गणेशोत्सव आणि मोहरमची परंपरा हातात हात घालून साजरी झाली. गणेशाच्या मंडपामुळे मोहरमच्या सवारीला अडथळा येऊ नये आणि सवारीमुळे गणेशोत्सवात व्यत्यय येऊ नये, असे सामंजस्य दाखवत या विभिन्न धर्मीय परंपरा एकात्मतेने जपल्या गेल्या. हा केवढा मोठा आदर्श आहे. राजकारण्यांनी यापासून योग्य बोध घेत या शहराला शांतता व विकास हवा, हे समजून घ्यायला हवे.
नगर शहरातील मोहरम आणि गणेशोत्सव शांतेतत पार पडला. नगर शहराचा मूळ स्वभाव हा शांततेचा व एकात्मतेचा आहे. येथे तेढ नाही, तर एकात्मता नांदते हा एक मोठा संदेश यावेळच्या गणेशोत्सवाने व मोहरमने दिला. नगरची ही ओळख दृढ होणे आवश्यक आहे.मोहरम आणि गणेशोत्सव एकत्रित आल्यामुळे पोलीस आणि महसूल प्रशासन चिंतेत होते. नगर शहरात काही सण, उत्सवात यापूर्वी तणाव निर्माण झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्याच घटनांचे सातत्याने स्मरण करत प्रत्येक सण, उत्सव व कार्यक्रमाच्या वेळी नगर शहर ‘संवेदनशील’ आहे, अशी हाकाटी पिटली जाते. वास्तविकत: हे शहर संवेदनशील नाही. अपवादात्मक घटनांवरुन अकारण तशी ओळख निर्माण केली गेली. जी ओळख अयोग्य व शहराची नाहक बदनामी करणारी आहे.
गणेशोत्सव हा हिंदू धर्मीय उत्सव मानला जातो. अर्थात या उत्सवातही आता सर्व धर्मीय नागरिकांचा सहभाग असतो. सगळेच मिळून हा आनंदोत्सव साजरा करतात. मोहरम हा मुस्लिम धर्माशी संबंधित आहे. इमाम हुसेन यांनी इस्लाम आणि मानवतेसाठी जे बलिदान दिले त्याची आठवण म्हणून मोहरम सुरु झाला. त्याची नगर शहरात एक दीर्घ परंपरा आहे. मोहरममध्ये काढली जाणारी कत्तल की रात्रची मिरवणूक व मोहरमच्या सवाऱ्यांच्या विसर्जन मिरवणुकीला अलोट गर्दी असते. हिंदू बांधवही सवाºयांचे मनोभावे दर्शन घेतात. सवाºयांवर चादर चढवितात.
यापूर्वीचा इतिहास पाहिला तर कत्तलकी रात्रची मिरवणूक दरवर्षी रात्री बारा वाजेपर्यंत चालते. तर मोहरमच्या सवाºयांची विसर्जन मिरवणूकही रात्रीपर्यंत सुरु असते. परंतु यावर्षी यंग पार्टी मंडळातील तरुणांनी प्रशासनाने दिलेल्या सूचना पाळल्या व सायंकाळी साडेपाच वाजता सवाºयांची मिरवणूक दिल्ली दरवाजाच्या बाहेर पडली. हा एकप्रकारचा विक्रम आहे. इतक्या लवकर ही मिरवणूक संपण्याची प्रथा नाही. पण, तो आदर्श निर्माण झाला. रस्त्यात गणेश मंडळांचे देखावे असताना दोन्ही धर्मीय नागरिकांनी एकमेकाप्रती सलोखा दाखवून गणेशोत्सव व मोहरम या दोन्ही परंपरांचा आदर केला. मोहरम मिरवणुकीसाठी रस्ता उपलब्ध व्हावा म्हणून अनेक गणेश मंडळांनी पूर्वनियोजित पद्धतीने आपले मंडप त्यापद्धतीने साकारले तर सायंकाळी गणेशोत्सवाला अडचण येऊ नये म्हणून यंग पार्टीने देखील मोहरमची मिरवणूक वेळेत संपवली. तरुणाईने यासाठी पुढाकार घेतला व शहाणपण दाखविले ही महत्त्वपूर्ण बाब आहे. कारण या दोन्ही परंपरांत तरुणांचा सहभाग मोठा असतो.शहरात हे सौहार्द टिकविण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी व पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांची भूमिकाही अत्यंत महत्त्वाची होती. त्यांनी अगोदरपासून सर्वांनाच नियमांची स्पष्ट कल्पना दिली होती. काही नेत्यांनी गणेश मंडळांच्या परवानग्यांवरुन प्रशासनाशी वाद घालण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रशासन आपल्या भूमिकांवर ठाम राहिले. नेत्यांना इतक्या कडकपणे कधी सुनावले गेले नव्हते. नेत्यांनी आदेश करायचा व प्रशासनाने त्यापुढे नमते घ्यायचे असे धोरण होते. पण अधिकाºयांनी तो पायंडा मोडला. सर्वधर्मीय शांतता समितीतील नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य केले.
