- धर्मराज हल्लाळेलहान मुलावर एकाने हात उगारला. मुलाला रडू कोसळले. तो थांबता थांबेना. समजावून सांगणाऱ्यांचेही तो ऐकेना. शेवटी समजावणारा म्हणाला, त्याने तुला मारले, आता तू त्याला मार म्हणजे बरोबरी होईल आणि तुझा राग शांत होईल. तू रडणे थांबवशील. तितक्यात तो रडत रडत म्हणाला, मला मारायचे नाही त्याला तुम्ही समजावून सांगा... हा अतिशय छोटा प्रसंग. प्रत्येक कुटुंबात अनेकदा असे घडते. अशावेळी आपण कशी प्रतिक्रिया देतो. मुले ऐकत नाहीत हा आपला निष्कर्ष असतो. लातूरच्या राष्ट्रीय बाल आनंद महोत्सवात मुलांनी २२ दालनांमध्ये आपल्या कलागुणांना आकार दिला. त्याहीपेक्षा मुलांनी जीवन विद्या अनुभवली आणि अवगत केली. ९० वर्षीय थोर गांधीवादी नेते डॉ. एस.एन. सुब्बाराव हे देशभरातून आलेल्या लहान मुलांमध्ये असे काही मिसळले की मुलांना त्यांची भाषा पटकन समजली; इतकेच नव्हे उमजलीसुद्धा. डॉ. सुब्बाराव ऊर्फ भाईजी यांनी गाणी म्हटली. इतिहासातील लहान लहान प्रसंग सांगितले. त्यांनी मुलांसोबत व्यायाम केला. ते मुलांसोबत हसले. त्यांच्या खुसखुशीत बोलण्यातून मुलांना शहाणपण कळले. ज्या मुलांनी घरात आपल्या जेवणाचे ताट अर्धवट ठेवले, ती मुले अन्नाचा एक कणही वाया घालायचा नाही हे शिकून गेली. भाईजी सांगतात, मुले तुमचे ऐकून शिकत नाहीत तर तुमच्याकडे पाहून शिकतात. तुमचे अनुकरण करतात. तुम्ही मोठ्यांनी आपले जेवणाचे ताट अर्धवट ठेवले नाही तर मुलेही ठेवणार नाहीत. केवळ अन्न वाया घालू नये असा उपदेश करून चालणार नाही. आपल्या मुलांना हे हरवू नको, ते हरवू नको, कोणाला काही देऊ नको हे आपण का शिकवतो. तू इतरांची मदत कर. एखादी वस्तू दुसऱ्याकडे नसेल तर त्याला दे, असे सांगण्याऐवजी हे कोठे हरवून आलास, कोणाला वाटून आलास हे आम्ही विचारतो. भाईजींनी सहा दिवसांच्या महोत्सवात मुलांना एकमेकांची मदत करायला शिकविली. बंधुभाव सांगितला. त्याची उदाहरणे दिली. इतकेच नव्हे त्याचा प्रयोग केला. भाईचाराचे आपण बोलतो पण तो निभवावा कसा, हे भाईजींनी दाखवून दिले. आपण कोणत्या जातीचे, धर्माचे, पंथाचे, प्रांताचे आहोत हा भाव विसरून मुले रमली. देशातील १६ राज्यांतून आलेली ३५८ मुले लातूर शहरातील ३५८ घरांमध्ये राहायला गेली. कोण कोणत्या जातीचा आणि धर्माचा होता हे पाहिले नाही. जात, धर्मभेद विसरायला लावणारा हा संस्कार महोत्सवाने वृद्धिंगत केला. जात आणि धर्माच्या झेंड्याखाली एक होणाऱ्या समाज रचनेला भेदण्याचे धारिष्ट्य या मुलांनीच वडीलधाऱ्यांना मिळवून दिले. मुस्लिम मुले-मुली हिंदूंच्या घरात राहिल्या. हिंदू मुले-मुली मुस्लिम घरात राहिल्या. हा प्रयोग कृतिशील संदेश देणारा होता. मुलांवर आपसूकच एकतेचे संस्कार झाले. धर्म भलेही न्यारे न्यारे लेकिन हम सब भाई सारे हा विचार बालमनावर रुजला.प्रामाणिकपणा हा गुण आपल्या मुलामध्ये असावा हे कोणाला वाटणार नाही. हे मूल्य जर मुलांमध्ये रूजवायचे असेल तर आपण त्याच वाटेने चालले पाहिजे. डॉ. सुब्बाराव यांना वडीलधाऱ्यांच्या वर्तनाकडे सतत बोट दाखविले. महोत्सवात खेळ खेळताना कोणाच्याही निगराणीशिवाय जो हरला त्याने बाजूला जायचे, हा नियम होता. आपल्याला कोणीच पाहत नाही म्हटल्यावर कोणीच हरणार नाही. पण असे घडले नाही. जी मुले हरत होती ती स्वत: बाजूला जात होती. शेवटी एकच नारा जीत गये भाई जीत गये खेलनेवाले जीत गये... अर्थात जो खेळतो तो प्रत्येकजण जिंकत असतो. हार-जीत तेवढ्यापुरती असते. मुलांसाठी आई-वडील हे दैवत आहेत. शिक्षक दैवत आहेत. मुलांनी आई-वडिलांचे ऐकले पाहिजे, हा संदेशही तिथे होता. हात लगे निर्माण में नही मांगने, नही मारणे हे सांगताना मुलांवर स्वावलंबनाचे आणि अहिंसेचे संस्कार झाले. डॉ. सुब्बाराव यांनी मुलांशी केलेल्या संवादात सकारात्मक शब्दांची गुंफण होती. हे तुम्ही करू शकत नाही, यापेक्षा तुम्ही कसे करू शकाल हे त्यांनी सांगितले. चंचल लहान मुलांना ध्यान करायला लावणे ही मोठी ताकद सुब्बारावजींच्या व्यक्तिमत्त्वात आहे. ज्याचे दर्शन महाराष्ट्रात सहा दिवस देशभरातील मुलांना पाहायला मिळाले.
मुले ऐकत नाहीत म्हणणाऱ्या आई-बाबांसाठी...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2018 10:12 PM