देश बदलो न् बदलो सोलापूर जिल्ह्यातील सर्वच पक्षातील नेत्यांचा मात्र ‘मूड बदल रहा है...’ या बदललेल्या ‘मूड’चा परिणाम राजकारणापेक्षाही विकासाची गती वाढविण्यासाठी होवो...राज्याला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि अनेक वजनदार खात्याचे मंत्री देणाºया सोलापूर जिल्ह्याची राजकीय हवा सध्या आल्हाददायक बनू लागली आहे. ताण-तणाव, डावपेच आणि आपल्याच घरातील स्पर्धकांचे पंख छाटून आपलेच घर ‘बडा घर, पोकळ वासा’ बनविण्याच्या मोहिमा देखील थंडावण्याच्या दिशेने वाटचाल करू लागल्या आहेत. वातावरणातील हा बदल राजकारण्यांबरोबरच सर्वसामान्य नागरिकांनादेखील जाणवू लागला आहे. आता आपणही ‘मतदार राजा’ या भूमिकेला साजेसा पेहराव करण्याच्या तयारीला लागावे अशी भावना झाली तर आश्चर्य वाटू नये. सुशीलकुमार शिंदे यांचा उल्लेख नेहमीच ‘सिर्फ नामही काफी है’ या कौतुकपंक्ती जोडूनच नेहमी होतो. तसे ते खरेही आहे. सुशीलकुमार शिंदेंसारखा राष्टÑीय पातळीवरील नेता तयार व्हायला अनेक वर्षे जातात. त्या वर्षांमध्ये तयार होणाºया नेत्यांबरोबरच ज्या भागात तो तयार होतो त्यांनाही खूप मोठे योगदान द्यावे लागते. त्याच कारणाने सुशीलकुमारांची महती आणि ज्येष्ठत्व आता त्यांच्या पदावर नाही तर नावातच आहे हे वास्तव त्यांच्या विरोधकांनाही स्वीकारावे लागते.मोहिते-पाटील घराण्याचा राजकारणातील पूर्वीचा दबदबा राहिला नसला तरी खा.विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या लोभस व्यक्तिमत्त्वामुळे अस्तित्त्व मात्र टिकून आहे. गेल्या दहा वर्षात जिल्ह्याच्या राष्टÑवादीच्या राजकारणात तरुणतुर्कांनी बाजी मारली. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांनी सुधाकरपंत परिचारक यांच्या मुत्सद्दी छायेखाली तरुण तुर्कांचे नेतृत्व स्थापित केले. या पार्श्वभूमीवर २०१४ पासून झालेल्या सर्वच निवडणुका या नवे रंग दाखविणाºया ठरल्या.तब्बल दोन तपापासून ‘लोकमंगल’ परिवाराला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपत राजकारण करणाºया सुभाष देशमुख यांची मंत्रिमंडळात थोडी उशिरा एन्ट्री झाली. त्यापूर्वी त्यांचे पक्षातीलच सख्खे विरोधक विजयकुमार देशमुख यांनी राज्यमंत्री म्हणून मुख्यमंत्री फडणवीसांसोबतच मंत्रिपदाची शपथ घेतली होती. मोदी आकर्षण, राज्यावरील भाजपची सत्ता आणि सोलापूर महापालिकेतील आजवर झालेल्या ओंगळवाण्या कारभाराचे भांडवल करीत दोन्ही देशमुखांनी महापालिका अलगद खिशात टाकली! पण दोघांमध्ये सख्खेपणाचे राजकारण सुरूच राहिले. त्याचा त्रास सोलापूरच्या जनतेला सोसावा लागला. जिल्ह्यातील भाजपच्या कलागती इथल्या संघ परिवाराला कानावर हात ठेवून पाहण्यापलीकडे काहीही उरले नव्हते. अखेर मुख्यमंत्र्यांनीच दोन्ही देशमुख आणि त्यांच्या निष्ठावन सवंगड्यांना एका छताखाली आणण्यासाठी तंबी द्यावी लागली. जिल्ह्यातील प्रमुख पक्षांच्या गोटात गेल्या महिन्यापर्यंत अशीच अस्वस्थता होती. आता सर्वांचाच मूड बदलतो आहे. सुशीलकुमार लोकसभेच्या तयारीला लागल्याचे संकेत मिळत आहेत. दोन्ही देशमुखदेखील ‘एकोपा नाट्य’ निष्ठेने रंगवत आहेत. पवार काका-पुतणे आजतरी जिल्ह्यातील राष्टÑवादी मजबुतीच्या प्रयत्नात दिसतात. लोकसभा व विधानसभा निवडणुका २०१९ मध्ये एकत्रच होतील हा अंदाज बांधत सर्वच विधानसभा मतदारसंघातील नेत्यांचे ‘बैल-बारदाणा’ जमविण्याचे काम सुरू झाले आहे. एकूणच ‘सबका मूड बदल रहा है...’- राजा माने
सबका मूड बदल रहा है...
By राजा माने | Published: January 19, 2018 3:29 AM