ज्यांच्या जगप्रसिद्ध समीकरणामुळे अण्वस्त्र निर्मितीची वाट प्रशस्त झाली, ते विख्यात शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईन एका मुलाखतीदरम्यान असे म्हणाले होते, की तिसरे महायुद्ध कोणत्या अस्त्रांनी लढल्या जाईल हे मला माहीत नाही; पण चौथे महायुद्ध मात्र नक्कीच दगड आणि लाठ्यांनी लढले जाईल! तिसरे महायुद्ध झालेच तर ते अण्वस्त्रांनी लढले जाईल आणि त्यामध्ये एवढी अपरिमित हानी होईल, की जग पुन्हा अश्मयुगात पोहचेल, असे त्यांना सुचवायचे होते. गत काही काळापासून जागतिक पटलावर अशा काही घडामोडी घडत आहेत, की आईनस्टाईन यांना वाटलेली भीती प्रत्यक्षात उतरण्याची वेळ नजीक येऊन ठेपली की काय, असे वाटू लागले आहे. रविवारी उत्तर कोरियाने केलेल्या हायड्रोजन बॉम्बच्या चाचणीमुळे तर, आता फक्त महायुद्धाची ठिणगीच काय ती पडायची बाकी आहे, अशी वातावरण निर्मिती होत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लगोलग उत्तर कोरियाला व्यापक लष्करी प्रतिसादाची धमकी देऊन टाकली, तर तिकडे दक्षिण कोरियाने उत्तर कोरियाच्या अण्वस्त्र ठिकाणांवर क्षेपणास्त्रे डागण्याचा सराव केला. एकंदर अशी स्थिती निर्माण होत आहे, की अनवधानाने झालेली एखादी क्षुल्लकशी चूकही जगाला तिसºया महायुद्धापर्यंत घेऊन जाऊ शकते. मुळात उत्तर कोरियाची अण्वस्त्रे आणि क्षेपणास्त्रे अजिबात विश्वसनीय नाहीत. यापूर्वी अनेकदा त्या देशाच्या अण्वस्त्र चाचण्यांचे हवे तसे परिणाम मिळाले नव्हते, तर क्षेपणास्त्रे भरकटली होती. गत काही दिवसात मात्र त्या देशाला अपेक्षित परिणाम हाती लागल्याच्या निष्कर्षांप्रत जग पोहचले आहे. रविवारी उत्तर कोरियाने केलेल्या हायड्रोजन बॉम्बचा स्फोट एवढा जबरदस्त होता, की त्यामुळे रिश्टर स्केलवर ६.३ क्षमतेच्या भूकंपाची नोंद झाली. काही दिवसांपूर्वीच थेट अमेरिकेच्या मुख्य भूमीपर्यंत हल्ला चढविण्यात सक्षम अशा आंतरखंडीय क्षेपणास्त्राचीही उत्तर कोरियाने यशस्वी चाचणी घेतली होती. स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटच्या अहवालानुसार, अमेरिकेने १९४५ मध्ये हिरोशिमा व नागासाकीवर अणुबॉम्ब टाकल्यानंतर आतापर्यंत, उत्तर कोरियासह आणखी आठ देशांनी अण्वस्त्र क्षमता प्राप्त केली आहे. अमेरिकेनंतर सात इतर देशांनी अण्वस्त्र क्षमता प्राप्त केली तेव्हा प्रत्येक वेळी जगात खळबळ जरूर उडाली; मात्र जग अणुयुद्धाच्या काठावर पोहचल्याची भीती कधी निर्माण झाली नव्हती. उत्तर कोरियाच्या अण्वस्त्र चाचण्यांमुळे आणि विशेषत: ताज्या हायड्रोजन बॉम्बच्या चाचणीमुळे, मात्र तशी भीती व्यक्त होऊ लागली आहे. भारतासह सर्व जबाबदार अण्वस्त्रधारी देशांनी त्यांची अण्वस्त्रे