तू मेरी नहीं तो और किसी की भी नहीं हो सकती... एकतर्फी प्रेमाचा हा ‘फॉर्म्युला’ आजकाल सर्वत्र पाहायला मिळतो. प्रेमात कोणी नकार दिला, नाही म्हटलं किंवा दुसऱ्या कुणा व्यक्तीला पसंत केलं, तर त्या तरुणीला थेट संपवूनच टाकायचं.. मानवतेला काळिमा फासणारा हा प्रकार सध्या तरुणाईत झपाट्यानं पसरतो आहे. केवळ भारतच नाही, तर जगभरात सर्वत्र या प्रकाराला जणू काही उधाण आलं आहे. आपण कुठल्या कालखंडात जगतो आहोत? असा प्रश्न उपस्थित व्हावा अशी परिस्थिती सध्या आहे.
इंग्लंडमध्ये नुकतीच घडलेली एक घटना याच मानसिकतेचं पुढचं टोक अधोरेखित करते. मोहम्मद अर्सलन हा पाकिस्तानमधील एक २७ वर्षीय तरुण. त्याच्याच देशात, त्याच्याच गावात राहणारी त्याची लहानपणाची ‘मैत्रिण’ हिना बशीर. शाळेत असल्यापासून मोहम्मदचं हिनावर एकतर्फी प्रेम. हिना केवळ अकरा वर्षांची असल्यापासून तो तिच्या मागे लागला होता. ‘माझं तुझ्यावर प्रेम आहे, मला तुझ्याशी लग्न करायचं आहे’, असा लकडा त्यानं तिच्यामागे लावला होता. खरं तर प्रेम, लग्न वगैरे गोष्टी त्यावेळी हिनाच्या भावविश्वातच नव्हत्या. त्यामुळे तिनं या गोष्टीला संमती वगैरे देण्याचा प्रश्नच नव्हता, पण जेव्हा कळायला लागलं, तेव्हाही तिनं मोहम्मदला स्पष्टपणे सांगितलं, तू माझ्या मागे लागू नकोस. मला ना तुझ्याशी लग्न करायचं आहे, ना मला अशा गोष्टींत रस आहे. सध्या मला फक्त माझं शिक्षण, माझं करिअर आणि माझ्या आई-वडिलांचं स्वपन पूर्ण करायचं आहे.
हीनानं इतक्या स्पष्टपणे सांगूनही मोहम्मदला ‘कळलं’ नाही. प्रेमाचं आवतन घेऊन तो तिच्या मागे फेऱ्या मारतच होता. काही काळानंतर म्हणजे नोव्हेंबर २०२१मध्ये हिना पुढील शिक्षणासाठी लंडनला गेली. तिथे कॉव्हेन्ट्री युनिव्हर्सिटीत तिनं बिझनेस मॅनेजमेंटला ॲडमिशन घेतली. ती पार्टटाइम जॉबही करायला लागली. तिथे आपल्या आयुष्यात ती रममाण झाली. मोहम्मदचा त्रास आता संपला, असं तिनं गृहित धरलं. खरं तर तिनं तो विषयही आपल्या डोक्यातून पूर्णपणे पुसून टाकला.
हिना लंडनला गेल्यानंतर मात्र मोहम्मद अधिकच अस्वस्थ झाला. काय करू आणि काय नको, असं त्याला झालं. फैसलाबाद युनिव्हर्सिटीमधून त्यानं मॅथ्स आणि क्वाण्टम फिजिक्सची मास्टर्स डिग्री घेतलेली होती. एका फार्मसी कंपनीत मॅनेजरची नोकरीही तो करीत होता. पण हिना आता डोळ्यांनाही दिसत नाही, म्हटल्यावर तो फारच सैरभैर झाला.
हिनाला पुन्हा भेटता यावं, तिच्यामागे लग्नाचा लकडा लावता यावा म्हणून या पठ्ठ्यानं काय करावं?.. हिना लंडनला गेल्यानंतर काही महिन्यांतच यानंही आपल्या नोकरीला रामराम ठोकला आणि आधीची मास्टर्स डिग्री हातात असतानाही डाटा सायन्स ॲण्ड ॲप्लिकेशन्सच्या मास्टर्स डिग्रीसाठी युनिव्हर्सिटी ऑफ इसेक्समध्ये ॲडमिशन घेतली. तिथे पार्ट टाइम जॉबही सुरू केला.
लंडनमध्ये आल्यावर त्यानं पुन्हा हिनाचा पिच्छा पुरवायला सुरुवात केली. ‘माझ्याशीच लग्न कर’, म्हणून त्यानं इथेही तिला सळो की पळो करून सोडलं. हिनानं अर्थातच आताही प्रत्येक वेळी त्याला नकारच दिला. इथपर्यंत ठीक होतं, पण जेव्हा त्याला कळलं, हिनाचं दुसऱ्या एका तरुणावर प्रेम आहे, मग मात्र त्याच्या संतापाचा कडेलोट झाला. काही कारणानं त्यानं कसंबसं हिनाला आपल्या रुमवर बोलवलं आणि तिचा कायमचा काटा काढला. त्यानं हिनाचा गळा दाबून खून केला. एका मोठ्या सुटकेसमध्ये तिचा मृतदेह कोंबला आणि एका सुनसान जागी ही सुटकेस फेकून दिली !
एवढ्यावरच तो थांबला नाही. हिनाचा मोबाइल, त्यातली कॉल, मेसेज हिस्ट्री त्यानं पूर्णपणे तपासली. तिचं कोणावर प्रेम आहे, ते काय करतात, कुठे जातात, काय काय बोलतात?.. त्यांच्या संभाषणाची हिस्ट्री त्यानं उकरून काढली. अथपासून इतिपर्यंत त्याचा ‘अभ्यास’, विश्लेषण केलं. त्यानंतर हिनाच्या मोबाइलमध्ये असलेला आपला मोबाइल नंबर, त्यानं तिला पाठविलेले आणि तिनं त्याला पाठविलेले नकाराचे मेसेज.. हे सारं सारं डिलिट करून टाकलं. त्यानंतरच त्याचं समाधान झालं..
किमान वीस वर्षांची शिक्षाआपल्यावर आता कोणीच संशय घेणार नाही, असं त्याला वाटत होतं, पण लंडनचे पोलिस त्याच्यापर्यंत पोहोचलेच. हिना आणि स्वत:च्या मोबाइलमधला त्यानं डिलिट केलेला डाटाही पोलिसांनी रिकव्हर केला. रीतसर त्याच्यावर खटला भरला गेला. लंडन न्यायालयानं त्याला खुनाच्या गुन्ह्यात दोषी ठरवलं. एकतर्फी प्रेमात पार पाकिस्तानातून लंडनमध्ये येऊन आपल्या प्रेयसीचा खून करणं म्हणजे क्रौर्याचा कळस असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे. या गुन्ह्यात त्याला आता किमान वीस वर्षांची सजा होईल.