शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगे-उदय सामंतांची पुन्हा भेट! राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण; सामंत म्हणाले...
2
वरळीतून मिलिंद देवरांच्या उमेदवारीला शिवसैनिकांचा विरोध; "आम्हाला स्थानिकच आमदार हवा..." चा नारा
3
उद्धव ठाकरे गटाची दुसरी यादी आली; कणकवलीत नितेश राणेंविरोधात 'शॉकिंग' उमेदवार
4
"ताईचे पराक्रम..."; जयश्री थोरातांबाबत आक्षेपार्ह विधान, सुजय विखे म्हणतात, "ते ऐकत नसल्याने..."
5
Jio युजर्सना दिवाळी गिफ्ट! 3350 रुपयांचा मोफत लाभ, जाणून घ्या सविस्तर...
6
Test Record : घरच्या मैदानात ३००+ धावांचा पाठलाग करताना कसा आहे टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
7
केवळ १५ वर्षांत बनाल Millionaire, हा फॉर्म्युला वापरा; २५ व्या वर्षी गुंतवणूक कराल तर, ४० व्या वर्षी व्हाल मालामाल
8
इराणवरच नाही, तर इस्रायलचा इराकवरही हल्ला; एअर डिफेन्स सिस्टिम उडविल्या, कारण काय? 
9
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला,अनेक शहरांवर बॉम्बवर्षाव, इराण प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
10
"१९६७ ला माझ्या बापाने बंडखोरी केली, आमदार झाले; आम्ही काय बंडखोरीच करायची का..?"
11
भारत-चीन सीमेवर दाेन्ही सैन्य माघारीस सुरुवात; २८-२९ ऑक्टाेबरपर्यंत प्रक्रिया हाेणार पूर्ण!
12
'आमी जे तोमार'वर नृत्य करताना स्टेजवर कोसळली विद्या बालन, पुढे घडलं असं काही की सर्वांनी केलं कौतुक
13
Diwali Astro 2024: ही दिवाळी अडलेल्या कामांना गती आणि प्रगती देणारी; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
14
५ ग्रह गोचराने अद्भूत योग: ८ राशींचा भाग्योदय, सुख-समृद्धी; धनलाभ, लक्ष्मी-नारायण शुभ करतील!
15
जान्हवी बिग बॉसमध्ये वापरलेल्या १०० कपड्यांचा लिलाव करणार? अभिनेत्रीने खरं काय ते सांगितलंच! म्हणाली-
16
ना ओटीपी, ना पिन, केवळ Aadhaar नंबरद्वारे झटपट काढता येतील पैसे; सोपी आहे पद्धत
17
घोळ संपेना! मविआचा नवा फॉर्म्युला, तिघांना प्रत्येकी ९० जागा; १८ जागा मित्र पक्षांना
18
मस्का की मस्करी? जगाला ऊठसूट लोकशाही मूल्यांचा डोस देणाऱ्या अमेरिकेत चाललंय काय?
19
विशेष लेख: वाट्टेल ते करून लग्न करा, मूल जन्माला घाला! जन्मदर वाढविण्यासाठी नवीन टूम!
20
भ्रष्टाचार निर्मूलन: संवेदनशील सत्यनिष्ठा हवी! काम लवकर होण्यासाठी 'किड' वाढवू नका!

मस्का की मस्करी? जगाला ऊठसूट लोकशाही मूल्यांचा डोस देणाऱ्या अमेरिकेत चाललंय काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2024 8:01 AM

सध्या प्रचाराचा जोर ‘स्विंग स्टेट्स’ म्हणून ओळखल्या गेलेल्या राज्यांवर केंद्रित झाला आहे.

जगातील सगळ्यात प्राचीन लोकशाही असणाऱ्या अमेरिकेत तेच सुरू आहे, जे जगातील सर्वांत महाकाय लोकशाही असलेल्या भारतासमोरील मोठे आव्हान आहे! महाराष्ट्रातील ‘लाडकी बहीण’ योजना थांबविण्याची वेळ निवडणूक आयोगावर आली, तर अमेरिकेत मतदारांना ‘मस्का’ लावला जात असताना कायदा काय करणार, हा प्रश्न उभा ठाकला आहे. ५ नोव्हेंबरला अमेरिकेत अध्यक्षपदासाठी मतदान होत आहे. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आणि माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार तसेच विद्यमान उपाध्यक्ष कमला हॅरिस यांच्यात अंतिम लढत होत आहे.

