नाइट लाइफ अनुभवायला, पार्ट्या करायला कुणाला आवडतं? - जगभरात असे अनेक जण आहेत; विशेषत: तरुण... नाइट लाइफ अनुभवण्यासाठी ते कायम वेगवेगळी स्थळं, स्पेशल क्लब शोधत असतात. आतापर्यंतची आपली सर्व दगदग त्यांना विसरायची असते, एक वेगळं, थ्रिलिंग लाइफ, निदान काही तासांपुरतं तरी त्यांना अनुभवायचं असतं. एका वेगळ्याच जगात त्यांना जायचं असतं. अशा वेळी आपल्याला कोणतंच भान नसावं, जगानं आपल्याशी ओळख दाखवू नये, आपणही त्यांच्याशी जान-पहचान करू नये, फक्त आपण आणि आपलं जग.. बस्स..
असं नाइटलाइफ अनुभवायचं तर त्यासाठी सर्वोत्तम स्थळ मानलं जातं ते म्हणजे बर्लिन. जर्मनीची राजधानी बर्लिन हे देखणं शहर अनेक कारणांसाठी प्रसिद्ध आहे. त्यातलं एक प्रमुख कारण म्हणजे तिथले हटके क्लब, तिथलं नाइटलाइफ. संपूर्ण जगभरातले लोक बर्लिनचं हे नाइटलाइफ अनुभवण्यासाठी बर्लिनला भेट देत असतात.
आपल्या आयुष्यातले क्षण संस्मरणीय करावेत आणि आपल्या कॅमेऱ्यामध्ये ते बंदिस्त करावेत, असं अनेकांना वाटत असतं. हेच क्षण नंतर त्यांच्या आयुष्यासाठी यादगार ठरणार असतात. त्यामुळे आपणही कुठे गेलो की आपला मोबाइल काढतो आणि त्यावर मनसोक्त फोटो, व्हिडीओज काढतो. काही वेळा इतरांचे किंवा विदेशी पर्यटकांबरोबरही आपण फोटो काढतो. बऱ्याचदा त्यांची परवानगी न घेताच किंवा त्यांच्या नकळतही फोटो, व्हिडीओ काढून एकमेकांना शेअर करतो.
बर्लिनचं नाइटलाइफ तर अख्ख्या जगात प्रसिद्ध. तिथल्या अनेक क्लबमध्ये रात्रीच्या वेळी चाहत्यांच्या अक्षरश: रांगा लागलेल्या असतात. केव्हा आपल्याला मध्ये जाता येईल याची बाहेरच्या प्रत्येकाला उत्सुकता असते. बऱ्याचदा तर क्लबमध्ये जाण्यासाठीच दोन-दोन तास लागतात. सर्व जण शिस्तीत रांगा लावून आपला नंबर लागण्याची अगदी आतुरतेने वाट पाहत असतात. तरीही ‘डोअर स्टाफ’ (गेटवरचे ‘पहारेकरी’) प्रत्येकाकडे अगदी रोखून पाहत असतात. कोण काय करतो, यावर त्यांचं बारकाईनं लक्ष असतं. दोन तास इथल्या गर्दीत उभं राहून तुमचा नंबर आल्यावर हुश्श वाटत असतानाच त्यातला एखादा डोअर स्टाफ तुमच्याकडे येऊन तुम्हाला रांगेतून बाहेर काढून घरी पाठवू शकतो आणि तरीही तुम्ही काहीही करू शकत नाही. त्याला जाबही विचारू शकत नाही.
का झालं असं? त्यानं का तुम्हाला हाताला धरून बाहेर पाठवलं आणि क्लबमध्ये येण्याला मनाई केली? बर्लिनमधलं नाइटलाइफ अनुभवण्यासाठी तुम्हाला तिथे जायचंच असेल तर एक गोष्ट आधी पक्की लक्षात ठेवायची, ती म्हणजे या क्लबमध्ये जाण्यापूर्वी आपला मोबाइल एक तर घरी ठेवून यायचा, नाहीतर डोअर स्टाफ तो ताब्यात घेतील किंवा मोबाइलच्या कॅमेऱ्यावर स्टिकर लावून त्याचे डोळे बंद करतील. त्यानंतरच तुम्हाला तो मोबाइल कदाचित आत नेता येईल. अर्थात तिथेही स्टाफची तुमच्यावर सक्त नजर असेल. तिथे गेल्यावर कोणी आपल्याच मोबाइलवरचं ते स्टिकर काढून फोटो, व्हिडीओ काढले तर ऐन रंगात आलेल्या पार्टीतूनही त्याला बाहेर काढून लगेच घरी पाठवलं जाईल!
का? कारण तो त्यांच्या नियमांचा आणि संस्कृतीचा भाग आहे. जगा आणि जगू द्या.. डिजिटल डिटॉक्सचा, इलेक्ट्रॉनिक उपकरणांपासून आपलं व्यसन सोडवण्याचाही तो एक भाग आहेच, पण त्याहीपेक्षा दुसऱ्याचा खासगीपणा जपण्याच्या शिष्टाचाराचाही एक भाग आहे. त्यामुळे इथलं नाइटलाइफ अनुभवण्यासाठी येणारे चाहते अगदी निश्चिंत मनानं इथे येतात. कारण इथे आल्यावर ना तुमची ओळख जगजाहीर होण्याची शक्यता असते, ना तुम्हाला नको असताना कोणी ‘कॅच’ करण्याची आणि ते फोटो, व्हिडीओ व्हायरल होण्याची भीती! त्यामुळे एकदा का इथे प्रवेश केला की चाहते अगदी मुक्त आणि निश्चिंत मनानं तिथे वावरतात. स्वर्गसुख अनुभवतात!
बर्लिनची ही संस्कृती आता जगभरातील अनेक देशांत, शहरांत स्वीकारली जाते आहे. लंडनमधील ‘फॅब्रिक’, ॲमस्टरडॅम येथील ‘रॅडिऑन’, स्पेनमधील ‘पाइक्स इबिझा’.. अशा अनेक जगप्रसिद्ध क्लबनंही तिथे प्रवेश करताना मोबाइल आणि कॅमेऱ्याचे डोळे बंद करण्याची, त्यांना चिकटपट्टी लावण्याची पद्धत सुरू केली आहे.
फोटो म्हणजे सुंदर क्षणांतली भेसळ
बर्लिनमधील ‘बेसमेंट’ या जगप्रसिद्ध क्लबच्या संस्थापक टी अबाशिझ यांनी तर २०१९ पासूनच आपल्या क्लबसाठी हा नियम लागू केला आहे. त्या म्हणतात, हा एक कल्चरल शिफ्ट आहे आणि लोकांना आपल्या आयुष्यातले निदान काही क्षण तरी कोणत्याही व्यत्ययाशिवाय जगायचे आहेत. हे क्षण त्यांना मोबाइलच्या कॅमेऱ्यात नाही, तर त्यांच्या हृदयात साठवायचे आहेत. फोटो काढणं म्हणजे त्या सुंदर क्षणांत भेसळ करणं. त्यांच्या या इच्छेचा आम्ही आदर करतो...