गणेशोत्सवात मानाच्या गणपती मंडळांनी प्रशासनावर नाराज होत मिरवणुकीत बहिष्कार टाकला. त्यांनी नगर शहरात विसर्जन न करता औरंगाबाद रस्त्यावर कायगाव टोका येथे जाऊन आपल्या मंडळाच्या गणरायांचे विसर्जन केले. मात्र, हा वाद या मंडळांना टाळता येणे शक्य होते. गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत डीजे वाजवू नये, हा उच्च न्यायालयाचा आदेश आहे. न्यायालयीन आदेशानंतरही प्रशासनाकडे त्यासाठी आग्रह धरला जाणे नियमबाह्य ठरते. डीजेशिवाय मिरवणुका निघू शकत नाही, असा संदेश नकळत यातून जातो. गणेशोत्सव नागरिकांसाठी आहे की डीजेसाठी ? असाही प्रश्न यातून निर्माण होतो.
वास्तविकत: गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीचा आनंद हे लहानथोर सगळेच घेतात. अशावेळी या मिरवणुका पारंपरिक वाद्यांसह निघाल्या तर परंपराही टिकते व प्रदूषणही टळते. धांडगधिंगा असतो म्हणून नागरिक आता मिरवणुका पाहण्यासाठी येणे बंद होत चालले आहे. मिरवणुका शांततेत चालल्या तर सर्वांना त्याचा आनंद घेता येतो. नगरचे ग्रामदैवत असलेल्या विशाल गणेश मंडळाने आपल्या शिस्तबद्ध मिरवणुकीचे दर्शन घडविले. इतरही अनेक मंडळाच्या ढोल पथकांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. ढोल पथकांमुळे शालेय मुलांनाही या वाद्याचा परिचय झाला. लेझीम, झांज, दांडिया, दांडपट्टा, कवायती हे पारंपरिक कलाप्रकार दरवर्षी सादर करत या मिरवणुका काढता येणे शक्य आहे. त्यातून या उत्सवाचा हेतूही सफल होईल व आनंदही मिळेल. मात्र, केवळ काही तरुणांना डीजे हवा म्हणून गणेश मंडळांनी व नेत्यांनीही त्यासाठी अट्टाहास धरणे अनाकलनीय आहे. डीजे शिवाय मिरवणुकांचा आनंद घेता येत नाही किंवा डीजे शिवाय नृत्य करता येत नाही, असे म्हणणे हा तर मोठा विनोद ठरेल. जे लोक संस्कृती व धर्माच्या गप्पा मारतात त्यांनी तर ‘वाजव डीजे’ हे प्रकरण सर्वात अगोदर थांबवायला हवे.
या सर्व पार्श्वभूमीवर नगरकरांनी दाखविलेली शांतता व सौहार्द हे उठून दिसणारे आहे. कुठल्याही सामान्य नागरिकाने डीजे नाही म्हणून ओरड केलेली नाही. मोहरम आणि गणेशोत्सव एकाच वेळी सलोख्याने व शांततेत साजरे करुन आम्हाला एकात्मता, शांतता व त्यातून विकास हवा हा मोठा आदर्श नगरकरांनी व तरुणाईने समोर ठेवला आहे. आपल्या गावाचा हा लौकिक शहरवासीयांनी एकप्रकारे अधोरेखित केला आहे. नेत्यांसह सर्वांनीच यातून खूप काही शिकण्यासारखे आहे.- सुधीर लंके(लेखक ‘लोकमत’ अहमदनगरचे आवृत्तीप्रमुख आहेत)