भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने बुधवारी आपल्या शीरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला! भारताचे आजवरचे सर्वात शक्तिशाली उपग्रह प्रक्षेपण वाहन असलेल्या जीएसएलव्ही मार्क-३ या रॉकेटने जीसॅट-२९ या उपग्रहास भूस्थिर कक्षेत यशस्वीरित्या स्थानापन्न केले. गत काही वर्षात उपग्रह प्रक्षेपण हा इस्रोच्या हाताचा मळ झाला आहे. इस्रोने उपग्रह प्रक्षेपणाच्या क्षेत्रात एवढी विश्वासार्हता प्राप्त केली आहे, की तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात पुढे असलेले विकसित देशही त्यांच्या उपग्रह प्रक्षेपणासाठी इस्रोची मदत घेऊ लागले आहेत; मात्र आतापर्यंत इस्रोचे हे यश कमी वजनाच्या आणि ध्रुवीय कक्षेत स्थापन करावयाच्या उपग्रहांपुरते मर्यादित होते. जड वजनाच्या आणि भूस्थिर कक्षेत स्थापन करावयाच्या उपग्रहांच्या प्रक्षेपणासाठी मात्र भारतालाही विकसित देशांच्या उपग्रह प्रक्षेपण वाहनांची मदत घ्यावी लागत होती. जीएसएलव्ही मार्क ३ या प्रक्षेपण वाहनाच्या विकासामुळे आता मात्र भारताला चार हजार किलोग्राम वजनापर्यंतचे उपग्रह स्वत:च प्रक्षेपित करता येतील. बुधवारी प्रक्षेपित करण्यात आलेल्या जीसॅट-२९ या उपग्रहाचे वजन ३,४२३ किलोग्राम असून, भारताच्या भूमीवरून प्रक्षेपित करण्यात आलेला हा आजवरचा सर्वात जड उपग्रह आहे.जीएसएलव्ही मार्क-३ च्या बुधवारच्या प्रक्षेपणाचे यश केवळ जड उपग्रह भारतीय भूमीवरून भूस्थिर कक्षेत प्रक्षेपित करण्यापुरतेच मर्यादित नाही, तर या यशस्वी प्रक्षेपणामुळे चंद्रयान-२ आणि गगनयान या भारताच्या दोन भविष्यातील महत्त्वाकांक्षी अवकाश प्रकल्पांच्या पंखांना बळ लाभले आहे; कारण उपरोल्लेखित दोन्ही अवकाशयानांच्या प्रक्षेपणासाठी जीएसएलव्ही मार्क-३ चा वापर करण्यात येणार आहे. चंद्रयान-२ चे प्रक्षेपण तर आता अवघ्या दोन महिन्यांवरच येऊन ठेपले आहे. भारताच्या समानव अंतराळ मोहिमेसाठी अजून तीन वर्ष वेळ असला तरी, त्या मोहिमेसाठी वापरण्यात येणार असलेल्या गगनयान या अवकाशयानाच्या दोन मानवविरहित चाचण्या घेण्यात येणार असून, त्यापैकी पहिली चाचणी डिसेंबर २०२० मध्ये म्हणजे उण्यापुऱ्या दोनच वर्षांनी होणार आहे. या पाशर््वभूमीवर बुधवारचे प्रक्षेपण जर अयशस्वी अथवा अंशत: यशस्वी ठरले असते तर, चंद्रयान-२ आणि गगनयान या दोन्ही मोहिमांवरच प्रश्नचिन्ह लागले असते; मात्र बुधवारचे जीएसएलव्ही मार्क-३ चे उड्डाण ठरल्याप्रमाणे अगदी तंतोतंत झाले आणि इस्रोच्या क्षमतेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले.चंद्रयान-२ आणि गगनयान या दोन महत्त्वाकांक्षी अंतराळ मोहिमांच्या पंखाना बळ प्रदान करण्यासोबतच, इस्रोसाठी हलक्या उपग्रहांप्रमाणेच जड उपग्रहांच्या प्रक्षेपणाचा आंतरराष्ट्रीय बाजार खुला करण्याचा मार्गही जीएसएलव्ही मार्क-३ च्या बुधवारच्या यशस्वी प्रक्षेपणामुळे खुला झाला आहे. जीएसएलव्ही मार्क-३ चे आजवर केवळ तीनदाच प्रक्षेपण झाले आहे. त्यापैकी प्रथम प्रक्षेपण प्रायोगिक होते, तर बुधवारच्या प्रक्षेपणासह इतर दोन प्रक्षेपण विकासात्मक (डेव्हपलमेंटल) होते. चंद्रयान-२ साठी होणार असलेले प्रक्षेपण हे जीएसएलव्ही मार्क-३ चे प्रथम परिचालनात्मक (आॅपरेशनल) प्रक्षेपण असेल; मात्र आजवरच्या तीनही प्रक्षेपणांदरम्यान जीएसएलव्ही मार्क-३ ने ज्या प्रकारे अपेक्षित कामगिरी बजावली आहे, ती बघू जाता भविष्यात पीएसएलव्हीप्रमाणेच जीएसएलव्ही मार्क-३ हेदेखील इस्रोच्या भात्यातील अमोघ व विश्वसनीय अस्त्र ठरेल, यात शंका वाटत नाही.गत काही वर्षात इस्रोने बºयाच देशांचे उपग्रह प्रक्षेपित केले असले तरी, उपग्रह प्रक्षेपणाच्या जागतिक बाजारातील भारताचा वाटा अद्यापही नगण्य आहे. भारतीय उपग्रह प्रक्षेपकांद्वारा उपग्रह प्रक्षेपित करण्याचा खर्च तुलनेत बराच कमी येत असल्यामुळे भारताला या क्षेत्रात चांगली संधी आहे; मात्र त्यामध्ये जड वजनाच्या दळणवळण उपग्रहांच्या भूस्थिर कक्षेतील प्रक्षेपणासाठी आवश्यक असलेल्या मोठ्या प्रक्षेपकाची वानवा आणि वर्षभरातील एकूण प्रक्षेपणांच्या संख्येवरील मर्यादा हे दोन प्रमुख अडथळे होते. जीएसएलव्ही मार्क-३ च्या यशामुळे आता इस्रोच्या भात्यात मोठ्या प्रक्षेपकाचा समावेश झाला आहे खरा; पण प्रक्षेपणांच्या संख्येची मर्यादा हा अडथळा कायमच आहे. त्यासाठी इस्रोला खासगी कंपन्यांचा सहभाग घ्यावा लागेल. पीएसएलव्हीसंदर्भात इस्रोने तशी सुरुवात केली आहे. भविष्यात जीएसएलव्ही मार्क-३ च्या उत्पादनातही खासगी कंपन्यांना सहभागी केल्यास, प्रक्षेपकांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन शक्य होईल आणि मग उपग्रह प्रक्षेपणाच्या जागतिक बाजारपेठेतील मोठा वाटा भारताच्या हिश्शाला येऊ शकेल.इस्रोचा आजवरचा इतिहास बघू जाता, भविष्यात इस्रो नक्कीच उपग्रह प्रक्षेपणाच्या जागतिक बाजारपेठेवर काबीज होईल आणि देशाला मोठ्या प्रमाणात विदेशी चलन मिळवून देईल; पण आज तमाम भारतीयांना वेळोवेळी जगासमोर मान ताठ करण्याचे क्षण उपलब्ध करून देण्याची जी कामगिरी इस्रो बजावित आहे तीदेखील अतुलनीय अशीच आहे!
- रवी टालेravi.tale@lokmat.com