो तो द्रष्टा असतो... आणि राजकारण बाजूला ठेवून मोठ्या मनाने हे सर्वांनाच कबूल करावे लागेल, की हे श्रेय पं.नेहरूंनाच जाते!अंगाई गीतापासून प्रणय गीतांपर्यंत सर्वत्र आपले चांदणे पसरलेल्या चंद्रावर आपण पोहोचलो खरे, आता अर्थसंकल्पात अंतराळ संशोधनासाठी असलेली तरतूद वाढवली पाहिजे. सध्या भारताच्या एकूण अर्थसंकल्पाच्या केवळ ०.३४ टक्के इतका खर्च अंतराळ मोहिमांवर केला जातो. दुसरी गोष्ट अशी की, शाळा आणि कॉलेजातील विज्ञान प्रयोगशाळांना संशोधनाच्या पातळीवर अत्याधुनिक सुसज्ज आणि सशक्त साधनसामग्री दिली पाहिजे. यासाठी स्वतंत्र अर्थसंकल्प असला पाहिजे. मोठा होऊ घातलेला शास्त्रज्ञ भारताच्या एखाद्या खेडेगावात भविष्याची वाट पाहत नसेल कशावरून?चला, तूर्तास शैलेंद्र यांचे एक गाणे गुणगुणावे म्हणतो... ये चंदा ना रुसका, ना ये जापानका, ना ये अमेरिकन, प्यारे ये तो है हिंदुस्तान का!