शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

चीनची मग्रुरी आणि आपले मौन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2017 11:50 PM

चीनच्या लष्कराने उत्तराखंडच्या बाराहोती या चमोली जिल्ह्यातील भारतीय क्षेत्रात अतिक्रमण करून आपल्या वाढत्या आक्रमणखोरीचा नवा पुरावा पुढे केला आहे.

चीनच्या लष्कराने उत्तराखंडच्या बाराहोती या चमोली जिल्ह्यातील भारतीय क्षेत्रात अतिक्रमण करून आपल्या वाढत्या आक्रमणखोरीचा नवा पुरावा पुढे केला आहे. भारताचे संरक्षणविषयक सल्लागार अजित डोवल हे ब्रिक्सच्या बैठकीसाठी चीनला जाण्याच्या तयारीत असताना हे अतिक्रमण होणे ही चीनची आक्रमक वृत्ती भारताच्या लक्षात आणून देणारी बाब आहे. या भागात चिनी लष्कराने यापूर्वी अनेक आक्रमणे केली आहेत. भारताच्या संरक्षण मंत्रालयाने या अतिक्रमणाची गंभीर दखल घेण्याचे टाळले असले तरी गेल्या १२ महिन्यात चीनने अशी ३००हून अधिक अतिक्रमणे या क्षेत्रात केली ही बाब गंभीर म्हणावी अशी नक्कीच आहे. बाराहोतीचे क्षेत्र हे दोन देशांतील वादाचे क्षेत्र ठरविण्यात आल्यामुळे त्याकडे भारताने बरीच वर्षे लक्ष दिले नाही. चीननेही आपले लष्कर तिकडे गेल्या अनेक वर्षांत पाठविले नाही. त्यामुळे त्याचे आताचे आक्रमण केवळ नवेच नाही तर त्या प्रदेशावरचा त्याचा अधिकार बजावून घेणारे आहे. आधीच डोकलाम या भूतानच्या सीमेवर भारत आणि चीनच्या फौजा समोरासमोर उभ्या आहेत. डोकलाम हे क्षेत्र भारताचे नाही. ते भूतानचे आहे. मात्र भूतानच्या संरक्षणाची जबाबदारी भारताकडे असल्यामुळे त्यावर भारताची लष्करी पथके आता उभी आहेत. चीनचा दावा हा की डोकलामचा प्रदेश त्याचा आहे आणि त्यामुळे त्यातून भारतीय पथकांसारखीच भूतानची पथकेही मागे हटली पाहिजेत. अरुणाचल हे सबंध राज्य, उत्तराखंडचा बाराहोती हा प्रदेश, उत्तर प्रदेशचे सीमावर्ती भाग, नेपाळची दक्षिण सीमा याखेरीज लदाख हा काश्मीरच्या पूर्वेचा भाग यातील अनेक क्षेत्रांवर चीन आपला हक्क गेली अनेक वर्षे सांगत आहे. भारत आणि चीन यांच्यातील मॅकमहोन ही सीमारेषा त्याला मान्य नाही आणि या दोन देशांत नवी सीमारेषा आखण्याची मागणी तो करीत आहे. ती आखताना अर्थातच तो भारताच्या या सर्व प्रदेशांवर आपली मालकी सांगेल हे उघड आहे. चीनचा हा पवित्रा सीमावर्ती क्षेत्रातील भांडणांपुरता किंवा मर्यादित स्वरुपाचा आहे असे समजण्याचे कारण नाही. आठच दिवसांपूर्वी चीनच्या लष्कराने त्याचा ९०वा वर्धापनदिन साजरा केला. त्यात दहा हजार जवानांच्या संचलनासोबत सहाशे शस्त्रे त्याने जगाला दाखविली. या शस्त्रांत साडेतीनशेहून अधिक शस्त्रे नवी व जास्तीची संहारक असल्याचे त्याचे म्हणणे आहे. आमचे लष्कर जगातल्या कोणत्याही