अजित गोगटेअमेरिकेत सर्वोच्च न्यायालयावरील न्यायाधीशांची नेमणूक उघडपणे त्यांची विचारसरणी विचारात घेऊन केली जाते. नेमणुकीवर शिक्कामोर्तब होण्यापूर्वी सिनेटच्या समितीपुढे त्या न्यायाधीशाचे प्रसंगी वस्त्रहरणही केले जाते. सध्या तेथे सुरू असलेले न्यायाधीश कवान्हा नेमणूक प्रकरण त्याचे उदाहरण आहे. आपल्याकडे अशी पद्धत नाही. त्यामुळे आपण फक्त एखादा न्यायाधीश कसा आहे किंवा कसा होता याची चर्चा त्याच्या नेमणुकीनंतर अथवा निवृत्तीनंतरच करतो. परिणामी ही निव्वळ बौद्धिक कसरत ठरते.
दुसरे असे की, अमेरिकेत सर्वोच्च न्यायालयाचा एखादा कालखंड त्या वेळच्या सरन्यायाधीशाच्या नावाने ओळखला जातो. आपल्याकडे प्रकरणांच्या सुनावणीचे वाटप करण्याखेरीज सरन्यायाधीशांना कोणतेही अधिकचे अधिकार नसल्याने ते अनेकांमधील एक ठरतात. देशाचे ४५ वे सरन्यायाधीश न्या. दीपक मिस्रा यांच्या निवृत्तीच्या निमित्ताने हे मुद्दे प्रकषाने चर्चेत येणे स्वाभाविक आहे. एरवी आपल्या देशात सरन्यायाधीशाची नेमणूक व निवृत्ती हे विषय सामान्य नागरिकांच्या खिजगणतीतही नसतात. परंतु न्या. मिस्रा यांची जेमतेम १३ महिन्यांची कारकीर्द अनेक भल्या-बुऱ्या कारणांनी वादग्रस्त ठरल्याने त्यांचे नाव सर्वतोमुखी झाले. म्हणूनच इतिहासात त्यांची नोंद कशी होईल या प्रश्नाचे उत्तर साधे, सरळ नाही. भ्रष्टाचाराबद्दल केवळ कुजबुजच नव्हे तर गंभीर संशय घेतले गेलेले, कामाच्या वाटपात पक्षपात करतात म्हणून चार ज्येष्ठ सहकाºयांनी जाहीर पत्रकार परिषद घेऊन टीका केलेले आणि अपयशी का होईना पण महाभियोग कारवाईचा विषय ठरलेले देशाचे एकमेव सरन्यायाधीश म्हणून इतिहासात त्यांना नक्कीच स्थान मिळेल. कदाचित न्या. मिस्रा यांच्या ऐतिहासिक मूल्यमापनात हे पारडे जड असेल. म्हणून दुसºया तागडीत टाकावे असे त्यांच्या खाती सकारात्मक काहीच नाही, असे नक्की नाही. व्यक्तिस्वातंत्र्य, मानवी प्रतिष्ठा, समानता आणि व्यक्तीच्या खासगी जीवनाचे अनुल्लंघनीय स्वरूप या न्यायतत्त्वांच्या कक्षा अधिक रुंदावणारे अनेक ऐतिहासिक निकाल न्या. मिस्रा यांच्या कालखंडात दिले गेले.
लोया मृत्यू प्रकरण किंवा भीमा-कोरेगाव प्रकरणाच्या निकालांवरून आणि ‘कॉलेजियम’च्या शिफारशी सरकारने दुर्लक्षित करण्यावरून सत्ताधाºयांविरुद्ध जेवढी खंबीर भूमिका घ्यायला हवी होती तेवढी न्या. मिस्रा यांनी घेतली नाही, ही अनेकांची धारणाही चटकन दूर होणार नाही. न्यायाधीशांना जाहीरपणे बोलता येत नसल्याने त्यांची अवस्था नाजूक असते. प्रत्येक वादाच्या वेळी न्या. मिस्रा यांनी अन्य कोणाचीही भीडमुर्वत न ठेवता फक्त आपल्या मनाचे ऐकले. त्याने वाईटपणा वा चांगुलपणाही पदरी येऊ शकतो. पण कोणत्याही उच्च, जबाबदारीच्या पदावरील व्यक्तीमध्ये हा गुण असणे आवश्यक असते. न्या. मिस्रा त्या कसोटीवरही खरे उतरले. समलिंगी संबंधांना मान्यता देणाºया निकालपत्राची सुरुवात न्या. मिस्रा यांनी जर्मन विचारवंत गटे याच्या सुप्रसिद्ध वचनाने केली होती. ‘मी आहे हा असा आहे. तेव्हा जसा आहे तसाच मला पाहा’, असे ते वचन आहे. कदाचित इतिहासाने आपले मूल्यमापन कसे करावे, याचे उत्तरच न्या. मिस्रा यांनी निवृत्तीच्या काही महिने आधीच यातून दिले असावे.
(लेखक लोकमत माध्यम समुहात वरिष्ठ सहाय्यक संपादक आहेत)