सध्या विदर्भातील बहुतांश रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. जिल्हा मार्ग असोत, की राज्य व राष्ट्रीय महामार्ग, काही अपवाद वगळता, बहुतांश रस्त्यांवर मोठ्या संख्येने खड्डे पडले आहेत. काही खड्ड्यांचे आकार तर एवढे मोठे आहेत, की छोट्या वाहनांचे संपूर्ण चाकच त्यामध्ये सामावते. परिणामी, वाहनचालकांना व प्रवाशांना अक्षरश: जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. वाहनांच्या सरासरी वेगावर मर्यादा येऊन, वेळ व इंधनाचा अपव्यय होतो, मनस्ताप सहन करावा लागतो, तो वेगळाच! खड्ड्यांमुळे अपघातांच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. दरवर्षी पावसाळा संपला, की हे चित्र दिसते. यावर्षी तर विदर्भात फारसा पाऊसही झाला नाही. तरीदेखील रस्त्यांची चाळण झाली आहे. रस्ते निर्माणाचे निकृष्ट प्रतिचे काम आणि अत्यंत सुमार दर्जाची देखभाल व दुरुस्ती, हे त्यामागचे एक कारण आहे. आपल्या देशात रस्त्यांच्या कामात एवढा प्रचंड भ्रष्टाचार होतो, की वाटपानंतर शिल्लक राहिलेल्या रकमेत उत्कृष्ट दर्जाच्या रस्त्यांच्या निर्मितीची अपेक्षाच करता येत नाही. भ्रष्टाचार झाल्यामुळे निकृष्ट दर्जाचे रस्ते तयार होतात, की भ्रष्टाचाराची वारंवार संधी मिळावी यासाठी निकृष्ट दर्जाचे रस्ते बनविल्या जातात? या प्रश्नाचे परिपूर्ण उत्तर तर ब्रह्मदेवही देऊ शकणार नाही. बहुधा रस्ते लवकरात लवकर खराब व्हावे आणि पुन्हा भ्रष्टाचाराची संधी उपलब्ध व्हावी, यासाठीच रस्त्यांवरून पावसाच्या पाण्याचा निचरा होण्याची सोय केल्या जात नसावी! डांबर आणि पाणी यांचे शत्रुत्व जगजाहीर आहे. त्यामुळे दीर्घकाळ टिकणारे रस्ते हवे असतील, तर रस्त्यांवर पाणी थांबणार नाही, अशी व्यवस्था हवी. दुर्दैवाने आपल्या देशात बहुतांश रस्त्यांवर पाण्याचा निचरा करण्याची सोयच नसते. एखाद्या चिकट पदार्थाच्या साहाय्याने एकत्र जोडलेल्या वस्तूंना, तो चिकट पदार्थ विरघळवून विलग करणे, हा पाण्याचा गुणधर्म आहे. डांबर या चिकट पदार्थाच्या साहाय्याने एकत्र जोडलेली खडी म्हणजे रस्ता! पाऊस पडला, की रस्त्यावर पाणी गोळा होते, वाहनांच्या टायरच्या दबावामुळे ते पाणी रस्त्याच्या पृष्ठभागाखाली शिरते, डांबराला विरघळवते आणि परिणामी खडी सुटी होऊन खड्डे पडतात! रस्त्यांवर खड्डे पडायला नको असतील, तर रस्त्यांवर पाणी थांबणारच नाही, अशा प्रकारे रस्त्यांचे निर्माण करायला हवे. त्यासाठी रस्त्यांना कडांच्या दिशेने उतार हवा आणि तेथून पाण्याचा सहज निचरा करण्याची व्यवस्था हवी. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कचरा साचून तुंबणार नाही, याची सर्वांनी काळजी घ्यायला हवी. दुर्दैवाने यापैकी काहीही होत नाही आणि त्याचा परिपाक म्हणजे चाळणी झालेले रस्ते!
विदर्भातील बहुतांश रस्त्यांची अक्षरश: चाळण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 12:29 AM