शिवाजी महाराज जर मुस्लीमविरोधी असते तर मुस्लीम शिवरायांचे अंगरक्षक राहिले असते का? त्याकाळात अनेक हिंदू सरदार मोगल-आदिलशहा आणि निजामांकडे होते, तर अनेक मुस्लीम सरदार शिवरायांकडे होते, यावरून स्पष्ट होते की, शिवकालीन लढा धार्मिक नव्हता.छत्रपती शिवाजीराजांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून रयतेचे स्वराज्य निर्माण केले. शिवरायांचे स्वराज्य हे सर्व जातीधर्मातील जनतेचे स्वराज्य होते. शिवरायांनी आपल्या राज्यात कधीही भेदाभेद केला नाही. त्यांना साथ देणारे मराठा, माळी, धनगर, रामोशी, मातंग, महार, आग्री, वंजारी, कोळी इत्यादी होते तसेच त्यांच्या सैन्यात मुस्लीमदेखील होते.शिवरायांच्या स्वराज्याचा पहिला सरनौबत नूरखान बेग होता. घोडदळातील अत्यंत महत्त्वाच्या पदावर सिद्दी हिलाल आणि सिद्दी वाहवाह होते. पन्हाळा वेढ्यातून शिवरायांची सुटका करण्यासाठी हे नेताजी पालकर यांच्या खांद्याला खांदा लावून लढले.शिवाजीराजांचे अंगरक्षकदल अत्यंत सक्षम होते. त्यांच्या अंगरक्षकदलात एकूण एकतीस अंगरक्षक होते. सिद्दी इब्राहिम हे शिवाजीराजांचे अंगरक्षक होते. शमाखान हे शिवरायांचे विश्वासू सरदार होते. मदारी मेहत्तर हे फरास असणारे स्वराज्यनिष्ठ होते. छत्रपती शिवरायांच्या सोबत ते आग्राभेटीप्रसंगीदेखील होते. अनेक संकटप्रसंगी शिवरायांसोबत ते निष्ठेने राहिले.शिवरायांचे आरमार हे इंग्रज, सिद्दी आणि पोर्तुगीजांनादेखील धडकी भरविणारे होते. सामुद्रिक तटबंदी सुरक्षित ठेवण्यासाठी आरमारदलाची कामगिरी महत्त्वाची होती. अशा आरमारदलाच्या प्रमुखपदी शिवरायांनी दौलतखानाची नेमणूक केली. दौलतखान यांनी स्वराज्याची इमानेइतबारे सेवा केली.शिवरायांकडे अत्याधुनिक तोफखाना होता. इब्राहिमखान हे शिवरायांच्या तोफखान्याचे प्रमुख होते. शिवरायांच्या स्वराज्यात सातशे निष्ठावान पठाणांची फौज होती. शिवरायांचा मोगल, आदिलशहा, इंग्रज, पोर्तुगीज यांच्या विरोधातील संघर्ष राजकीय होता, धार्मिक नव्हता. शिवरायांनी अफजलखानाला तो मुस्लीम होता म्हणून ठार मारले नाही तर स्वराज्याचा शत्रू होता म्हणून ठार मारले. शिवरायांनी ज्याप्रमाणे खानाला ठार मारले तसेच, महाराजांवर वार करणाºया कुलकर्णीला ठार मारले आणि महिलांवर अत्याचार करणाºया रांझे गावच्या बाबाजी गुजरलादेखील ठार मारले, यावरून स्पष्ट होते की, शिवरायांची लढाई कोणत्याही जातीधर्माविरुद्ध नव्हती, तर सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचा नायनाट यासाठी शिवरायांची तलवार तळपत होती. याउलट शिवरायांनी अफजलखानाच्या मुलांना पोटाशी धरून अभय दिले. शिवाजी महाराज जेव्हा दक्षिण दिग्विजयाला निघाले, तेव्हा गोवळकोंड्याचा बादशहा शिवरायांना म्हणाला, ‘‘मी तुमच्या स्वागतासाठी चार-पाच गावे पुढे येतो.’’ शिवरायांनी बादशहाला निरोप पाठवला ‘‘तुम्ही माझे मोठे भाऊ आहात, मी तुमचा धाकटा भाऊ आहे, आपण भेटीस न यावे, मीच तुमच्या भेटीसाठी येत आहे.’’ १६७९ साली विजापूरला मोठा दुष्काळ पडला असताना शिवरायांनी आदिलशहाच्या दुष्काळनिवारण कार्यासाठी अर्थात आदिलशाही राज्यातील प्रजेला दहा हजार ज्वारीची पोती मदत म्हणून पाठवली. शिवरायांचे स्वराज्य रयतेचे स्वराज्य होते. शिवकालीन लढाई हिंदू-मुस्लीम लढाई नव्हती.आज राजकीय हेतू समोर ठेवून शिवाजी महाराज मुस्लीमविरोधी होते, असे कथा, कादंबºया, चित्रपट, मालिका, प्रसारमाध्यमं यातून बिंबवले जात आहे, पण वस्तुनिष्ठ इतिहास शिवरायांचे अनेक निष्ठावान मुस्लीम सहकारी होते, हे स्पष्ट करतो. इतिहास हा राष्टÑीय एकात्मता निर्माण करण्यासाठी असतो. शिवरायांचा इतिहास समाज जोडण्यासाठी आहे, तोडण्यासाठी नाही.- श्रीमंत कोकाटे,इतिहास अभ्यासक
छत्रपती शिवाजीराजांचे मुस्लीम सहकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 2:30 AM