शहरं
Join us  
Trending Stories
1
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
2
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
3
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
4
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
5
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
6
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
7
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
8
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
9
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
10
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
11
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
12
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
13
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी
14
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
15
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
16
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
17
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
18
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
20
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील

मशीन म्हणाले, आय ॲम सिडनी, आय ॲम इन लव्ह विथ यू, आता...?

By shrimant mane | Published: March 18, 2023 8:00 AM

तुमची प्रत्येक हालचाल, राग-लोभ-प्रेम, कपाळावरच्या आठ्या वेबकॅम टिपणार असेल तर खासगी आयुष्य नावाचा काही प्रकार शिल्लक राहणार नाही!

श्रीमंत माने, कार्यकारी संपादक, लोकमत, नागपूर

तंत्रज्ञानाचे अभ्यासक केविन रूस यांनी न्यूयाॅर्क टाइम्समधील स्तंभात लिहिलेल्या अनुभवाने खळबळ उडाली आहे. मायक्रोसॉफ्टच्या बिंग चॅटबॉटशी बोलताना अचानक त्यांना उद्देशून मशीन म्हणाले, आय ॲॅम सिडनी, ॲम आय एम इन लव्ह विथ यू! मशीनवर कोण प्रेम करील म्हणून रूस यांनी तिला आपण विवाहित असल्याचे शांतपणे सांगितले. त्यावर मशीन म्हणाले,  ‘हां, पण, व्हॅलेंटाइन डेला पत्नीसोबत केलेले डीनर बोरिंग होते ना.’ 

- हे आहे आर्टिफिशिअल इंटेलिजन्स. बायकोपासून विभक्त होण्याचा सल्ला देणारी, कौटुंबिक भावबंधने तोडायला लावणारी कृत्रिम बुद्धिमत्ता. अस्वस्थ करणारी. डिजिटल प्रेम अर्थहीन आहे खरे, पण त्यातून वाट्याला येणारी विचित्र कोंडी व घुसमटीचे काय?  तंत्रज्ञानाचे एक रूप लोभस, अद्भुत, वेड लावणारे आणि दुसरे भीतीदायक व बीभत्स. स्मार्टफोन, स्मार्ट वॉच, अन्य गॅझेट्समुळे माणसे मशीन बनलीच आहेत. माणसांची दैनंदिनी यंत्रेच ठरवितात. आता त्यात आश्चर्य वगैरे काही नाही. कृत्रिम बुद्धिमत्तेने मशिनीला मेंदू दिला गेला. आधी तो अलेक्सा, सिरीला दिला. पण, ते दोघे भलतेच ढ वाटावेत, असे चॅटबॉट आता आले आहेत. ओपन एआयचा चॅट जीपीटी, गुगलच्या ला-एमडीएने त्याची सुरुवात झाली. कोट्यवधी लोकांच्या वागण्या-बोलण्याचा अभ्यास करून, महाप्रचंड डेटा वापरून कुठल्याही प्रश्नाचे उत्तर, वाट्टेल ती माहिती क्षणार्धात दिली जाऊ लागली.  हे या तंत्रज्ञानाचे बालपण आहे. कारण, ही बुद्धिमत्ता सध्या टेक्स्ट बेस्ड आहे. 

जीपीटी-४ हे टेक्स्टसोबतच इमेजेसचा वापर करणारे व्हर्जन नुकतेच आले. त्याला आपण कुमारवय म्हणू. आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या पुढच्या अवताराच्या कल्पना भीतीदायक आहेत. तुमची प्रत्येक हालचाल, राग-लोभ-प्रेमाच्या वेळी चेहऱ्यावर उमटणारे भाव, कपाळावरच्या आठ्या व डोळ्यात तरळणारे प्रतिबिंब संगणकाचा वेबकॅम टिपणार असेल तर खासगी आयुष्य नावाचा काही प्रकार शिल्लकच नसेल. त्याशिवाय भावनिक गुंतागुंत मेंदू बधिर करणारी असेल. 

या गुंतागुंतीची झलक पाहा - २००२ मधील ‘S1mOne’ अर्थात ‘सिम्युलेशन वन’ चित्रपटात सिमोन नावाची डिजिटल नायिका दिग्दर्शक पडद्यावर आणतो. ते डिजिटल क्रिएशन दर्शक, समीक्षक, पत्रकार, पापाराझी सर्वांपासून लपवतो. तिच्या रूपाने मानवनिर्मितीचे ईश्वरी कौशल्य साधल्याचा आनंद मिळतो खरा. पण, निर्मिकाला स्वत:चीच निर्मिती सांभाळता येत नाही. एक दिवस फुगा फुटतो. २०१३च्या ‘Her’ चित्रपटात आभासी जगातील माणसे व माहितीच्या प्रेमात आकंठ बुडालेला नायक थिओडोरला शेवटी उपरती होते आणि स्वत:चा पुन:शोध घेणे हेच जगण्याचे इप्सित असल्याची कबुली तो देतो. 

कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा मशीन अल्गोरिदम आवडणे किंवा वापरणे यातून काही बिघडत नाही. मोठा धोका आहे तो हाडामांसाची माणसे प्रेमाच्या फॅन्टसीच्या प्रेमात पडण्यात आणि मशीनने ती फॅन्टसी प्रत्यक्षात आणण्यात. सारे काही आभासी आहे हे माहिती असूनही ते मान्य करण्याच्या पलीकडे हे वेडे प्रेम गेले की सगळे संपले. या विचित्र अवस्थेत जगण्यापेक्षा कुणी म्हणेल, की मशीन, अल्गोरिदम, एआय सारे काही सोडा, चला भूतकाळाकडे. पण, ते शक्य नाही. कारण माणसे बाजारपेठेच्या हातची बाहुली आहेत. 

एखादी वस्तू ऑनलाइन सर्च केली की तिच्या माहितीचे मेल इनबॉक्समध्ये पडणे, हे जुने झाले. कॉल सेंटरकडून खाद्यपदार्थ, डायबेटीस, इन्श्युरन्स, डेबिट कार्ड, बँक खाते वगैरेचे तपशील ऐकून भोवळ येण्याचा विनोदही जुना झाला. सिडनीसारखी लहरी, विचित्र पात्रे त्यापेक्षा गंभीर, गुंतागुंतीचे, भावनांशी खेळणारे तंत्रज्ञान घेऊन उंबरठ्यावर उभी आहेत. ती घरात येतील तेव्हा घर हे घर राहील का? हा प्रश्न आहे. 

- shrimant.mane@lokmat.com

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :technologyतंत्रज्ञान