चीन आणि रशियाचं साम्राज्यवादी धोरण आजवर कधीच लपून राहिलेलं नाही. त्यातही अलीकडच्या काळात तर चीनने याबाबतच्या आपल्या साऱ्या सीमा पार केल्या आहेत आणि आकाश, जमीन, पाणी या साऱ्याच ठिकाणी आपलाच कब्जा कसा राहील या दृष्टीनं आपली पावलं टाकायला सुरुवात केली आहे. संपूर्ण जगानंच याची धास्ती घेतली आहे. अमेरिकेनंही याबाबत वारंवार चीनला सूचना केल्या असून, आपलं साम्राज्यवादी धोरण थांबवावं असं आवाहन केलेलं आहे. निदान आतापर्यंत तरी चीननं त्याकडे दुर्लक्षच केलं आहे. एवढंच नाही, अमेरिकेच्या सूचना आणि आवाहनांना कोणतीही भीक न घालता त्यांनी आणखीच आडमुठेपणा सुरू केला आहे.
चीन आणि रशिया या दोन्ही देशांनी मिळून तर आता थेट चंद्रावरच अणुऊर्जा प्रकल्प उभारण्याची तयारी सुरू केली आहे. ही तयारी आता प्राथमिक टप्प्यावर असली तरी येत्या काळात या प्रकल्पाची उभारणी वेगानं होईल. २०३३ ते २०३५ या काळात चंद्रावर हा अणुऊर्जा प्रकल्प तयार झालेला असेल असा अंदाज अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. रशियन स्पेस एजन्सी रॉसकॉसमॉसचे मुख्य कार्यकारी अधिकारी युरी बोरिसोव यांनीही याला दुजोरा दिला असून, हा आमचा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, येत्या काळात तो मोठ्या प्रमाणात वेग घेईल आणि अपेक्षित वेळेच्याही आधी चंद्रावर हा प्रकल्प उभारला गेलेला असेल असं त्यांचं म्हणणं आहे.
बोरिसोव म्हणतात, हा अणुऊर्जा प्रकल्प चंद्राच्या पृष्ठभागावर नेण्यासाठी रशिया अणुऊर्जेवर चालणारं रॉकेट बनवणार आहे. हे एक कार्गो रॉकेट असेल आणि ते पूर्णपणे स्वयंचलित असेल. ते चालवायला माणसांची गरज भासणार नाही, मानवाला फक्त त्याच्या प्रक्षेपणावर लक्ष केंद्रित करावं लागेल.
चीन आणि रशिया मिळून चंद्रावर असा काही प्रकल्प उभारत असल्याची माहिती आत्ता बाहेर आली असली, तरी यासंदर्भात २०२१मध्येच त्यांनी तयारी सुरू केली आहे. चंद्रावर एक वैज्ञानिक स्टेशन तयार करण्याचा रोडमॅप त्यांनी तयार केला आहे. प्रकल्पासाठीची अंतिम मुदत त्यांनी २०३५ ठेवली असली तरी ते त्यापेक्षाही बऱ्याच आधी तयार होईल यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. कारण याच माध्यमातून आणखीही काही प्रकल्प उभारले जाणार असून, जगात कोणाच्याही, विशेषत: अमेरिकेच्याही पुढे राहण्याचा आणि अमेरिकेला प्रत्येक बाबतीत शह देण्याचा त्यांचा हेतू आहे.
चीन आणि रशियाच्या या अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी अत्याधुनिक प्रणालीचा वापर केला जाणार आहे. चीन आणि रशियाचं विस्तारवादी धोरण जगात सर्वज्ञात असलं तरीही आमची भूमिका अत्यंत प्रामाणिक असून ऊर्जेसाठी आम्ही चंद्रावर अणुऊर्जा प्रकल्प उभारत आहोत, असं त्यांचं म्हणणं आहे. आमच्या या प्रकल्पाबद्दल जगात साशंकता निर्माण करण्याचा अनेक विरोधी गट प्रयत्न करीत आहेत, पण आम्ही कोणत्याही प्रकारची अण्वस्त्रं अंतराळात पाठवत नसून किमान अंतराळ तरी अण्वस्त्रमुक्त असावं अशीच आमची भूमिका आहे, असंही त्यांनी जाहीर केलं आहे.
आपल्या तांत्रिक प्रगतीचा मात्र त्यांना अभिमान आहे. त्यामुळे चीन आणि रशिया यांनी संयुक्तपणे यासंदर्भात त्रोटक माहिती जाहीर करताना म्हटलं आहे, आमचा हा अणुऊर्जा प्रकल्प स्वयंचलित मोडवर चालेल. चंद्रावर हा पॉवरप्लांट उभारताना कोणीही मानव तिथे पाठवला जाणार नाही. वीज प्रकल्प उभारणीचे सारे तंत्रज्ञान पूर्ण झाले आहे. या प्रकल्पात टेक्निकल लूनर रोवर असतील, जे संशोधनाचंही काम करतील. याशिवाय या प्रकल्पाची इतर सारी जबाबदारी रोबोट्स पार पाडतील.
चीन आणि रशिया जे काही सांगत आहेत, त्यावर अमेरिकेचा मात्र काडीचाही विश्वास नाही. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेनं म्हटलं होतं, चीन आणि रशियानं जगाला पुन्हा एकदा भीतीच्या छायेत उभं केलं आहे. हे दोन्ही देश आता अंतराळात आणि अंतराळातून हल्ला करण्यासाठी घातक अण्वस्त्रं तयार करीत आहेत. व्हाइट हाउसनंही याला पुष्टी देताना म्हटलं होतं, चीन-रशियाच्या आतंकवादी कारवाया सुरूच असून ॲण्टिसॅटेलाइट हत्यारं ते तयार करीत आहेत. अंतराळातील अनेक उपग्रह या हल्ल्यांमुळे नष्ट होऊ शकतात. मानवजातीला हा फार मोठा धोका आहे. यामुळे जग काही वर्षं मागे जाऊ शकतं.
उपग्रह नष्ट करण्याचा डाव!
चीन आणि रशिया केव्हा काय करील, यावर कोणाचाच भरवसा नाही. अंतराळातील केवळ उपग्रह जरी त्यांनी खोडसाळपणे नष्ट केले तरी दळणवळण, जलवाहतूक, सुरक्षाव्यवस्था, निगराणीसारख्या अनेक सुविधा ठप्प होतील. अमेरिकेचं सॅटेलाइट नेटवर्कच उद्ध्वस्त, खिळखिळं करण्याचा चीन, रशियाचा डाव आहे, पण आम्ही ते कदापि यशस्वी होऊ देणार नाही, असंही अमेरिकेचं म्हणणं आहे.