शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "राणे कुटुंबीयांचा त्रास, लोकसभा, विधानसभा...";राजन तेलींनी आरोप करत घेतला मोठा निर्णय
2
एमआयएममुळे आता काँग्रेसचे वाढले टेन्शन; नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत रंगत 
3
“रवी राणा यांच्यामुळेच नवनीत राणा खासदार होऊ शकल्या नाहीत”; बच्चू कडूंचा थेट प्रहार
4
बाप-बेटी एकाचवेळी नशीब अजमावणार; निवडणूक शिवाजीनगरमधून लढणार?
5
५०० च्या नोटांवर अनुपम खेर यांचा फोटो का छापला?; आरोपीचं उत्तर ऐकून बसेल मोठा धक्का
6
३२ टक्क्यांपर्यंत घसरला TATA च्या 'या' कंपनीचा नफा; आता शेअर विकण्यासाठी गुंतवणूकदारांच्या रांगा
7
"बाबा सिद्दीकी चांगला माणूस नव्हता, त्यांच्यावर..."; लॉरेन्स बिश्नोईच्या शूटरचे धक्कादायक वक्तव्य
8
समीर वानखेडेंना शिंदेसेनेचा नकार, संजय शिरसाट यांनी स्पष्टच सांगितलं 
9
Diwali 2024: कसे करावे देवाच्या जुन्या, भग्न मूर्ति आणि फोटोंचे विघटन? वाचा शास्त्रशुद्ध उपाय!
10
मुख्यमंत्र्यांची भेट झाली आणि मेळावाच रद्द झाला; ठाणे जि.प. च्या माजी उपाध्यक्षांना मुरबाड देणार?
11
Diwali 2024: दिवाळीत घरबरोबरच मनाची स्वच्छता कशी करायची ते सांगताहेत गौर गोपाल दास!
12
"बाबा सिद्दीकींपेक्षाही वाईट अवस्था करणार"; सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी, ५ कोटींचाही उल्लेख
13
या संघानं ४५ धावांत All Out झाल्यावर जिंकली होती टेस्ट; टीम इंडियाला ते शक्य होईल?
14
दिवाळीपूर्वी शेअर बाजारातील तेजीला ब्रेक, सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह उघडले; Midcap स्टॉक्स आपटले
15
राहुचे नक्षत्र गोचर: ५ राशींना लॉटरी, धनलाभाचे योग; स्वप्नपूर्ती, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ!
16
IPL 2025: काव्या मारनला धक्का! लिलावाआधी दिग्गज क्रिकेटपटूने सोडली SRH ची साथ
17
Success Story : एकेकाळी RBI मध्ये केलंय काम, आता अब्जाधीशांमध्ये आलंय नाव; कोण आहेत सौरभ गाडगीळ?
18
आजचे राशीभविष्य: ५ राशींना धनलाभ, प्रमोशन, पगारवाढ योग; चैतन्य, उत्साहाचा दिवस
19
आसाम नागरिकत्वाचे ‘कलम ६-अ’ वैधच; १९७१ पर्यंत आलेल्यांना नागरिकत्व - सर्वोच्च न्यायालय 
20
राष्ट्रवादीच्या आमदारांसमोर पेच; तिकिटासाठी कोणता झेंडा हाती? आधी करतायत चाचपणी 

शहरे मृत्युशय्येवर! निम्मा महाराष्ट्र मुंबई, पुण्यात वसत असेल तर 'बुडणारच'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2024 7:57 AM

‘मल्टिऑर्गन फेल्युअर’च्या दिशेनं निघालीत शहरं. याचा पुरावा आधी मिळाला मुंबई-नागपुरात व काल पुण्यात.

पावसाचा एक तडाखा पुरेसा असतो, तुमच्या विकासाची रंगरंगोटी पुसण्यासाठी. ‘तुम्ही किती पाण्यात आहात’, हे मग समजते! तुम्ही नदीपात्रात रस्ता बांधला की नदी रस्त्यावर येते. नाल्यांवर इमारती बांधल्या की इमारतीत नाला घुसतो. मग साधा पाऊसही शहरांना सोसवत नाही. एखाद्या पावसानेही शहर उद्ध्वस्त होते. होत्याचे नव्हते होते. आपल्या शहरांची प्रतिकारक्षमताच संपत चाललीय. ‘मल्टिऑर्गन फेल्युअर’च्या दिशेनं निघालीत शहरं. याचा पुरावा आधी मिळाला मुंबई-नागपुरात व काल पुण्यात. बुधवारी पुण्यात जोरदार पाऊस बरसला. पाऊसच तो. बरसणं हे त्याचं काम. त्याची मर्जी. तो हवा तेवढा बरसतो. कधी चकार थेंबही देत नाही, तर कधी थांबण्याचे नाव घेत नाही. लहरी हा स्वभावच पावसाचा, पण माणसांचे काय? माणसाने सारासार विवेक सोडला, म्हणूनच तर पुण्याची ही स्थिती झाली.

