-यदु जोशी, वरिष्ठ सहाय्यक संपादक, लोकमत
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सध्या फॉर्मात आहेत. परवा चिखलीत त्यांनी रात्री दीड वाजता कार्यकर्त्यांची बैठक घेतली. रात्री ३ ला ते बुलडाण्यात पोहोचले, तर कार्यकर्ते स्वागताला हजर होते. विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढेल, असं जाहीर करत नानाभाऊंनी स्वत: मुख्यमंत्री बनण्याची इच्छाही बोलून दाखवली. काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रिपदाची दावेदारी अशी स्वत:हून कोणी करत नसते; पण ‘नाना पटोलेला मुख्यमंत्री म्हणून पाहण्याची तुमची इच्छा नाही का?’ असा सवाल पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठकीत करून त्यांनी अप्रत्यक्षपणे दावेदारी केली. आणखी साडेतीन वर्षे वेळ आहे. तोवर वैनगंगेच्या पुलाखालून खूप पाणी जाईल. नानांच्या दावेदारीनं काँग्रेसमधील नेते सावध झाले असावेत. तसंही त्यांचं प्रदेशाध्यक्ष होणं बहुतेक प्रस्थापितांच्या पचनी पडलेलं नाही. त्यात आता त्यांच्या नव्या दावेदारीनं चुळबुळ वाढली आहे. प्रदेशाध्यक्षपदासोबतच मंत्रिपद मिळण्याच्या नानाभाऊंच्या इच्छेला त्यामुळे आडकाठी येऊ शकते.
- एकूण अभिमन्यू झाला तरी चालेल; पण आता सगळं अंगावर घ्यायचंच, असा नानाभाऊंचा पवित्रा दिसतो. त्यांचं एक मानलं पाहिजे, ते कुणालाही भिडू शकतात! कोणी नसलं तर त्यांना बॉक्सरसारखी पंचिंग बॅगही चालते. कुणी त्यांना ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ म्हणून हिणवू द्या; पण काँग्रेसला ऊब देण्याचं काम ते करताहेत, हे नक्की! काँग्रेसच्या पंखांमध्ये किती बळ आहे, ते सोडा; पण नानाभाऊंचे इरादे बुलंद आहेत, हे मात्र नक्की!
काँग्रेसनं २०१९ मध्ये ४४ जागा जिंकल्या. २०१४ मध्ये काँग्रेसनं ४२ जागा जिंकल्या होत्या. म्हणजे पाच वर्षांत फक्त दोन जागा वाढल्या. २००९ मध्ये ८२, २००४ मध्ये ६९, १९९९ मध्ये ७५ अशी काँग्रेसची आमदार संख्या होती. काँग्रेस सध्या चवथ्या क्रमांकावर आहे. भाजप, राष्ट्रवादी अन् शिवसेना या तुल्यबळ पक्षांना मात देण्यासाठी काँग्रेसचं कासव नानाभाऊंनी धावण्याच्या शर्यतीत सोडलं आहे. ते सशांना हरवेल का, ते पाहू.
मुख्यमंत्रिपद मिळवायचं तर बहुमताची (१४५) गरज नाही. आघाड्यांच्या काळात ६०-६५ हा आकडाही तुम्हाला मुख्यमंत्रीपद देऊ शकतो. काही लोक म्हणतात की महाराष्ट्रात काँग्रेस संपली. मात्र, ते भ्रमात आहेत. १३६ वर्षांच्या या वटवृक्षाची पाळंमुळं किती दूरवर असतील सांगता येत नाही. जुन्या अनुभवातून शिकून ‘याला लंबं करा, त्याला आडवातिडवा करा, त्याचा गेम करा’ हे बंद झालं, तर अशक्य काही नाही. लोकांच्या मनात काँग्रेस आहे; पण काँग्रेसवाल्यांना त्याचा फायदा घेता येत नाही, हे दुर्दैव!नानाभाऊंच्या नेतृत्वातील नवीन कार्यकारिणी लवकरच येतेय. राज्याराज्यांत पक्ष संघटना आणि सरकारमधील माणसं वेगवेगळी असावीत असा एक प्रयत्न काँग्रेसमध्ये चाललाय. तसंच महाराष्ट्रात झालं तर काही नवे आश्वासक चेहरे दिसतील. आपापले जिल्हे मजबुतीनं सांभाळणारे काही नेते तसंच मंत्र्यांना विश्वासात घेणं, मंत्रालयात लेटरहेड घेऊन फिरणाऱ्यांना व साधी ग्रामपंचायतही ताब्यात नसलेल्यांना बाजूला सारणं यात नानाभाऊंची कसरत आहे. कारण मेहनत करणाऱ्याच्या नशिबी सतरंजी अन् अमुल बटरचा डबा घेऊन फिरणाऱ्या, एअरपोर्ट- मरिन ड्राइव्ह व्हाया मंत्रालय असं टुरिझम करणाऱ्या चमकूंची चलती असं पक्षातील चित्र आहे.
