उत्तर प्रदेशच्या देवरिया गावात काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या खाट सभेनंतर तेथे जमलेल्या लोकांकडून झालेली खाटांची पळवापळवी आणि हाणामारी बघितल्यानंतर कुठल्याही भारतवासीयाची मान शरमेने खाली जावी. केवळ देशातीलच नव्हे तर जगभरातील लोकांनी दूरचित्रवाहिन्यांवर हा ओंगळवाणा प्रकार पाहिला. काही देशांना भारतातील गरिबी, लाचारी आणि जातीभेद जगापुढे आणण्यात मोठे स्वारस्य असते. त्यांच्या हाती आयते कोलीतच लागले म्हणायचे. उत्तर प्रदेशात पुढील वर्षी विधानसभेची निवडणूक आहे आणि गेली २७ वर्षे तिथे सत्तेपासून दूर राहिलेल्या काँग्रेसने यावेळी आपली शक्ती पूर्णपणे पणास लावली आहे. लोकसभा निवडणुकीत मोदी आणि बिहार विधानसभा निवडणुकीत नितीशकुमार यांच्या विजयाचे शिल्पकार ठरलेले निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर हे यावेळी या राज्यात काँग्रेसला मदत करीत आहेत. खाट सभा ही त्यांचीच कल्पना. प्रचाराच्या या अभिनव पद्धतीचा ओनामा देवरिया येथे केला जाणार होता व तिथे जमणाऱ्या शेतकऱ्यांसाठी नव्याकोऱ्या २५०० खाटा मागविण्यात आल्या होत्या. नंतर या खाटा पुढील सभेसाठी नेण्याचे नियोजन होते. पण देवरियाची सभा आटोपताच लोक खाटांवर अक्षरश: तुटून पडले. त्या पळवून नेणाऱ्यांमध्ये महिला, वृद्ध सर्वच आघाडीवर होते. खाटांची खेचाखेची, तोडफोड, हाणामारी सर्व काही सोशल मीडियावर व्हायरल झाले. या देशातील लोकांची गरिबी म्हणा वा फुकटचंद प्रवृत्ती म्हणा, पुन्हा एकदा समोर आली. या वृत्तीला निवडणूक आली की उधाणच येत असते. राजकीय पक्षदेखील मतांसाठी वाट्टेल ती लालूच दाखवित असतात. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, असा अलिखित नियमच जणू झाला आहे. त्यामुळे निवडणुका आल्या की राजकीय पक्ष व उमेदवारांकडून जेवढे लुबाडता येईल तेवढे लुबाडून घ्यायचे, अशी लोकांचीही प्रवृत्ती झाली आहे. देवरिया येथील खाटा लुटण्याची चुरस बघितल्यावर लोक राहुल गांधींशी चर्चा करण्यासाठी आले होते की खाटा पळविण्यासाठी असा प्रश्न कुणालाही पडावा. राहुल गांधी एकूण ४० खाट सभांना संबोधित करणार होते पण पहिल्याच सभेतील खाटांची लुटालूट पाहिल्यानंतर पुढील सभांसाठी आता काय व्यवस्था केली जाते, ते बघायचे.
खाटांसाठी ‘झटापट’
By admin | Published: September 08, 2016 11:44 PM