प्रतिबंधक असल्याचे जाहीर केले आहे. आमच्या स्वातंत्र्य व सार्वभौमत्वाला धोका निर्माण झाला किंवा इतर कुणी आमच्यावर अण्वस्त्र हल्ला केला, तरच आम्ही आमची अण्वस्त्रे वापरू, ही त्यांची भूमिका आहे. उत्तर कोरियाचे मात्र तसे नाही. त्या देशाचा अण्वस्त्र कार्यक्रम हा जाहीररीत्या दक्षिण कोरिया, जपान आणि अमेरिकेच्या विरोधात आहे. त्या देशाचे सत्ताधीश उठसूठ अमेरिकेवर अण्वस्त्र हल्ला करण्याच्या उघड धमक्या देत असतात. विशेषत: विद्यमान सत्ताधीश किम जोंग ऊन सत्तेत आल्यापासून तर धमकीसत्रास अक्षरश: ऊत आला आहे. किम जोंग ऊनचे वडील किम जोंग इलचे वैयक्तिक स्वयंपाकी म्हणून काम केलेले जपानी बल्लवाचार्य केंजी फुजिमोटो यांच्यानुसार, किम जोंग ऊन वडिलांचीच दुसरी आवृत्ती आहे. इतर कुख्यात हुकूमशहांप्रमाणे विविध दुर्गुण आणि वाईट सवयी किम जोंग ऊनमध्ये ठासून भरलेल्या आहेत. तो अत्यंत लहरी आणि बेजबाबदार म्हणून ओळखल्या जातो. अशा हुकूमशहाच्या हाती अण्वस्त्रे व आंतरखंडीय क्षेपणास्त्रे असणे म्हणजे माकडाच्या हाती कोलीत लागण्यासारखेच आहे. रात्रभर मेजवान्यांचा आनंद लुटण्यासाठी ख्यात असलेल्या किम जोंग ऊनची मदिरेच्या अमलाखाली कधी लहर फिरेल आणि तो कधी जगाला अणुयुद्धाच्या खाईत लोटेल, याचा काहीही नेम नाही. ते होऊ द्यायचे नसेल तर अण्वस्त्र व क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाचा प्रसार रोखण्यासाठी एकत्र येण्याशिवाय आणि ज्या बेजबाबदार देशांच्या हाती हे कोलीत लागले आहे, त्यांच्या हातून ते येनकेनप्रकारेण काढून घेण्यासाठी प्रयत्न करण्याशिवाय, महासत्तांपुढे दुसरा पर्याय नाही. एकमेकांचे हिशेब चुकते करण्यासाठी, बेजबाबदार देशांच्या हाती असे तंत्रज्ञान पोहचविण्याचे उद्योग सर्वच महासत्तांना बंद करावे लागतील. अण्वस्त्र प्रसारबंदी करारास नख लावण्याचे काम अण्वस्त्रधारी महासत्तांनीच, विशेषत: चीनने, केले हे उघड सत्य आहे. हायड्रोजन बॉम्ब चाचणीनंतरही चीन उत्तर कोरियाची पाठराखण करीतच आहे. प्रगल्भतेचा सर्वथा अभाव असलेल्या देशांच्या हाती अण्वस्त्र व क्षेपणास्त्रांचे तंत्रज्ञान लागू देण्यातला धोका सगळ्याच जबाबदार देशांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. तुमचे अस्तित्वच शिल्लक राहणार नाही असा हिशेब चुकता करण्यात काय अर्थ? उत्तर कोरियामुळे अण्वस्त्र युद्ध पेटलेच, तर चीनही शिल्लक राहणार नाही. अण्वस्त्र यद्धात कुणाचाही जय होणार नाही, होईल तो केवळ मानवतेचा पराजय! ही वस्तुस्थिती सर्वच महासत्ता जेवढ्या लवकर ध्यानात घेतील, तेवढे जगासाठी बरे होईल.
माकडाच्या हाती कोलीत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2017 12:51 AM