पूजा दामलेशालेय स्तरावर शिक्षण घेत असताना अनेक विद्यार्थ्यांना गणित विषयामुळे शिक्षण अर्धवट सोडावे लागते अथवा विद्यार्थी नापास होत असतात. परिणामी शैक्षणिक नुकसान होते. त्यामुळे या आठवड्यातच मुंबई उच्च न्यायालयाने दहावीसाठी गणित ऐच्छिक विषय ठेवण्याचा विचार करा, अशी सूचना राज्य शिक्षण मंडळाला दिली. न्यायालयाच्या या सूचनेनंतर विविध स्तरांवर चर्चा रंगल्या. यामध्ये अनेकांनी याला पसंती दिली, पण शिक्षक स्तरातून याला कडाडून विरोध झाला. गणित हा विषय खरोखरच उपयुक्त आहे का नाही, याविषयी तज्ज्ञांकडून जाणून घेतले.घरात शालेय विद्यार्थी असल्यावर ‘अभ्यासाला बस’ हे वाक्य नेहमीच ऐकायला मिळते. पण अभ्यास कर म्हणजे नक्की काय, याचे उत्तर हे अनेकदा पाठांतर करणे असेच असते. कारण, गेल्या कित्येक वर्षांत शिक्षण व्यवस्थेत मूलत: बदल झाले नाहीत. अभ्यासक्रमात बदल करण्यात येतो, पण हे बदल म्हणजे ठिगळ लावण्याचा प्रकार असतो. विद्यार्थ्यांच्या बुद्धीला या अभ्यासक्रमातून चालना मिळत नसल्याचे मत मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हरीश शेट्टी यांनी व्यक्त केले. इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना शिकवल्या जाणाऱ्या गणितामुळे त्यांचे व्यवहार ज्ञान वाढते. आयुष्यात, व्यवहारात उपयुक्त असणारे गणिताचे ज्ञान त्यांना मिळते. पण इयत्ता आठवीनंतर शिकवल्या जाणाऱ्या गणिताचा व्यवहारात तितकासा उपयोग होत नाही. पण विद्यार्थ्यांवर हा विषय लादला जातो. गणित विषय ऐच्छिक केल्यावरही जवळपास ८० टक्के विद्यार्थी गणित विषयालाच पसंती देतील. दहावीत ९५ टक्के गुण मिळवणारा विद्यार्थी १२ वीला अनेकदा ६५ टक्क्यांवर येतो आणि अभियांत्रिकीच्या शिक्षणावेळी त्याला केटी लागतात. यावरून स्पष्ट होते की, दहावीचे शिक्षण, गुण हे पाठांतरावर असतात. याउलट परिस्थिती ही इंटरनॅशनल बोर्डच्या अभ्यासक्रमाची आहे. विद्यार्थ्यांच्या ‘क्रिटिकल थिकिंग’ला तेथे वाव मिळतो. आपल्या बोर्डाच्या अभ्यासक्रमात साचेबद्ध उत्तरे अपेक्षित असतात. यामुळे विद्यार्थ्यांची पाठांतर क्षमता वाढते, पण विचार क्षमता वाढत नाही. त्यामुळे अभ्यासाच्या रचनेविषयी विचार व्हायला हवा. गणित विषय ऐच्छिक करणे ही पहिली पायरी आहे. प्रत्यक्षात संपूर्ण अभ्यासक्रमात बदल करणे अपेक्षित आहे. सत्तरच्या दशकात बोर्डाकडे गणिताचे तीन पर्याय होते. गणित विषयाची आवड नसलेले विद्यार्थी त्यांच्या आवडीचे विषय शिकतील. अभ्यासक्रमात आमूलाग्र बदल करण्याची आवश्यकता असल्याचे डॉ. शेट्टी यांनी स्पष्ट केले. भांडुप येथील सरस्वती विद्यामंदिरमधील शिक्षक लीलाधर महाजन यांच्या म्हणण्यानुसार, विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञानासाठी गणित हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. गणित विषय ऐच्छिक केल्यास व्यवहार आणि पर्यायाने आयुष्यात विद्यार्थी मागे पडतील. ज्या विद्यार्थ्यांना गणित विषयात रस नसतो, अशा विद्यार्थ्यांना दहावीनंतर कला, वाणिज्य शाखा निवडण्याचा पर्याय उपलब्ध आहे. पण दहावीपर्यंत गणित शिकणे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.गणित विषय हा कठीण आहे. त्यामुळे विद्यार्थी शिक्षण सोडतात, नापास होतात हे विधान योग्य नाही. गणित विषयात आलेख, सांख्यिकी आणि संभाव्यता हे धडे आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांना गुण मिळवता येतात. यामधून विद्यार्थ्यांना २० ते २५ गुण सहज मिळतात. शाळेकडून विद्यार्थ्यांना १५ ते २० गुण मिळतात. त्यामुळे विद्यार्थी ३५ ते ४० गुण सहज मिळवू शकतो. अन्य विषयांत पाठांतर लागते, पण गणित विषयामुळे विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना मिळते. गणित हा सरावाचा विषय आहे. दैनंदिन जीवनाशी गणिताचा संबंध आहे. गणितच ऐच्छिक का, दहावीपर्यंत विद्यार्थी इतिहास, भूगोल, विज्ञान, इंग्रजी, मराठी हे विषयही शिकत असतो. गणितामुळे नफा, तोटा, बेरीज, गुणाकार, क्षेत्रफळ अशा विषयांचे ज्ञान मिळते. त्यामुळे या विषयाची आवड असणारे विद्यार्थी पुढे जाऊन जीवनात वेगळे काही तरी करून दाखवतात हे निश्चित. त्यामुळे गणित विषयाला पर्याय नको, असे मत महाजन यांनी व्यक्त केले.
poojadamle.15@gmail.com