‘ग्रोथ इंजिन’, ‘ऑक्स्फर्ड ऑफ द इस्ट’ वगैरे ख्याती असणारे हेच का ते पुणे, उद्योगनगरी आणि आयटी हब झालेले हेच का ते पिंपरी-चिंचवड, असा प्रश्न तेव्हा पडत होता. मध्ययुगाप्रमाणे माणसे हतबल झाली आणि एका पावसाने पार लष्कराला बोलावण्याची वेळ आली. पुण्यातला कालचा पाऊस उच्चांकी असला, तरी पुणे पाण्यात जावे, इतकाही नव्हता. खडकवासला प्रकल्पातील चारही धरणे आजही शंभर टक्के भरलेली नाहीत. यातील तुलनेने छोट्या असलेल्या खडकवासला धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग करावा लागला. त्यामुळे वस्त्यांमध्ये पाणी शिरले. सिंहगड रस्ता परिसरात जवळपास चार हजार नागरिकांचे स्थलांतर करावे लागले. एकूण पुणे जिल्ह्यात सहा जणांचा मृत्यू झाला. पुण्यातील मुळा-मुठा नदी, मुंबईतील मिठी, आळंदीमधील इंद्रायणी, तसेच पवना, राम नदी यांची अवस्था आज मरणासन्न आहे. पावसाळ्याखेरीज इतर महिन्यांत या नद्यांमधून वाहते ते प्रदूषित पाणी. या नद्यांवरच्या पुलांवरून जाताना नाकाला रुमाल लावून धरावा लागतो. प्रदूषित नदी, बुजवलेले नाले यांचा सविस्तर अभ्यास अभ्यासकांनी केला आहे. त्याचे अहवालही आहेत. पण, त्यावर हालचालीच नाहीत. एका अभ्यासानुसार पावसाचे २५ ते ३० टक्के पाणी जमिनीत मुरणे आवश्यक असताना आता केवळ पाच टक्केच पाणी मुरत आहे. ९५ टक्के पाणी वाहून जात आहे.

इमारतींचा पाया खणताना खणलेल्या खडकामुळे आणि त्यानंतर झालेल्या सिमेंटीकरणामुळे अनेक जलस्रोत आपण बंद करीत आहेत, याची फिकीर कुणालाही नाही. गेल्या तीन दशकांत पुण्यातील तीनशेहून अधिक लहान-मोठे जलस्रोत नाहीसे झाले आहेत. नाल्यात कचरा टाकून तो बुजवणे, एखादी इमारत बांधताना नैसर्गिक ओढ्याचा प्रवाह बदलला तर इमारतीत पाणी येणारच. रस्ते बांधताना शेजारी पाणी जाण्यासाठी वाट ठेवली नाही, तर पावसात रस्त्यांची तळी होणार. अशी नियोजनशून्य कामे करून आपण आपल्याच पुढे संकट उभे करीत आहोत. आपण पुढच्या पिढ्यांना नक्की काय देत आहोत, याचा विचार आपण करतो का? त्यांच्यासाठी राखीव असलेल्या संपत्तीवर आपण डल्ला मारतोय, याची थोडीही लाज आपल्याला वाटत नाही. शहरांच्या धमन्या, फुफ्फुसे असलेली जैवविविधता नष्ट करण्याचा चंग बांधल्यानंतर वेगळी स्थिती ती काय उद्भवणार? महापालिका अधिकारी आणि बिल्डर लॉबीतील साटेलोटेपणामुळे शहर जवळपास संपले आहे. बांधकामाचे परवाने कसेही देणे, नदीपात्रात रस्ते बांधणे, नाले, ओढे बुजवणे, बेकायदा बांधकामे, सिमेंटचे रस्ते, टेकड्या फोडणे, टेकड्यांवर झोपडपट्ट्यांना आश्रय देणे यांसारखे उद्योग केल्यानंतर निसर्गही आपल्याला अद्दलच घडवेल. विकासाचे फसलेले प्रारूप याला जबाबदार आहे.

पुणे-मुंबईत सगळे एकवटून टाकायचे. बाकी महाराष्ट्राकडे दुर्लक्ष करायचे. त्यातून निर्माण झालेले हे संकट आहे. पावसाने जरा ओढ दिली की डोळ्यात पाणी आणि जरा मुसळधार बरसला की घरादाराची राखरांगोळी, याला विकास म्हणत नाहीत. महाराष्ट्राची निम्मी लोकसंख्या आज पुणे आणि मुंबईवर अवलंबून असेल, तर यापेक्षा वेगळे चित्र कसे असेल? आपल्या यंत्रणा किती बेमुर्वतखोर आहेत, हे पोर्शे प्रकरणाने सिद्ध केले होतेच. नंतर पूजा खेडकरच्या निमित्ताने ते अधोरेखित झाले. याच यंत्रणांनी शहरांची ही स्थिती करून टाकली आहे. तुम्हाला शहराचे खिसे दिसतात, पण त्यांचे हृदय नाही दिसत. सतत ‘बायपास’ करून पुन्हा पथ्यं नाहीत पाळली, तर मरण आजचे उद्यावर जाईल एवढेच. पण, ते अटळ आहे.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर