निळू दामले(ज्येष्ठ पत्रकार) -भाजपा आणि सेनेचं सरकार स्थापन झालं आहे. लोकसभेच्या निवडणुका झाल्या तेव्हां कुरबूर करत दोन्ही पक्ष एकत्र होते. नंतर विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी जागावाटपात मतैक्य न झाल्यानं दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे राहिले. सेनेची अस्मिता-अस्तित्व आणि भाजपाची एकमेव राष्ट्रीय पक्ष म्हणून वाढण्याची इच्छा, या दोन गोष्टीत संघर्ष होता. शेवटी सेनेला संपवण्याऐवजी सांभाळण्याचा शहाणपणा भाजपाला सुचला. तसंच आपल्या अस्मितेकडं वास्तववादी दृष्टिकोनातून पाहण्याचं शहाणपण सेनेला सुचलं.प्रादेशिक पक्ष, प्रादेशिक अस्मिता, प्रादेशिक नेते हे भारतातलं एक वास्तव आहे. भारतात अनेक भाषा आहेत. प्रत्येक भाषा स्वत:चा स्वतंत्र इतिहास, संस्कृती विकसित करत असते. माणसं जगात कुठंही गेली, कोणत्याही विचारांना चिकटली तरी मुळात आणि तळात एक भाषिक संस्कृती टिकटिक करत असते. राजकारणात आर्थिक आणि राजकीय विचारधारा येतात, आवश्यक असतात. त्या विचारधारांत पडूनही माणसं आपलं सांस्कृतिक अस्तित्व टिकवत असतात. हे अस्तित्व त्या-त्या राज्यातली करोडो माणसं आपले राज्यभाषी पुढारी आणि त्यांच्या भोवती तयार होणाऱ्या संघटनांत गुंफतात. बाळ ठाकरे, बीजू पटनायक, ममता बॅनर्जी, चंद्राबाबू नायडू , तेलंगणी नेते राव, ही उदाहरणं.स्वातंत्र्याच्या आंदोलनात भारत नावाचा एक देश तयार करण्याची खटपट महात्मा गांधींनी केली. त्यांच्या प्रयत्नातून काँग्रेस ही चळवळ आणि नंतर पक्ष तयार झाला. स्वातंत्र्यानंतर काँग्रेस पक्षानं राज्याराज्यांतल्या भाषिक अस्मितांना, भाषक नेते आणि समाजगटांना सामावून घेतलं. जोवर हे काँग्रेसनं सांभाळलं, चरणसिंह, यशवंतराव चव्हाण, पटनायक, कामराज, टी अंजय्या, इत्यादी स्थानिक लोकांना सत्तेत वाटा दिला, तोवर काँग्रेस शक्तिमान होती, इतर पक्षांना वावच नव्हता.इंदिरा गांधींनी राज्याराज्यांतल्या नेत्यांना संपवण्याचं, नमवण्याचं राजकारण सुरूकेलं. चव्हाण, पवार इत्यादींना कमकुवत केलं आणि शिवसेनेला बी टीम म्हणून वापरलं. धड सत्तेत वाटा नाही आणि धड स्वतंत्र पक्ष म्हणून स्थान नाही, अशा अवस्थेत सेनेनं एक स्वतंत्र रूप घेतलं, ताकद गोळा केली. त्याच वेळी जनता पक्ष नावाची एक शक्ती महाराष्ट्रात आकार घेत होती. पण ती टिकली नाही. जनता पक्षातले समाजवादी संपले, जनसंघ टिकला आणि भाजपात रूपांतरित झाला. भाजपा आणि सेना दोघं एकत्र आले. सन १९९५ पर्यंत, थेट २०१४ पर्यंत भाजपा ही देशात फार मोठी ताकद नव्हती, काँग्रेसपेक्षा भाजपा लहान होता. सेना आणि भाजपा यांना एकत्र नांदणं शक्य झालं. काँग्रेसच्या विरोधात दोघं मिळून विकसित झाले. महाराष्ट्राच्या राजकारणातली पैस सेनेनं व्यापली आणि भाजपाला सांभाळून घेतलं. २०१४ मध्ये मोदी लाटेनं भाजपा देशात पहिल्या क्रमांकावर गेला. मुळातली ताकद फार तर पंधरा ते वीस टक्के असताना काँग्रेस विरोध आणि मोदींच्या नेतृत्वाबद्दल आकर्षण या दोन गोष्टींसाठी भाजपा ताकदीच्या व्यस्त प्रमाणात सत्तेत पोचला. महाराष्ट्रातलं समीकरण बदललं. सेना आणि भाजपा या दोन स्वतंत्र राजकीय संस्कृती, घटना आहेत. सेना ही बाळ ठाकरे या व्यक्तीनं उभी केलेली संस्था आहे. ठाकरे कोणत्याही विचारधारेत वाढलेले नव्हते. ते एक व्यंगचित्रकार होते. व्यंगचित्रकार मार्मिक असतो, स्वतंत्र असतो. समाजात घडणाऱ्या घटना अचूक हेरून त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करत असतो. पर्यायी विचार, कार्यक्रम इत्यादी दीर्घ आणि गुंत्याच्या गोष्टी व्यंगचित्रकार मांडत नाही. महाराष्ट्रात आणि भारतातल्या घटना आणि प्रवाहांना ठाकरे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. देशात समाजवादाची भाषा बोलली गेली, पण विकास झाला नाही. सरकार सेक्युलॅरिझमची भाषा करे, पण मुसलमानांना चोंबाळत असे. महाराष्ट्रात