- किरण अग्रवाल
करियर घडवायचे तर नित्य नव्या परीक्षांना सामोरे जावे लागतेच, पण म्हणून या परीक्षांनाच सर्व काही समजून चालत नसते. लाथ मारेन तेथे पाणी काढण्याचा आत्मविश्वास असला तर आयुष्याची परीक्षा सहज उत्तीर्ण होता येते. हे काही फार मोठे गूढ वा गहण अध्यात्म नाही; परंतु हे ज्याला उमजत नाही ते परीक्षेतील अपयशाने खचून आयुष्यच संपवायला निघतात. यातून पालकांना भोगाव्या लागणाऱ्या मरणयातना काय असतात ते संबंधितच जाणोत!
परवा नीट परीक्षेचा निकाल लागला अन् संध्याकाळी अकाेल्यातील दाेन मुलींनी परीक्षेत अपेक्षित गुण मिळाले नाही म्हणून आत्महत्या केल्या. एकीने माेर्णाजवळ केली, तर दुसरीने गळफास घेतला. अशा एक दाेन घटना प्रत्येक वर्षी घडतात. खरे तर या आत्महत्या नाहीत; तर यश, गुणवंत या शब्दांच्या बदललेल्या व्याख्यांनी निर्माण झालेल्या अपेक्षारूपी राक्षसाने केलेले खून आहेत. अपेक्षांचा हा राक्षस आज घराघरात वाढताे आहे व पाल्यांना तणावात आणतो आहे, हे पालक म्हणून आपण समजून घेणार आहाेत की नाही?
उत्तम शेती, मध्यम व्यापार अन् कनिष्ठ नाेकरी असा एक काळ हाेता, ताे केव्हाच इतिहासजमा झालाय. उत्तम शेती संपली म्हणून शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू झाल्यात, त्या थांबता थांबत नाहीत. मध्यम व्यापार या संकल्पनेची व्याप्ती एवढी वाढली की, कशाचाही व्यापार हाेऊ लागला; शिक्षण क्षेत्रही त्याला अपवाद ठरले नाही अन् याच शिक्षणाच्या व्यापारीकरणातून डाॅक्टर, इंजिनिअर व गेला बाजार एमपीएसी, यूपीएसी सारख्या परीक्षांमधून अधिकारी हाेण्याची जीवघेणी स्पर्धा सुरू झाली. या स्पर्धेची सुरुवात थेट बालपणापासूनच हाेते. कधी काळी अल्लड, अवखळ व स्वच्छंदी असलेले बालपण प्लेग्रुप, नर्सरी, केजी असाे की अंगणवाडी, बालवाडीपासून अपेक्षांच्या ओझ्याखाली एवढे दबून गेले आहे की, हल्ली दहावी अन् बारावी या दाेन परीक्षांचा घाट पार केल्यावरही नीट, सीईटी सारख्यामार्गावर मुलांची दमछाक हाेताना दिसते.
‘तुला डाॅक्टर व्हायचे आहे, तुला काय हवे ते सांग, सारे काही मिळेल; फक्त तू परसेंटेज कमव’ हे पालकांच्या मनाचे श्लाेक ऐकून परीक्षा म्हणजेच सर्व काही आहे, अशी धारणा मुलांची झाली तर नवल ते काय? मुलांचे मन अपेक्षांच्या ओझ्याखाली वाकतेच. पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांच्यामध्ये भीती निर्माण हाेते. ही भीती परीक्षेची कमी अन् पालकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकलाे नाही तर... याची अधिक असते. त्यातूनच मग अपयश आल्यावर त्याला सामाेरे जाण्याची हिंमत त्यांच्यामध्ये उरत नाही. परीक्षा हा आयुष्यातील अखेरचा टप्पा नाही, हे आयुष्य खूप मोठे आहे, परीक्षा त्यातील एक लहानसा टप्पा आहे, नाही झाला तर बघू, दुसरे काही करू, आम्ही आहाेत... असे धिराचे शब्द किती घरांमध्ये पालक उच्चारतात? याचा सुद्धा यानिमित्ताने विचार झाला पाहिजे.
मुले इतकी टाेकाची भूमिका कशी घेऊ शकतात, त्यांना मरणाची भीती वाटत नाही का? याचा कुटुंबाने, शिक्षण व्यवस्थेने अन् समाजानेही विचार करण्याची वेळ आली आहे. खरे म्हणजे मुलांच्या आत्महत्यांमागे अपयशाची भीती व दुसरा पर्यायच शिल्लक नाही, अशी भावना ही दाेन महत्त्वाची कारणे असतात. साेबतच पालकांसाेबत तुटत चाललेला संवाद हे तिसरे कारण आहे. या तिसऱ्या कारणामुळेच पहिली दाेन कारणे बळ धरतात व मुलांच्या मनात आत्महत्यांचे विचार अधिक बळकट करतात. आत्महत्यांचा निर्णय हा तडकाफडकी हाेत नाही, त्या अवस्थेपर्यंत पाेहोचण्यासाठी मनावर हाेणारे आघात लक्षात आले पाहिजेत, ते आपण लक्षात घेताे का? वर्गातील साप्ताहिक परीक्षांमधील गुणांवरूनही आपण मुलांना समजून घेताे की, फैलावर घेताे? त्यांची बाैद्धिक क्षमता, कल, आवड पाहून त्याच्या शिक्षण शाखेची निवड करताे की, आपलाच आग्रह कायम ठेवतो? याबाबीही तपासून पाहिल्या पाहिजेत.
पंतप्रधान नरेंद माेदी यांनी परीक्षा पे चर्चा मध्ये ‘आज जे काही पालक मुलांसोबत असतात त्यावेळी ते जास्त करून करियर, परीक्षा, अभ्यास, पुस्तके, सिलॅबस यातच गुंतलेले असतात’अशी खंत व्यक्त केली हाेती, ती अगदी योग्य आहे. मुलांचे भावविश्व समजून घेणे अन् त्यादृष्टीने निर्णय घेणे ही बाब पालकत्वासाठी अतिशय महत्त्वाची आहे. नेमके त्याकडेच दर्लक्ष हाेत असल्याने काेवळी पानगळ होताना दिसते. हा विषय एका कुटुंबाचा नाही, ताे व्यापक दृष्ट्या शैक्षणिक व सामाजिक आहे; त्यामुळे त्यासाठीचे प्रयत्न सर्वस्तरातून झाले पाहिजेत.
सारांशात जीव देण्याएवढी परीक्षा महत्त्वाची नाही, ती कसाेटी आहे तिला टी-ट्वेंटी सारखे खेळू नका, परीक्षेलाच आयुष्यातील स्वप्नांचा शेवट मानू नका, परीक्षा हा जीवनमरणाचा प्रश्न नाही; ती केवळ एक पायरी आहे. आज या पायरीवर धडपडलाे, पडलाे तरी हरकत नाही; कारण या धडपडीमधूनच उद्याची धाव घेण्याची प्रेरणा मिळणार आहे, हा आत्मविश्वास मुलांमध्ये जागविता आला व त्याला समाज तसेच व्यवस्था यामधून साथ मिळाली तरच आपण मुलांना वाचवू शकू, अन्यथा जीव मुलांचा जाईल अन् मरण आपण सारे साेसत राहू!