- सुवर्णा साधू(चिनी राजकारण-समाजकारण यांच्या अभ्यासक)
चीन आणि भारतातला तणाव कमी होतो आहे, अशी चर्चा सध्या सुरू आहे. दोन्ही देशांतल्या पर्यटकांसाठी, जानेवारी २०२५ पासून, ९० दिवसांसाठी व्हिसा माफ करण्यात येणार असल्याची बातमी आहे. गेली चार वर्षे चिनी पर्यटकांना भारत व्हिसा देत नाही. गेली ३ वर्षे दर सहा महिन्यांनी अशा वावड्या उठतात; पण ती केवळ अफवा होती असे नंतर लक्षात येते. यंदा मात्र राजकीय नेत्यांच्या हालचाली आणि ब्रिक्स परिषदेनंतर पर्यटकांचे येणे जाणे सुरू होईल, असे वाटते आहे.
डोकलाम, अरुणाचल प्रदेश आणि लडाखमधील गलवान खोरे, यामुळे भारत आणि चीनमधील तणाव वाढला. त्यात पडलेली कोविडची भर. कोविडच्या सुरुवातीला एकूणच कुठल्याही प्रवासाला मज्जाव होता. पण हळूहळू स्थिती बदलली आणि आंतरदेशीय प्रवासपण सुरू झाला. चीनने भारतीय नागरिकांना व्हिसा देण्यास सुरुवात केली. पण भारताने चिनी पर्यटकांवर बहिष्कार टाकला. हा बहिष्कार केवळ चिनी प्रवाशांकरताच होता. याच चार वर्षांत भारत आणि चीनच्या व्यापाराने मात्र उच्चांक गाठला. दोन्ही देशांतल्या व्यापाराने शंभर अब्ज डॉलर्सचा आकडा कधीच ओलांडला आहे. दोन्ही देश उत्पादने आणि सामग्रीसाठी एकमेकांच्या बाजारपेठांवर अवलंबून असल्याने व्यापार वाढतोच आहे. व्यापाराचे फायदे काहीवेळा राजकीय तणावापेक्षा जास्त असू शकतात. पण चिनी प्रवाशांना व्हिसा दिला जात नव्हता.
पर्यटन हा देशासाठी भरपूर परकीय चलन कमावून देणारा उद्योग. चीनच्या पर्यटकांना व्हिसा नाकारून, भारत या चलनाला फार मोठ्या प्रमाणात मुकला आहे. चीन आणि भारत, सर्वात जास्त लोकसंख्या असलेले देश आणि जागतिक स्तरावर सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्था; पर्यटन व्यवसायाला आकार देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. दोन्ही देशांतले आर्थिक सहकार्य, म्हणजे व्यापार, भागीदारी आणि सांस्कृतिक देवाणघेवाण, पर्यटनाला प्रोत्साहन देते. पर्यटनामुळे सांस्कृतिक संबंध मजबूत होतात आणि प्रादेशिक अर्थव्यवस्थांना चालना मिळते. या उद्योगाला पूरक असे अनेक जोडव्यवसाय उभे राहतात. त्याचबरोबर आदरातिथ्य आणि वाहतूक क्षेत्रात नोकऱ्यापण उपलब्ध होतात. भारत-चीनमधले पर्यटन कोविड-पूर्व काळात जोरात सुरू होते, ज्यामुळे पर्यटनाशी संबंधित पायाभूत सुविधांमध्ये सीमापार गुंतवणुकीत सकारात्मक वाढ झाली, आणि दोन्ही राष्ट्रांमध्ये रोजगार आणि विकासाला हातभार लागला.मात्र गेली चार वर्षे हा विकास ठप्प आहे. अनेक ठिकाणी चीनमधून आयात केलेली अनेक यंत्रे तशीच पडून आहेत. यंत्रे आयात झाली; पण त्यांना चालवणारे इंजिनिअर्स किंवा असेम्बल करणाऱ्या चिनी लोकांना व्हिसाच मिळाला नाही. चिनी दुभाषी भाषांतर करतात; पण कारखानदार त्यानुसार धोका पत्करायला तयार नसतात, यंत्र निकामी झाले तर?..
