जगात अशी अनेक रहस्यमय ठिकाणं आहेत, ज्याबाबत सर्वसामान्यांनाच काय, अगदी तज्ज्ञांनाही कायम कुतूहल वाटत आलेलं आहे. त्यातली काही ठिकाणं तर अक्षरश: भीतीदायक आहेत! कारण या ठिकाणी माणूस गेला की तो पुन्हा कधीच परत येत नाही, अशा आख्यायिका आहेत. त्या कदाचित पूर्णांशानं खऱ्या नसतीलही, अर्थातच त्याबाबत तज्ज्ञांमध्येही वादविवाद आहेत, पण या ठिकाणांचं गूढ मात्र आजपर्यंत कायम आहे. त्यातलंच एक अत्यंत रहस्यमय ठिकाण म्हणजे बर्मुडा ट्रँगल! या ठिकाणाबाबत ऐकलं किंवा वाचलं नाही, असे फारच थोडे लोक असतील.
अमेरिकेच्या आग्नेय किनाऱ्यावर असलेल्या या बर्म्युडा ट्रँगलनं आजवर अशा अनेक रहस्यांना जन्म दिला आहे, ज्याची उकल अजूनही झालेली नाही. त्यामुळे विशेषत: जहाजातून प्रवास करणारे आणि या बर्मुडा ट्रँगलवरून विमानानं जाणारे प्रवासी या ठिकाणाहून जायचं म्हटलं की त्यांच्या छातीत धस्स होतं. या ठिकाणाचं असं वैशिष्ट्य तरी काय? - तर याबाबत असं मानलं जातं की, बर्मुडा ट्रँगल या परिसरात कोणतंही जहाज पोहोचलं किंवा या ठिकाणावरून कोणतंही विमान गेलं तर ते कधीच परत येत नाही! ते थेट गायबच होतं. त्याचा काहीच आतापता कळत नाही. समजा त्यांचा ॲक्सिडेंट झाला असेल, तर त्याचे अवशेषही मिळत नाहीत, असा एक समज जगभरातील लोकांच्या मनात पसरलेला आहे.
बर्मुडा ट्रँगलवरून जाणारी जहाजं आणि विमानं गायब होऊन नेमकी जातात तरी कुठे, याबाबतही आजवर खूप मोठं संशोधन झालं आहे आणि त्याबाबत अजूनही ‘शोध’ सुरू आहे, असं म्हणतात. पण त्याचं उत्तर आजवर तरी कुणालाच सापडलेलं नाही. समजा सापडलेलं असलं तरी त्यावर लोकांचा विश्वास नाही. त्यांचा ‘विश्वास’ हाच की, जहाजं आणि विमान गायब करणाऱ्या या गूढ ठिकाणावरून आपण जायचं नाही!
माणसं ‘गायब’ होणारं जगभरातलं आणखी एक महत्त्वाचं ठिकाण जे सर्वांनाच माहीत आहे, ते म्हणजे चीन! आजवर चीनमधून किती लोक गायब झाले असतील याची गिणतीच नाही. सर्वसामान्यांचं जाऊ द्या, पण त्याच देशातील अत्यंत महत्त्वाची आणि ज्यांच्याकडे देशातील अतिशय महत्त्वाची खाती, मंत्रिपदं होती, अशी माणसंही अलीकडे झपाट्यानं गायब होताहेत! देशाच्या पहिल्या पाचांत किंवा दहांत मोडली जाणारी ही माणसं अचानक ‘गायब’ कशी काय होतात, याबाबत अख्ख्या जगाच्या मनातच शंका आहेत!
याची उदाहरणं तरी किती सांगावीत? तीन महिन्यांपूर्वीच चीनचे तत्कालीन परराष्ट्रमंत्री किन गांग अचानक गायब झाले होते. ते अद्याप सापडलेले नाहीत. दुसरी घटनाही अगदी ताजी आहे. किन गांग गायब झाल्याचं गूढ शमत नाही, तोच आता चीनचे संरक्षणमंत्री ली शांगफू ‘गायब’ झाले आहेत.
किन गांग गायब झाल्यानंतर त्यांचा कुठलाही ‘शोध’ न घेता चीननं लगेच दुसऱ्या परराष्ट्रमंत्र्यांची घोषणा केली होती आणि त्यांच्या ताब्यात परराष्ट्र मंत्रालयाची जबाबदारी दिली होती. नेमकी तीच आणि तशीच गोष्ट आता चीनचे संरक्षणमंत्री ली शांगफू यांच्याबाबत झाली आहे. गेल्या सुमारे दोन महिन्यांपासून ते ‘गायब’ आहेत. ते ‘सापडत’ नाहीत, म्हणून त्यांची हकालपट्टी केली आहे. ते गायब झालेत म्हणजे कुठे गेलेत, ते सापडत का नाहीत, त्यांचा आतापर्यंत कुठे कुठे शोध घेतला, याची काहीही कारणं अथवा स्पष्टीकरण चीन सरकारनं दिलेलं नाही. कारण काय? - तर मेरी मर्जी! कारणं सांगायची आमच्याकडे पद्धती नाही. आम्ही फक्त आदेश देतो! ली शांगफू गायब असले तरी त्याबाबत काही कारणं सांगितली जातात. त्यातलं प्रमुख कारण म्हणजे शांगफू यांच्यावरचे भ्रष्टाचाराचे आरोप. सैन्यासाठी हत्यारं खरेदी करण्यात त्यांनी गोलमाल केला असंही मानलं जात होतं. साधारण दोन महिन्यांपूर्वी म्हणजे २९ ऑगस्ट रोजी एका सार्वजनिक कार्यक्रमात ते ‘दिसले’ होते. हा कार्यक्रम होता आफ्रिकी देशांसोबतचा सिक्युरिटी फोरम! या ठिकाणी भाषण देताना ते दिसले होते. त्यानंतर मात्र कोणालाच त्यांचं ‘दर्शन’ झालं नाही.
तुम्हाला उत्तर द्यावंच लागेल!
चीनमधून गायब झालेल्या लोकांची खरंच गिणती नाही. परराष्ट्रमंत्री आणि संरक्षणमंत्र्यांसारख्या अति उच्च दर्जाच्या लोकांचा जिथे पत्ता लागत नाही, तिथे सर्वसामान्यांची काय कथा? जगातील सर्वाधिक श्रीमंतांपैकी एक; ‘अलीबाबा’ या वेबसाइटचे मालक अब्जाधीश जॅक मा यांनाही असंच ‘गायब’ करण्यात आलं होतं. चीन सरकार आणि त्यांच्या धोरणाविरुद्ध ज्यांनी ज्यांनी विरोध केला, त्या सार्वजनिक क्षेत्रातल्या नामांकित लोकांचाही अजून पत्ता लागलेला नाही. पण त्याबद्दल तेथील सर्वसामान्य लोकच आता म्हणताहेत, तुम्हाला कधी ना कधी याचं उत्तर द्यावंच लागेल!