कर्जमाफीच्या याद्या तयार करताना बँकांकडून झालेल्या चुकांची कबुली खुद्द मुख्यमंत्र्यांनीच दिल्याने बँकांच्या भोंगळ कारभारावर शिक्कामोर्तब झाले आहे. नरक चतुर्दशीच्या दिवशी ज्या शेतकºयांना प्रातिनिधक स्वरुपात कर्जमाफीचे जे प्रमाणपत्र देण्यात आले त्यांचाच सातबारा अद्याप कोरा झालेला नाही. त्यामुळे या योजनेतील गोंधळ आणखी वाढला आहे. परवा सहकार मंत्र्यांनी विदर्भात एका कार्यक्रमात केवळ दोन लाख शेतकºयांच्याच खात्यात रक्कम जमा होणार असल्याची घोषणा केल्याने ६ लाख ५० हजार अर्जदार शेतकºयांना धक्का बसला आहे. आता २५ नोव्हेंबरपर्यंत ७० टक्के कर्जमाफीची सरकारने केलेली घोषणा कितपत खरी ठरते, हा खरा प्रश्न आहे. कर्जमाफीचे प्रमाणपत्र वाटप करून ११ दिवसांचा कालावधी झाला असला तरी एकाही शेतकºयाच्या खात्यात एक छदामही जमा झालेला नाही. रक्कम जमा झाली नाही म्हणून बँकेने नाहरकत प्रमाण पत्र दिले नाही. ते मिळाले नाही म्हणून तलाठ्याने सातबारा कोरा केला नाही. याचा अर्थ मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आलेल्या प्रमाणपत्राला कवडीची किंमत नाही, असाच होतो. नोटाबंदी आणि जीसटीच्या बाबतीत सरकारने केलेल्या घिसाडघाईची पुनरावृत्ती कर्जमाफीची यादी जाहीर करतानाही झाली. परिणामी शेतकरी दररोज बँकांचे उंबरठे झिजवतो अन् नकारात्मक उत्तर ऐकून आल्यापावली परत जातो. आतातर ‘आपलं सरकार’ पोर्टलवर टाकण्यात आलेली यादीही काढून टाकण्यात आली आहे. आधी हिरवी, पिवळी आणि लाल, अशा तीन भागात यादी अपलोड करण्याची घोषणा शासनाने केली होती. परंतु सर्व याद्या दोषपूर्ण असल्याने पोर्टलवरून त्या काढून टाकण्याची नामुष्की सरकारवर ओढवली. याद्या अपलोड करताना बँकांनी ज्या चुका केल्या आहेत, त्या अधिकाºयांच्या गचाळ कारभाराचे प्रमाण देण्यासाठी पुरेशा आहेत. काहींचा आधार क्रमांक चुकीचा टाकण्यात आला तर काहींच्या १५ अंकी खाते क्रमांकात घोळ आहे. त्यामुळे कर्जमाफीचा हा गोंधळ २५ नोव्हेंबरपर्यंत तरी संपेल की नाही, याबाबत साशंकता वाटते. कर्जमाफीच्या योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी निवडण्यात आलेला आॅनलाईनचा पर्याय आता शासनासाठीच डोकेदुखी ठरू पाहात आहे. याच गतीने याद्या तयार करण्याचे काम चालले तर पुढील हंगामापर्यंत तरी शेतकºयाचा सातबारा कोरा होणार नाही, बँका कर्ज देणार नाहीत आणि पुन्हा त्याला कर्जासाठी सावकाराच्या दारात उभे राहावे लागेल. आत्महत्येचे सत्र सुरू आहे, कदाचित तेही संपणार नाही.
कर्जमाफीच्या याद्या तयार करताना बँकांकडून झाल्या चुका, मुख्यमंत्र्यांची कबुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 12:17 AM