- साधना शंकर(लेखिका, केंद्रीय राजस्व अधिकारी)
डिसेंबर २०२२ मध्ये आपण १२२ वर्षांतला सर्वांत जास्त तापमान असलेला महिना अनुभवला तेव्हापासून याची सुरुवात झाली. नंतर फेब्रुवारी २०२३ मध्ये १९०१ नंतरचा सर्वाधिक तापमान असलेला फेब्रुवारी जगाने पाहिला. भारतातच नव्हे, तर आशिया, युरोप, आफ्रिका मेडिटेरियन आणि अमेरिकेतही तापमान वाढलेले आहे. यापूर्वी तसे कधीच नव्हते. संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसांनी जुलैत म्हटल्यानुसार जागतिक तापमानवाढीचे युग आता संपले असून, जागतिक उत्कलनाचा काळ सुरू झाला आहे. औद्योगिक काळाच्या आधीपेक्षा जगाचे तापमान सरासरी १.२ टक्क्यांनी वाढले आहे. गेल्या काही वर्षांपासून उत्तर गोलार्धात टोकाची तापमानवाढ होण्याची अनेक कारणे सांगितली जातात.
माणसाचे नानाविध उद्योग आणि हस्तक्षेपामुळे ग्रीनहाउस गॅस वाढणे, अल निनोसारखे समुद्री प्रवाह, दक्षिण गोलार्धातील उष्ण पाणी वगैरे कारणांचा त्यात समावेश होतो. प्रशांत महासागरात सागा टोंगा ज्वालामुखी जानेवारी २०२२ मध्ये फुटला. त्याचाही संबंध काहीजण या बदलाशी जोडतात. या ज्वालामुखीमुळे अतिशय शक्तिशाली असे ग्रीन हाउस गॅसेस तयार झाले. वातावरणात मिथेनची पातळी वाढणे हेही एक वाढत्या तापमानाचे कारण सांगितले जाते. आपल्याला आता या उष्णतेच्या लाटांचा सामना करावयाचा आहे. नव्या बदलाशी जुळवून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. असहनीय उष्णतेमुळे पिके करपतात, जनावरे दगावतात; परंतु लक्षावधी लोकांचे वास्तव्य असलेल्या शहरांमध्ये मानवी आरोग्यावर या उष्णतेचा परिणाम होत असल्याने या विषयाकडे लक्ष वेधले गेले आहे. शहरातील हवेचा दर्जा घसरला आहे. आत्यंतिक उष्णतेमुळे मानवी हृदय आणि फुप्फुसावर ताण येत आहे. ज्यांना पोट भरण्यासाठी बाहेर पडावेच लागते अशा फेरीवाल्यांना, बांधकाम आणि शेतमजुरांना, वस्तू घरपोच पोहोचविणाऱ्यांना, तसेच वाहतूक पोलिसांना उष्णतेचा त्रास सहन करावा लागतो.
यापुढे उष्णतेच्या तीव्र लाटा येतच राहणार असा अंदाज व्यक्त केला जात असून, शहरांनी त्याचा सामना करण्याची तयारी ठेवली पाहिजे. भारतात उष्णतेशी सामना करण्याच्या जवळपास ३७ योजना आहेत. २०१६ मध्ये नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ॲथॉरिटीने त्यासाठी मार्गदर्शक सूत्रे आखून दिली आहेत. उष्णतेशी सामना करण्यासाठी या योजनांमध्ये पूर्वतयारी, समायोजन आणि प्रतिसादाचे उपाय सांगण्यात आले आहेत. २०१३ मध्ये अशा उपाययोजना करणारे अहमदाबाद हे दक्षिण आशियातले पहिले शहर ठरले.
उष्णतेच्या लाटेचा पूर्व इशारा देण्याची व्यवस्था स्थानिक पातळीवर करता येईल. त्याचप्रमाणे पाणी, तसेच वीजयंत्रणा व्यवस्थित सुरू ठेवणे, कमी उत्पन्न गट, तसेच वयस्करांसाठी सामूहिक वातानुकूलन केंद्र , कामकऱ्यांनी रोजच्या कामाचे तास बदलून घेणे, पिण्याच्या पाण्याची सोय, त्याचप्रमाणे कामाच्या ठिकाणी प्रथमोपचाराची व्यवस्था, शाळेच्या वेळा बदलणे अशा काही उपायांचा त्यात समावेश करता येईल. या उपायांची अंमलबजावणी झाली तर उष्णतेमुळे मानवी जीविताची हानी कमी होईल.
आत्यंतिक उष्णतेच्या लाटांचा सामना करावयाचा असेल तर दीर्घकालीन तयारीची गरज आहे. त्यामध्ये कोणावर त्याचा सर्वाधिक परिणाम होईल असे लोक आणि प्रदेश ओळखणे, झाडे कुठे लावली पाहिजेत हे ठरवणे, शुभ्र, तसेच शीत छपरांची योजना करणे, रस्ते आणि इमारती तापणार नाहीत अशी सामग्री वापरणे याही काही गोष्टी करता येतील. सौरऊर्जा बाहेर फेकणाऱ्या सामग्रीचा वापर, तसेच पाण्याचे ऊर्ध्वपातन वाढवणे हेही करता येईल. उष्णतेची लाट धडकेल तेव्हा वयस्कर नागरिक, शेजारीपाजारी आणि नातेवाईक यांच्याकडे लक्ष दिले पाहिजे. उष्णतेपासून लांब राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. उष्माघाताची लक्षणे काय असतात ते माहीत करून घेतले पाहिजे, तसेच भरपूर जलपान केले पाहिजे.
हवामानाचा अंदाज बांधणे आता कठीण झाले आहे. टोकाची परिस्थिती उद्भवते तेव्हा तिच्या परिणामांचा सामना करण्यासाठी स्थानिक पातळीवर उपाययोजनांवर भर दिला गेला पाहिजे. (लेखातील मते व्यक्तिगत)