वसंत भोसलेकोकणचे सुपुत्र आणि रेल्वेमंत्री सुरेश प्रभूयांनी मंत्रिपदाची सूत्रे घेतल्यापासून कोल्हापूरचे स्वप्न सत्यात उतरेल अशी आशा निर्माण झाली आहे. त्याचे सुचिन्ह म्हणजे कोल्हापूरशी कोकणीली रेल्वेमार्गाने जोडण्याच्या कामास गती मिळू लागली आहे. कोल्हापूर हे ऐतिहासिक शहर रेल्वेच्या नकाशावर आले, त्याला ११५ वर्षे झाली. छत्रपती शाहू महाराज यांनी आपल्या संस्थानच्या खर्चाने मुंबईहून मिरजमार्गे कर्नाटकात जाणारी रेल्वे १९०७ मध्ये कोल्हापुरात आणली. कोल्हापूर रेल्वेमार्गावर नसल्याने मिरज जंक्शनहून येणारी रेल्वे कोल्हापूरला थांबते. पुढे मार्गच नाही. वीस वर्षांपूर्वी कोकण रेल्वे झाली. तेव्हापासून कोल्हापूरहून कोकणात जाण्यासाठी रेल्वेमार्ग आखला जावा आणि महाराष्ट्राला लाभलेल्या कोकण किनारपट्टीचा तसेच बंदराचा फायदा व्हावा, अशी अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. त्यामुळे एकीकडे कोल्हापूर-सांगली-सातारा-सोलापूर, आदी जिल्ह्यांचा दक्षिण महाराष्ट्र कोकणला जोडला जाईल, शिवाय शेजारच्या उत्तर कर्नाटकातील पाच जिल्ह्यांसाठी रत्नागिरी जवळची बंदरे अधिकच जवळ येतील. महाराष्ट्राला गुजरातच्या सीमेपासून गोव्यापर्यंत ७२० किलोमीटरचा किनारा लाभला आहे. यामध्ये पूर्वी अनेक बंदरे कार्यान्वित होती. केवळ मालवाहतूक नव्हे, तर गोवा, कोकणपासून मुंबई जलवाहतुकीने जोडला गेला होता. सुरुवातीला रस्ते बांधणी आणि नंतर रेल्वेमार्गाची उभारणी होत गेली तसे या जलवाहतुकीकडे दुर्लक्ष होऊन ती बंदच पडली. आता कोकण किनाऱ्यावर रत्नागिरीजवळ जयगडला खासगी क्षेत्रातून मोठे बंदर तयार झाले आहे. या बंदरातून मोठ्या प्रमाणात मालवाहतूक शक्य आहे. दक्षिण महाराष्ट्र अणि उत्तर कर्नाटकात झालेल्या अनेक धरणांमुळे शेती विकसीत झाली आहे. साखर, दूध, अन्नधान्य तसेच सूत उत्पादन मोठे आहे. औद्योगिक विकासही झाला आहे. या सर्वांसाठी आणि वाढत्या आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी मुंबई या एकमेव बंदराशिवाय पर्याय नाही. त्या बंदरावरील प्रचंड वाहतूक लक्षात घेता मालाच्या आयात-निर्यातीसाठी दुसऱ्या बंदराची गरज होती. ती आता पूर्ण होत आहे; मात्र त्या बंदरावर सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून मालमोटारीने वाहतूक करणे खर्चिक आहे. त्यासाठी रेल्वेची गरज आहे. कोल्हापूरच्या उशाला बंदर झाले असताना त्याचा लाभ घेण्यासाठी कोल्हापूरला थांबलेली रेल्वे कोकण रेल्वेला जोडणे आवश्यक आहे. शिवाय जयगड बंदर ते कोकण रेल्वेमार्ग हा ३४ किलोमीटरचा मार्गही रेल्वेनेच जोडण्यात येणार आहे.एकीकडे कोल्हापूरने दक्षिण महाराष्ट्र ते उत्तर कर्नाटक जोडला जाईलच, शिवाय जयगड बंदर अधिक उपयुक्त ठरण्यासाठी कोकण रेल्वेबरोबरच कोल्हापूरचाही वापर अधिक कार्यक्षमपणे करता येईल. यासाठी कोल्हापूर ते वैभववाडी हा मार्ग आखणे आवश्यक आहे. याचे सूतोवाच सुरेश प्रभू यांनी अलीकडेच केले होते. आता त्याचे सर्वेक्षण करण्यासाठी मुंबईच्या जे. पी. इंजिनिअरिंग कंपनीला कामही दिले आहे. या कंपनीने दोन दिवसांपूर्वी सर्वेक्षणाचे काम सुरू केले, ते दोन महिन्यांत म्हणजे पावसाळ््यापूर्वी पूर्ण करण्यात येणार आहे. एकदा का तांत्रिक बाजू तपासून कोल्हापूर-वैभववाडी मार्ग अंतिमत: मंजूर झाला की, कोल्हापूरचे वैभव सातासमुद्रापार जाण्यास मदत होणार आहे. आपला ७२० किलोमीटरचा किनारा कोल्हापूरहून जोडणे आवश्यक आहे म्हणजे नाशिक, पुणे आणि कोल्हापूर अशा दोन-सव्वादोनशे किलोमीटरचा तिसरा तळकोकणाशी जोडणारा रेल्वेमार्ग होईल. आता यात महाराष्ट्राने मागे न राहता प्रयत्न करायला हवा. ज्या ब्रिटिश कालखंडात शाहू महाराजांनी संस्थानाच्या खर्चाने कोल्हापूरला रेल्वे आणली. त्यांच्या कार्याचा विस्तार करण्याची ही मोठी संधी महाराष्ट्राला मिळाली आहे. बोलणे कमी, पण कृतीवर भर देणारे सुरेश प्रभू रेल्वेमंत्री म्हणून लाभले आहेत. त्यांना बळ देऊन महाराष्ट्राने एक नवा विकासाचा मार्ग आखावा.
कोल्हापूरचे वैभव कोकणाला जोडणार
By admin | Published: May 07, 2015 4:14 AM