मराठी माणसांचा विकास होत नाही, इतर भाषिकांची मात्र चलती होते. लोकशाही आणि शांततेच्या मार्गाचा उदोउदो होत असे, पण दंगल केल्याशिवाय कोणतीही गोष्ट धसाला लागत नसे. आंबेडकर, फुले, शाहूमहाराज यांच्या गोष्टी केल्या जात आणि सर्व पक्ष जातीचं राजकारण करत. या गोष्टी सामान्य माणसाला आवडत नसत. परंतु आपली नाराजी व्यक्त करणं त्याला शक्य नव्हतं. समाजात एक राजकीय पोकळी तयार झाली होती. बाळ ठाकरे यांनी ती भरून काढली. ठोकशाही, राडे, मुसलमान असोत की गुजराथी, कोणावरही धाडकन टीका, निवडणुकीत जातीचा विचार न करता माणसं उभी करणं, लोकशाही नाही आदेश. लोकांना हे आवडलं. भाजपाचं चरित्र यापेक्षा वेगळं. रा.स्व. संघ, जनसंघ, जनता पार्टी, भाजपा अशी या पक्षाची वाटचाल. सत्तर-ऐंशी वर्षांची पार्श्वभूमी. देशातली सगळी माणसं, त्यांच्या जाती, त्यांचे धर्म, त्यांच्या भाषा आणि संस्कृती, त्यांच्या खऱ्या-खोट्या अस्मिता, त्यांचे विविध आर्थिक वर्ग, त्यांचं शहाणपण आणि वेडेपण इत्यादी सगळ्या गोष्टींचा तोल सावरत भाजपाला राजकारण करावं लागतं. त्यासाठी एक सम्यक एकात्मिक विचारधारा असावी लागते. ती करण्यासाठी खूप खटपट करावी लागते. हा खटाटोप सुखासुखी नसतो. नाना परस्परांना छेद देणाऱ्या गोष्टी कराव्या लागतात. कारण समाजातल्या सर्व स्तरांना सांभाळून घ्यावं लागतं. भारतात जात, धर्म, भाषा, वर्ग, संस्कृती, घराणी, जिल्हे, इतिहास असे अनेक कप्पे आहेत. प्रत्येक कप्पा भावनाचिंब असतो. हे सर्व कप्पे सांभाळणं अशक्यच असतं. ते जास्तीतजास्त शक्य करण्याची खटपट करावी लागते. भाजपा या राष्ट्रीय पक्षाचं हे चरित्र.भारत या देशाचा इतिहास, गुंते, वैविध्य पाहिल्यावर भाजपासारखा देशपातळीवरचा पक्ष असणं आणि सेनेसारखा प्रादेशिक पक्ष असणं या गोष्टी अटळ दिसतात. जात, धर्म, संस्कृती, भाषा, इत्यादी कप्पे संख्येनं कमी होऊन आर्थिक आणि परदेश धोरण या दोन मुद्द्यांवर येऊन जनता ठेपत नाही तोवर ही रचना अटळ दिसते. तो टप्पा अजून तरी बराच दूर आहे, दृष्टिपथात नाही. म्हणूनच भाजपा आणि सेनेनं एकत्र येणं, नांदणं आवश्यक आणि अटळ आहे. सेनेला नखं आहेत, दात आहेत, सेना गुरगुरते. वाघाची ती व्यवच्छेदक लक्षणं आहेत. ती नसतील तर वाघ वाघ राहणार नाही, शेळी होईल. तेव्हां भाजपाला या वाघाला वाघच ठेवून त्यासोबत एकत्र नांदायची सवय लावावी लागेल. एकेकाळी काँग्रेसला ही सवय होती. काँग्रेसनं ती गमावली, त्याचा परिणाम काँग्रेस भोगते आहे. सेना-भाजपा सरकार घडणं यातून काँग्रेसनंही शिकायला हवं. दोन्ही पक्षांनी जातीचा हिशेब इतक्या टोकाला नेला, की दलित, अल्पसंख्य, मध्यम जाती यांनाही पक्ष दुरावला. मध्यम मार्ग, सर्वांना सांभाळून घेणं ही काँग्रेसची जुनी परंपरा, दोन्ही काँग्रेस विसरले. दोन्ही काँग्रेसमधे शरद पवार सीनियर, जास्तीतजास्त अनुभवी. आपल्या भोवती गणंग गोळा करण्याच्या नादात त्यांनीही जनाधार गमावला. सर्व लोकांना बरोबर घेणं सोडाच, काँग्रेस पक्षालाही सोबत ठेवणं त्यांना जमलं नाही. स्थैर्य आल्यानं युती सरकारला आता कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्याची शक्ती आणि शांतता लाभेल. महाराष्ट्राची आर्थिक स्थिती चिंताजनक आहे. दुष्काळ आहे. भ्रष्टाचार आणि दिरंगाईमुळं औद्योगिक वाढ मंदावली आहे. ही आव्हानं युती सरकारला पेलायची आहेत. दोन्ही पक्ष काँग्रेसइतके भ्रष्टाचारी नसले तरी तो दोष दोन्ही पक्षात शिरलेला आहे. तो आटोक्यात आणावा लागेल. धर्म आणि जातीची तेढ वापरून घेण्याचा मोहही कदाचित सत्ताधारी पक्षांना होईल. तो टाळला तर बरं. फडणवीस शहाणे आहेत, विवेकी आहेत. त्यांना विधिमंडळ आणि सरकार या दोहोंचा चांगला परिचय आहे. ते निर्णय घेतील आणि अमलातही आणतील, अशी आशा बाळगायला जागा आहे. फक्त फार बोलतात एवढंच. पाहूया.
युती झाली, आता समन्वय हवा!
By admin | Published: December 05, 2014 11:37 PM