- राजू नायकगोव्यात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात येथील चर्च धर्मसंस्थेने जरी लोकांनी ऐक्य निर्माण करून संघशक्ती निर्माण करण्याचे आवाहन केलेले असले तरी १५ हजारांवर लोक जमलेल्या या मेळाव्याला प्रामुख्याने उपस्थिती होती ती मुस्लिमांची! या कायद्यामुळे ख्रिश्चनांपेक्षा मुस्लिमांमध्ये अधिक संशयाचे वातावरण आहे, हे त्यामुळे स्पष्ट झाले.ख्रिश्चनांना या कायद्यामुळे भीतीचे कारण नाही, असे मत त्या धर्माचे पंडितच व्यक्त करतात. ज्या शेजारील देशांमधील लोकांना या कायद्यामुळे शाश्वती मिळणार आहे, त्यात पाकिस्तानातील ख्रिश्चनांचा समावेश आहे. देशाच्या मुक्तीपूर्व काळात, पोर्तुगिजांच्या अमदानीत गोवा-कराची व्यापार चालायचा. त्याकाळी हजारोंच्या संख्येने ख्रिस्ती नागरिक तेथे स्थायिक झाले. देशाच्या फाळणीनंतरही हे लोक तेथेच राहिले व सध्या त्यांना तेथे हालअपेष्टा व अन्याय सहन करावा लागतो. ख्रिश्चन मुलींना पळवून नेऊन त्यांची लग्ने करण्याचे प्रकार तेथे वाढत्या संख्येने चालले आहेत. नवीन कायद्यामुळे या पाकिस्तानी नागरिकांना भारतात परतण्याचा मार्ग खुला झाला आहे. त्यांचे नातेवाईक व धर्मस्थळे गोव्यात आहेत.मुस्लिमांची लोकसंख्या गोव्यात अलीकडे खूप वाढली आहे व त्यामुळे येथे सामाजिक तेढही वाढलेली पाहायला मिळते. विशेषत: त्यांच्या दफनभूमीला स्थानिक ख्रिश्चनांचा विरोध होतो. दक्षिण गोव्यात लोकविरोधामुळे त्यांच्या प्रस्तावित दफनभूमीची जागा दोनदा बदलावी लागली आहे. चर्च संस्थाही आपल्या अनुयायांचे समाधान त्या बाबतीत करू शकलेली नाही. त्यामुळे चर्च धर्मसंस्थेच्या संघटनांनी आवाहन केल्यानंतर पणजीत शुक्रवारी झालेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायदाविरोधी मेळाव्याला ज्या संख्येने मुस्लिम नागरिक जमले, ते एक आश्चर्यच मानले जाते. मुस्लिमांची संख्या या मेळाव्याला लक्षणीय होती. एका अंदाजाप्रमाणे ते जमलेल्या लोकांमध्ये किमान ७० टक्के होते. ख्रिश्चनांची संख्या त्या मानाने तुरळक होती. काँग्रेस पक्षातील १० सदस्यांचे घाऊक पक्षांतर सत्ताधारी भाजपात करण्यात आल्यानंतर गोव्यात सध्या ख्रिस्ती चर्च प्रक्षुब्ध बनली असून सरकारविरोधात टीका करण्याची संधी धर्मगुरू गमावत नाहीत व नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधातील शस्त्र चांगलेच परजले जात आहे, त्यामुळे भाजपातील ख्रिस्ती सदस्यांमध्ये चलबिचल निर्माण करण्याचाही प्रयत्न आहे. चर्च संस्थेने त्यासाठी आणखी एक पाऊल टाकले आहे ते मुस्लिम समाजाला निकट जाण्याचे. अल्पसंख्याकांची जोरदार युती करून हिंदुत्ववादाला तेवढेच तीव्र उत्तर देण्याचा हा प्रयत्न आहे. काही ख्रिस्ती धर्मगुरू त्यासाठी गेल्या पाच वर्षापासून नियोजनबद्ध काम करीत आहेत. मुस्लिम समाजानेही त्याला तेवढाच सकारात्मक प्रतिसाद दिला व शुक्रवारी जमलेल्या लोकांचे हे ऐक्य गोव्याच्या शांत समाजात लाटा निर्माण करण्यासाठी पुरेसे आहे. गोव्यात मुस्लिमांचे हे एवढे मोठे संघटन लोकांनी पहिल्यांदाच पाहिले. गोवा मुक्तीच्या काळी केवळ तीन टक्के असलेला हा समाज सध्या १०ते १२ टक्क्यांवर पोहोचला असल्याची माहिती आहे. गोव्यातील भाजी व फळ बाजारपेठेवर त्यांनी प्रभुत्व मिळविले आहे. अल्पसंख्याकांचे हे ऐक्य राजकीय शक्तिप्रदर्शनासाठी ठीक असले तरी हिंदू समाजाचेही ध्रुवीकरण त्यामुळे होऊ शकते व उलट त्याचा फायदा भाजपालाच होऊ शकतो, अशीही एक विचारधारा आहे. त्याचप्रमाणे ख्रिस्ती समाज- जो बाहेरच्यांच्या आक्रमणामुळे यापूर्वीच बिथरला आहे, त्याला मुस्लिमांचे हे वाढते प्राबल्य व अर्थव्यवस्थेवरचे त्यांचे नियंत्रण हे त्याच्या कसे पचनी पडते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. विश्लेषक मानतात की जर भाजपाने नागरिकत्व दुरुस्ती कायदा ध्रुवीकरणासाठीच आणला असेल तर अल्पसंख्याकांमध्येही ऐक्य निर्माण होणे वाईट नाही. शिवाय इतकी वर्षे गोव्यात राजकीयदृष्टय़ा शांत राहिलेल्या मुस्लिमांनी त्यासाठी भूमिका स्वीकारलेली असेल तर ते ब-याचेच लक्षण आहे. गेल्या १० वर्षात ख्रिस्ती समाजाचीही लोकसंख्या विरळ होत जात ती २० टक्क्यांवर पोहोचली आहे. गोव्याच्या लोकसंख्येची ही बदलती समीकरणे गोव्यातील बदलत्या राजकीय, सामाजिक वातावरणाचाही अंदाज देतात! राजकीयदृष्टय़ा त्याचा गंभीर परिणाम संभवणार आहे, हे निश्चित!
वाढत्या हिंदुत्ववादाविरोधात गोव्यात ख्रिस्ती-मुस्लिम ऐक्य?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2020 7:07 AM