भारत पहायला येणाऱ्या चिनी लोकांची संख्या कोविड-पूर्व काळात खूप मोठी होती. एक तर त्या मानाने भारतातला प्रवास स्वस्त, येण्या-जाण्याला लागणारा वेळ कमी, भारत एक मोठी बाजारपेठ, त्यामुळे इथे भरणाऱ्या प्रदर्शनांमध्येही चिनी कंपन्यांचा मोठा सहभाग असे. चिनी जेवण, चिनी बोलणारे गाइड मिळण्याची सुविधा, स्वतःच्या बजेटमध्ये राहण्या-फिरण्याची सुविधा, ताजमहाल, देवळे, महाल, वाघ आणि भगवान बुद्धाची देव-भूमी म्हणून चिनी पर्यटकांचे लोंढेच्या लोंढे भारत पर्यटनासाठी येत असत.
चिनी पर्यटकांना नेहमीच चिनी बोलणारा गाइड लागतो. केवळ चिनी भाषिक पर्यटकांना सगळ्या सोयी उपलब्ध करून देण्यासाठी अनेक प्रवास कंपन्यांचा उगम झाला. गेल्या चार वर्षांत भारत-चीन पर्यटनावर अवलंबून असलेल्या अनेक कंपन्या बंद झाल्या. केवळ भारतातच नव्हे तर चीन आणि हॉंगकॉंगमध्येदेखील. बेरोजगारीत या लोकांचीही भर पडली. अस्सल चिनी जेवण देणारी हॉटेल्स अपवादवगळता बंद पडली. खास चिनी पर्यटकांसाठी चहा आणि इतर गोष्टी विकणारी दुकानेही बंद पडली.
कोविडपूर्वी चिनी माणसांमध्ये भारतीय पारंपरिक कला, पाककृती आणि सणांचे कुतूहल होते. त्यामुळे पर्यटन वाढले. याउलट, राजकीय तणावांमुळे बहिष्कार टाकण्याची भावना अधिक दृढ झाली. एकूणच वाढलेल्या तणावपूर्ण संबंधांमुळे अनेक लोक बेरोजगार झाले आणि अर्थव्यवस्थेवरदेखील याचा परिणाम झाला. या तणावांचा पर्यटन उद्योगातील आणि चीनबरोबर इतर उद्योगांमधल्या गुंतवणुकीवरही परिणाम झाला आहे.
जानेवारीपासून ९० दिवसांसाठी किती पर्यटक, उद्योजक भारतात येऊ शकतील, हे सांगणे कठीण आहे. चिनी व्यापारी प्रचंड संख्येने सहभागी होत असलेली अनेकविध प्रदर्शने याच दिवसांत भारतभर भरतात. याच दिवसांत चिनी नववर्ष दिन असतो, जेव्हा चिनी प्रचंड संख्येने भारत फिरण्यास येत असत. एवढ्या थोड्या वेळात किती लोक भारतात येतील? ऑक्टोबर ते जानेवारी हे भारत पर्यटनाचे मौल्यवान महिने आपण गमावले आहेत. व्हिसा माफीच्या घोषणेला उशीर झाल्याने याचा किती लाभ होईल हे सांगणे कठीण आहे. ९० दिवसांनंतर परत कोणते धोरण अवलंबिले जाईल ह्याची शाश्वती नसल्यामुळे पर्यटन व्यवसायातल्या लोकांमध्ये आणि चीनबरोबर काम करणाऱ्या उद्योजकांमध्ये हवा तेवढा उत्साह सध्यातरी दिसत नाही.( suvarna_sadhu@yahoo.com)