कोल्हापुरात लहान मुलांवर संस्कारक्षम विचारांचे अभिसरण व्हावे, यासाठी दर महिन्याला बालचित्रपट मोफत दाखविणारी चिल्लर पार्टी विद्यार्थी चळवळ गेल्या सहा वर्षांपासून सुरू आहे. या चळवळीतर्फे आता तिसरा बालचित्रपट महोत्सव कोल्हापुरात सुरू आहे. चित्रपट हे एक असे माध्यम आहे की, ज्याचा समाजमनावर खोलवर परिणाम होतो. लहान मुले ही अधिकच प्रभावी होतात, पण लहानांनी चित्रपट पाहू नयेत, असेच संस्कार आपल्याकडे केले जातात. अशा वातावरणात देश-विदेशातील संस्कारक्षम चित्रपट लहान मुलांनी पाहावेत, असा आग्रह धरणारी ही चळवळ आता रुजते आहे.चित्रपट पाहण्यासाठी लहान मुले आणि त्यांच्या पालकांनी एकत्र यावे, या तळमळीतून २०१२ मध्ये ही चळवळ सुरू करण्यात आली. प्रथमत: हे चित्रपट शिवाजी मराठा हायस्कूलमध्ये दाखविले जात असत. गेल्या सहा वर्षांत मुलांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळवून देण्यासह प्रबोधनाचे कार्यही या चळवळीच्या माध्यमातून उभे राहते आहे. त्याचे पुढचे पाऊल म्हणून चित्रपट तयार कसा होतो, त्यातील कथानक कसे निवडले जाते, त्यातील प्रसंग किती खरे असतात, हे सर्व मुलांना समजावून सांगण्यासाठी कार्यशाळाही घेतली जाते. या कार्यशाळेत कॅमेरा, कथानक, संहिता, चित्रपटाचे संकलन, लोकेशन आदीवरही मार्गदर्शन केले जाते. चित्रपट हे एक मनोरंजनाचे साधनच नव्हे, तर तो एक व्यवसाय, कला आणि त्याचे अर्थकारणही असते याची जाणीव मुलांना होत राहते.चिल्लर पार्टीतर्फे दर महिन्याच्या चौथ्या शनिवारी कोल्हापुरातील राजर्षी शाहू स्मारक भवनात सकाळी १० वाजता मोफत चित्रपट दाखविला जातो. लहान मुलांसाठी अत्यंत उत्कृष्ट चित्रपट पाहणे ही मेजवानीच असते. या चित्रपटांची पार्श्वभूमीपासून विविध वैशिष्ट्ये सांगितली जातात. परिणाम देश-विदेशातील कोणत्याही भाषेतील चित्रपट असला तरी लहान मुलांना समजतो.कोल्हापुरात चित्रपट निर्मितीची एका शतकाची परंपरा आहे. गेल्या २ डिसेंबरला हा शतक महोत्सव साजराही करण्यात आला. १९३८ च्या सुमारास धु्रव नावाचा पहिला बालचित्रपटही कोल्हापुरातच तयार करण्यात आला होता. या चित्रपटात काम करणारे सर्व कलाकारही बालकेच होती. प्रभात चित्र नावाच्या बॅनरखाली तो बनविण्यात आला होता. आजही अनेक संस्था, संघटना आहेत, ज्या बालकलाकारांना मार्गदर्शन करतात. बालकलाकार घडवितात. कोल्हापूरच्या बाहेर निर्मिती होणाºया चित्रपटात किंवा मालिकांमध्येही संधी मिळावी म्हणून प्रयत्न करण्यासाठी धडपडणाºयांची संस्थाही कोल्हापुरात चालते.चिल्लर पार्टी ही चळवळ केवळ लहान मुलांना समोर ठेवून चालविण्यात येत आहे. त्यातही गरीब, वंचित किंवा ज्यांना चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहता येत नाहीत, अशा मुलांसाठी जाणीवपूर्वक चालविलेली ही चळवळ आहे. आज शाहू स्मारक भवनाचे ४०० जणांची क्षमता असलेले प्रेक्षकगृह भरलेले असते. त्यातच या चळवळीचे यश आहे.- वसंत भोसले
चिल्लर पार्टी-विद्यार्थी चित्रपट चळवळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 3:16 AM