अतुल कुलकर्णी, संपादक, मुंबई प्रिय आमदार बंधू नमस्कार, आपला दौरा कसा सुरू आहे..? मुंबईतून आपण सुरतला गेलात. सुरतमार्गे गुवाहाटीला गेलात... वाटेत फार त्रास झाला नाही ना..? आपल्यापैकी काही जणांना ॲसिडिटी झाल्याचे कळाले. तिकडे गुवाहाटीला जेलोसिल मिळते का..? वेळी-अवेळी खाणं-पिणं त्यामुळे ॲसिडिटी वाढते हे लक्षात ठेवा, खूप दिवसांनी तुम्हा सगळ्यांना टी-शर्ट, बरमुडा अशा गणवेशात पाहिले. आपले आमदार साहेब टी-शर्टमध्ये पाहून खूप बरे वाटले. सतत पांढरे कपडे घालून फिरण्यामुळे तुमच्या आयुष्यातले रंग उडून गेले की काय, असे वाटत होते. मात्र, रंगीबेरंगी टी-शर्ट पाहून आपल्या आयुष्यात पुन्हा रंग परतल्याचे समाधान आहे.
साहेब, तुमच्या विषयीच्या बातम्या रोज सकाळ, संध्याकाळ टीव्हीवर आम्ही सगळे बघत आहोत. आमची बायको म्हणाली, रजा नाही... सुट्टी नाही... किती मेहनत घेतात बघा... गावाकडून मुंबईला गेले. मुंबईहून रात्री-बेरात्री प्रवास करत सुरतला गेले... तिथून कोणाला काही कळायच्या आत गुवाहाटीला गेले... किती प्रवास करतात आपले आमदार साहेब... एक दिवस एक मिनिट सुट्टी नाही की उसंत नाही..! तिला तुमचे फार कौतुक वाटले. एवढी दगदग होत असेल तर पुढच्या वेळी निवडणूक लढवू नका, असं सांगा म्हणाली मला... साहेब, तुम्ही सगळे जिथे राहत आहात ते फाईव्ह स्टार हॉटेल आहे म्हणे... त्यात पुन्हा सुरतहून गुवाहाटीला जायला स्पेशल विमान केलं होतं म्हणे... फार खर्च येतो का साहेब त्या विमानाचा..? विमान कोणी करून दिलं त्याचा फोन नंबर घेऊन ठेवा साहेब. म्हणजे आपल्याकडे लग्नकार्याला विमान लागलं तर तो नंबर कामाला येईल... नाहीतरी आता आपल्या चिरंजीवांच्या दोनाचे चार हात करायची वेळ झाली आहे, तेव्हा तिथला केटरर... विमानवाला... सगळ्यांचे नंबर घेऊन ठेवा. पण खूप बिल येत असेल ना साहेब. लहान तोंडी मोठा घास... पण एक सांगू का साहेब...? पैसे जपून वापरा, कमी पडले तर विनासंकोच सांगा... तसे तुम्ही संकोच करत नाहीच काही मागायला... पण आता तिथं परक्या मुलखात आहात म्हणून सांगितलं... फक्त एक फोन मारा... आम्ही लगेच चंदा गोळा करून पाठवतो...! उगाच इकडे तिकडे कुणाला मागत बसू नका साहेब... शेवटी आपल्या मतदार संघाची कॉलर टाईट राहिली पाहिजे. तुम्हाला पैसे पाठवायचे म्हणून आम्ही पण थोडी जास्तीचा चंदा गोळा करून थोडे तुम्हाला पाठवू... बाकीचे आम्हाला ठेवतो... नाहीतरी तुम्ही नसल्यामुळे आमची सोय कोणी करेना झालंय...
साहेब, तुम्हा सगळ्यांना ७० खोल्या बुक केल्याचं पेपरमध्ये छापून आलं आहे... एवढ्या खोल्या म्हणजे बक्कळ बिल आलं असेल... पुन्हा प्रत्येकाच्या जेवणाचं बिल वेगळं असेल ना... सकाळी ब्रेकफास्टला तिथं कोणी बोलवतं की नाही साहेब... का ते पण पैसे घेऊनच घ्यावं लागतं..? तिथं कपडे धुवायला, इस्त्री करायला माणसं असतील ना साहेब..? इथं कसं गावाकडे मतदार संघात आपले कार्यकर्ते टकाटक कडक इस्त्री करून द्यायचे... तिथं इस्त्रीची कापडं नसतील म्हणून तर तुम्हाला टी-शर्ट घालावा लागत असेल ना... तुमचा मुक्काम लांबला तर तुमची अडचण होऊ नये म्हणून दोन-पाच कार्यकर्ते घेऊन येऊ का तिकडे साहेब...? एक मालीश करणारा... एक कपड्याला इस्त्री करणारा... एक बाकीची ‘सगळी’ व्यवस्था बघणारा... तुम्ही फक्त फोन करा साहेब... लगेच पोचतो की नाही बघा... ते शामराव सांगत होते, हल्ली मुंबईच्या विमानतळावर गेलं आणि गुवाहाटीला साहेबांकडे जायचे म्हणलं, की तिकिटाचे पैसे पण मागत नाहीत... लगेच विमानात बसवतात म्हणे.... त्यामुळे त्या खर्चाची चिंता तुम्ही करू नका. फक्त आदेश करा साहेब...
जाता-जाता एक सांगू का साहेब... तुम्ही तिकडून कार्यकर्त्यांना फोन करून बोलता... बोललेलं रेकॉर्ड करून चॅनलवाल्याला द्यायला सांगता... ते चॅनलवाले त्यांचा टीआरपी वाढवून घेतात... वेळात वेळ काढून एक-दोन फोन जरा गावातल्या बी-बियाणं विकणाऱ्या दुकानदाराला करता का..? पाऊस लांबला... पेरण्या वाया जायची वेळ आली आहे... त्यामुळे उधारीवर बियाणं आणि खतं द्यायला सांगा... पीक आलं की पैसे देईन त्याला... आजपर्यंत तुमचे पैसे कधी ठेवले नाही साहेब... तेवढं फोन करता आलं तर बघा... शाळा पण सुरू होत आहेत. पोरांना कपडे, दप्तर घ्यायचे आहेत... खर्च फार आहे... तुम्ही तिकडे किती दिवस राहणार माहिती नाही... तुमचा मुक्काम वाढला तर आमची पंचाईत होईल... त्यामुळे तिकडून दोन-चार दुकानदारांना फोन करता का साहेब...? बाकी मतदार संघाची काही काळजी करू नका... आम्ही आहोतच तुमचं सगळं सांभाळायला.... - तुमचाच, बाबूराव