- धर्मराज हल्लाळेराज्यातील धर्मादाय संस्था, विशेषत: नानाविध धार्मिक स्थळे यांच्या बँक खात्यांवर मोठ्या रकमा वर्षानुवर्षे पडून आहेत़ हा पैसा भाविक भक्तांकडून आलेला सार्वजनिक निधी आहे़ बहुतांश ठिकाणी त्याचा वापर होत नाही़ अपवाद काही संस्था व देवस्थाने नियमितपणे सामाजिक उपक्रमांना मदत करतात़ एकीकडे ही परिस्थिती, तर दुसरीकडे मराठवाड्यात अनेक शेतकºयांनी आपल्या मुलीच्या विवाहासाठी पुरेसे पैसे नाहीत म्हणून जीवनयात्रा संपविली़ शेतमालाचे उत्पादन, त्यावर होणारा खर्च आणि मिळणारा भाव हे सूत्रच बिघडलेले आहे़ शेती व्यवस्था कोलमडल्याने शेतकरी सातत्याने अडचणीत आहे़ त्याची चर्चा विविध अंगाने होत राहते़ मात्र प्रश्न कायम आहेत़ त्याचवेळी शेतकरी आत्महत्यांची कारणमीमांसा करीत असताना मुलीच्या विवाहाचा होणारा खर्च हा त्या शेतकरी पित्यासमोरील चिंतेचा विषय असतो़या गंभीर विषयाची जाणीव असलेल्या राज्य धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी राज्यातील धर्मादाय संस्थांना पुढाकार घेण्याचे आवाहन केले होते़ त्याला प्रतिसाद देत मराठवाड्यासह सबंध राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी धर्मादाय संस्थांच्या विश्वस्तांनी समित्या गठित केल्या आहेत़ कलम ४१ (क) नुसार समित्यांनी नोंदणी करून त्या-त्या गावातील धर्मादाय शिक्षण संस्था, देवस्थाने तसेच सर्वधर्मीय स्थळांच्या विश्वस्तांनी आपल्या संस्थांकडून आर्थिक योगदान देणे सुरू केले आहे़ साधारणत: प्रत्येक जिल्ह्यामध्ये १०० जोडप्यांचे सामूहिक विवाह सोहळ्यात विवाह लावले जातील़ प्रामुख्याने अल्पभूधारक शेतकºयांच्या मुलीच्या लग्नाचा खर्च उचलण्याची जबाबदारी या संस्थांनी घेतली आहे़राज्यामध्ये वर्षाला सुमारे तीन लाख विवाह होतात़ परंपरेनुसार बहुतांश विवाह सोहळ्यांमध्ये अक्षता म्हणून लाखो टन धान्य वापरले जाते़ दरम्यान, या सर्व सामूहिक विवाह सोहळ्यांमध्ये परंपरा व भावना जपण्यासाठी विवाह सोहळ्याच्या केवळ मंचावरच धान्याची अक्षता असेल अन् सभा मंडपात फुले दिली जातील, असे नियोजन या संस्थांनी केले आहे़ ज्यामुळे लाखो टन धान्य मातीमोल होणार नाही़ हा अतिशय साधा व सोपा उपचार वाटत असला तरी एक मूलभूत संदेश देण्याचा धर्मादाय संस्थांचा प्रयत्न असणार आहे़ या सामूहिक सोहळ्यात स्त्री जन्माचे स्वागत करण्याची शपथही दिली जाईल़मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या या प्रामुख्याने दुष्काळी परिस्थितीमुळे झाल्या़ डोक्यावर कर्जाचा डोंगर, मुलीच्या विवाहाची चिंता हे विषय शेतकरी कुटुंबात गंभीर बनतात़ अशावेळी धर्मादाय आयुक्त डिगे यांनी केलेले आवाहन आणि राज्यातील धर्मादाय संस्थांनी घेतलेला पुढाकार सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल आहे़ विवाहाच्या खर्चाबरोबरच हुंड्यासारखी कुप्रथा हद्दपार करण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे़ कितीही प्रबोधन झाले असले वा कायद्याचा बडगा असला तरी ग्रामीण भागात अजूनही हुंडा देणे-घेणे सुरू असते हे उघड सत्य आहे़ तरीही लातूर जिल्ह्यातील आनंदवाडी गौरसारखे एखादे अख्खे गाव हुंडा देणार नाही, घेणार नाही, असा ठराव घेते, हेही चित्र आहे़ त्याचा प्रचार, प्रसार झाला पाहिजे़ हुंडा न घेणाºया कुटुंबाचे जाहीरपणे कौतुक केले पाहिजे़ मात्र आजही काही भागात हुंडा हा प्रतिष्ठेचे प्रतीक मानला जातो़ या कुप्रथेचाही मोठेपणा मिरविला जातो़ खरे तर म्हटले पाहिजे, चला हुंड्याला बदनाम करू या!
धर्मादाय संस्थांचा शेतकऱ्यांसाठी पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2018 12:26 AM