प्रदेश काँग्रेसचं मुख्यालय असलेल्या टिळक भवनाचं रूपडं आता बदललं आहे. नूतनीकृत टिळक भवनाचं उद्घाटन शनिवारी होईल. अनेक प्रसंगांचा साक्षीदार राहिलेल्या या भवनाची हालत खस्ता होती. ओल्या भिंतीला टेकून बसल्यास शॉक लागायचा. आता सत्तेतल्या क्रमांक तीनच्या पक्षाचं वाटावं एवढं तरी ते कार्यालय चांगलं केलं आहे. त्याच कार्यक्रमात माजी राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख, संजय देशमुख काँग्रेसमध्ये परत जाताहेत. सुनील देशमुख भाजपमध्ये पाच-सात वर्षे राहिले हेच नवल आहे. श्रीकांत जिचकारांचा हा शिष्य. हिंदू धर्माचा प्रचंड अभ्यास असलेले श्रीकांतदादा हिंदुत्ववाद्यांच्या कधी नादी नाही लागले. आता सुनीलभाऊ जुन्या गढीवर परत जात आहेत. भाजपच्या पश्चिम महाराष्ट्रातील एका बड्या नेत्याच्या घरवापसीचीही जोरदार चर्चा आहे. हा नेता साखर सम्राट आहे.
मंत्रालयात मांजरींचा सुळसुळाटमंत्रालयात सध्या मांजरींचा सुळसुळाट आहे. शंभर एक तरी मांजरी असतील. कोणी छेडलं तर अंगावर जातात. मंत्रालयातील असल्यानं की काय पण त्या बेडर बनल्या आहेत. मंत्रालयात उंदीर अन् घुशीही खूप आहेत. मांजरी त्यांना त्रास देत नाहीत. त्यांनी उंदीर अन् घुशींशी जुळवून घेतलेलं दिसतं. ही एक वेगळी आघाडी आहे. गेल्या सरकारच्या काळात उंदीर घोटाळा गाजला होता. परवा म्हणे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची मंत्रालयात बैठक झाली. मुद्दा होता- मांजरींचा बंदोबस्त कसा करायचा? त्यांना माहिती अशी मिळाली की दुसऱ्या एका विभागाच्या दोन महिला कर्मचारी मांजरींना रोज खाऊपिऊ घालतात. त्या तसं का करतात म्हणून त्यांना आता कारणं दाखवा नोटीस बजावण्याचा विचार सुरू आहे.
मंत्रालयात काही महिन्यांपूर्वीपर्यंत सहा कुत्रेदेखील होते. परवा एक कुत्रा एक्स्कलेटरवरून जाताना दिसला. कुत्रे, मांजरी मंत्रालयात असे सराईतपणे फिरतात. त्यांनाही राजकारणात काय चाललंय ते कळतं का माहिती नाही! भिन्न विचारांचे तीन पक्ष याच मंत्रालयात एकत्रितपणे सरकार चालवतात मग आपण गुण्यागोविंदानं राहायला काय हरकत आहे, असा विचार त्यांनी केला असावा...