लष्कराहून सामर्थ्यवान असून ते कोणाचाही पराभव करण्याची क्षमता राखणारे आहे, असे उद््गार त्या संचलनाच्यावेळी चीनचे अध्यक्ष शी झिनपिंग यांनी काढले आहे. आपली ही ताकद भारतावरील अतिक्रमणातून तो देश आता दाखवू लागला आहे. पाकिस्तानने सूचना करताच आम्ही आमचे लष्कर काश्मिरात पाठवू अशी धमकी त्याने याआधीच भारताला दिली आहे. त्याचवेळी डोकलाममधून भारतीय पथके मागे गेली नाहीत तर आमचे लष्कर त्यांच्यावर आक्रमण करील असेही म्हटले आहे. आक्रमण करणे आणि आक्रमणाची धमकी देणे या दोन्ही गोष्टी आंतरराष्ट्रीय राजकारणात सारख्याच गंभीरपणे घेतल्या जातात. काश्मीरवरील आक्रमणाची धमकी नवी असली तरी ती भारताला जास्तीची चिंता करायला लावणारी आहे. उत्तराखंडमधील आताचे आक्रमण ही त्या आक्रमणाची नांदी म्हणूनही पाहता येणारी आहे. उत्तराखंडमध्ये आपली सेना पाठवून चीन काश्मीरला भारताकडून होणारा जीवनोपयोगी वस्तूंचा पुरवठा थांबवू शकणार आहे. एका अर्थाने त्यामुळे काश्मीरचा जीवनमार्गच (लाईफलाईन) त्याला अडवून धरता येणार आहे. चीन हे उघडउघड व सांगूनसवरून करताना दिसत आहे. थोडक्यात अरुणाचलपासून काश्मीरपर्यंतची भारताची चार हजार कि.मी.ची सारी उत्तरसीमाच चीनच्या आक्रमणाच्या छायेत आहे. आश्चर्य याचे की या आक्रमणाची घ्यावी तशी दखल भारताचे संरक्षण मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय आणि प्रत्यक्ष पंतप्रधानांचे कार्यालयही घेताना दिसत नाही. पाकिस्तानबाबत ही मंत्रालये जेवढी संवेदनशीलता दाखवितात तेवढी त्यांना याबाबत दाखविता न येणे हे त्याच्या मुत्सद्देगिरीचे लक्षण नाही. चीनच्या वाढलेल्या सामर्थ्याची भारताने धास्ती घेतल्याचे ते चिन्ह आहे. देशाच्या उत्तरसीमेवर आक्रमणाचे ढग असे जमले असताना देशाचे पंतप्रधान आसामचा दौरा करतात, परराष्ट्र मंत्री त्याविषयी काही एक न बोलता मौन पाळतात आणि लष्करातील वरिष्ठ अधिकारी मात्र त्यांना न शोभणारी राजकीय धमकीवजा भाषा वापरताना दिसतात तेव्हा ते सारे देशाच्या परराष्ट्र नीतीत व विशेषत: चीनबाबत वापरायच्या धोरणात एकवाक्यता नसल्याचे लक्षण ठरते. चीनने डोकलामवर लष्कर पाठविले, सिक्कीमच्या उत्तरसीमेवर सैन्य तैनात केले आणि काश्मिरात लष्कर पाठविण्याची सरळ धमकी भारताला दिली तरी त्यावर देशाचे पंतप्रधान त्यांच्या ‘मन की बात’ बोलताना कधी दिसले नाहीत. याच काळात भारताच्या कॅग या वरिष्ठ अधिकाºयाने भारतीय लष्कराजवळ युद्धात जेमतेम दहा दिवस कामी येईल एवढीच शस्त्रसामुग्री असल्याचे जाहीर केले आहे. हा प्रकारही आक्रमणाला निमंत्रण देणारा आहे. चीन धमक्या देतो, आमची माणसे आपले दुबळेपण सांगतात आणि सरकार मौन धारण करते हा देशालाच विस्मयात टाकणारा प्रकार आहे.