- सीमा महांगडेआजच्या तरुणाईला अनेकदा इच्छा असूनही सामाजिक उपक्रमांना हातभार लावण्याची अथवा शासनासोबत काम करण्याची संधी प्राप्त होत नाही. मात्र आता तरुणांना ती संधी मिळणार असून त्यासाठी शासनामार्फत शासनाच्या महत्त्वाच्या कार्यक्रमांच्या अंमलबजावणीत युवकांना सामावून घेण्यासाठी मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाची आखणी करण्यात आली आहे. यातून युवकांमध्ये नेतृत्वगुण विकसित करण्यासोबतच त्यांच्यात प्रशासकीय कामकाजाची जाण निर्माण करणे व भविष्यात सार्वजनिक क्षेत्रात काम करण्यासाठी त्यांना तयार करणे ही उद्दिष्टेही साध्य होणार आहेत.शासनाच्या माहिती व जनसंपर्क, महिला व आर्थिक विकास महामंडळ, मुख्यमंत्री वॉररूम, वन व महसूल विभाग, कौशल्य विभाग यांसारख्या विविध विभागांत सध्या कार्यरत असणाऱ्या फेलोजनी ‘लोकमत’ला भेट दिली. या दरम्यान त्यांनी फेलोशिप कार्यक्रमादरम्यान त्यांना येत असलेले अनुभव आणि माहिती शेअर केली.मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून साकारलेली ‘मुख्यमंत्री फेलोशिप योजना’ गेल्या ३ वर्षांपासून शासनाच्या नियोजन विभागामार्फत राबविली जात आहे. गेल्या तीन वर्षांत या कार्यक्रमाला युवकांचा मोठा प्रतिसाद लाभला आहे. दरवर्षी साधारण चार हजार अर्ज प्राप्त होत असून त्यातून ५० युवकांची निवड केली जात असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांच्या विशेष कार्यकारी अधिकारी प्रिया खान यांनी दिली. युवकांचा उत्साह, नावीन्यपूर्ण दृष्टिकोन व तंत्रज्ञानातीलत्यांची गती यांचा प्रशासनास उपयोग व्हावा, हा या कार्यक्रमाचा उद्देश असल्याचेही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून युवकांना धोरण निर्मिती, अंमलबजावणी, संनियंत्रण आणि मूल्यमापन अशा विविध प्रशासकीय प्रक्रियांमध्ये शासनासोबत काम करण्याची दुर्मीळ संधी मिळते. त्यासोबतच उद्योग, कला, लेखन, मनोरंजन आदी क्षेत्रांतील नामवंतांच्या भेटीच्या संधीही मिळत असल्याची माहिती सध्या कार्यरत उमेदवारांनी दिली. मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम हा कारकिर्दीतील एक मैलाचा दगड ठरत असून धोरण, प्रशासन, राज्यशास्त्र, व्यवस्थापन या क्षेत्रातील उच्चशिक्षण वा व्यावसायिक संधीही सहज साध्य असल्याचेही त्यांनी म्हटले. शासनात काम करीत असताना आव्हाने मोठी असतात, पण तितक्याच अधिक आणि व्यापक संधीसुद्धा मिळत असतात, असे मत उन्नत महाराष्ट्र अभियानात शासनासोबत फेलो म्हणून काम करणाºया सोहेल शेख यांनी व्यक्त केले.
मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम; प्रशासनाचा अनुभव घेण्याची संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 12:54 AM