सध्या प्रचाराचा जोर ‘स्विंग स्टेट्स’ म्हणून ओळखल्या गेलेल्या राज्यांवर केंद्रित झाला आहे. निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात ही केवळ राजकीय लढत न राहता त्याला मोठे आर्थिक परिमाण लाभलेले दिसत आहे. टेस्ला आणि स्पेसएक्स या कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी इलॉन मस्क यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या पाठीमागे आपली ताकद उभी केली आहे, तर कमला यांना उद्योगपती बिल गेट्स यांचे पाठबळ लाभलेले आहे. मस्क मतदारांना अगदी थेटपणे मस्का लावत असल्याचे चित्र अमेरिकेत दिसत आहे. गेट्सही फार मागे नाहीत.

निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात मतदारांना अशा प्रकारे आर्थिक ताकद वापरून प्रभावित करणे गैर असल्याच्या मुद्द्यावरून तेथे वादही निर्माण झाला आहे. इलॉन मस्क यांनी त्यांच्या सुपर पीएसीच्या माध्यमातून दररोज एक दशलक्ष डॉलरची लॉटरी जाहीर केली आहे. स्विंग स्टेट्समधील मतदार नोंदणी उपक्रमाविषयीच्या याचिकेला पाठिंबा देणाऱ्या नोंदणीकृत मतदारांना त्याचा लाभ मिळणार आहे. वास्तविक अमेरिकेतील कायद्यानुसार अशा प्रकारे मतदारांना आर्थिक लालूच दाखवून प्रभावित करणे चुकीचे आहे, पण मस्क यांनी आपल्या योजनेचे समर्थन केले आहे. आपला हा उपक्रम अनोखा असून त्यातून मतदारांमध्ये जागृती निर्माण करण्यास मदत होत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच अमेरिकेला नावीन्याचा ध्यास असलेल्या नेतृत्वाची गरज आहे आणि ट्रम्प ते जाणतात, असे मस्क यांनी म्हटले आहे.

मस्क यांच्या या योजनेचा लाभ फ्लोरिडा, मिशिगन आणि पेंसिल्वेनिया या राज्यांतील मतदारांना होणार आहे. ही राज्ये प्रामुख्याने स्विंग स्टेट्स म्हणून ओळखली जातात आणि तेथील मतदार अध्यक्षीय निवडणुकीत निर्णायक भूमिका बजावतात. अर्थात, मस्क यांनी ट्रम्प आणि मतदारांना जो मस्का लावण्याचा प्रकार चालवला आहे, तो काही उदात्त हेतूने प्रेरित नाही. ट्रम्प निवडून आल्यास एका मोठ्या ‘एन्क्रिप्टिंग टूल’चा डेटा आपल्याला मिळावा आणि त्यातून आपला व्यावसायिक लाभ व्हावा, अशी मस्क यांची योजना आहे.

याउलट बिल गेट्स यांनी आपली आर्थिक ताकद कमला यांच्या बाजूने उभी केली आहे. गेट्स यांनी ट्रम्प यांच्या विज्ञानविषयक धोरणांवर टीका केली आहे. जागतिक हवामानबदल, आरोग्यसेवा आणि शिक्षण आदी क्षेत्रांतील ट्रम्प यांची धोरणे अयोग्य असल्याचे गेट्स यांनी म्हटले आहे. देशाचे प्रशासन विज्ञानवादी नेत्यांच्या हाती असावे, असे गेट्स यांचे मत आहे. त्या दृष्टीने त्यांनी हॅरिस यांना पाठिंबा दिला आहे. गेट्स यांनी एका स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून हॅरिस यांच्या प्रचारार्थ ५० दशलक्ष डॉलरची मदत केली आहे.

नुकत्याच झालेल्या काही निवडणूक कल चाचण्यांनुसार, स्विंग स्टेट्समधील ‘नक्की कोणाला मतदान करायचे’, हे अद्याप न ठरवलेल्या मतदारांची आकडेवारी देशातील एकूण मतदारांच्या तुलनेत सात ते आठ टक्के आहे. हे मतदार उमेदवाराचे भवितव्य ठरवू शकतात. कल चाचण्यांनुसार डेमोक्रॅटिक पक्षाच्या नोंदणीकृत मतदारांमध्ये हॅरिस यांना ५८ टक्क्यांचा भक्कम पाठिंबा आहे, पण स्विंग स्टेट्समधील स्वतंत्र विचारांच्या मतदारांत त्यांना फारसा पाठिंबा नाही. स्विंग स्टेट्समधील अशा मतदारांची टक्केवारी २० ते २५ टक्के आहे.

गेट्स यांनी देऊ केलेल्या निधीतून हॅरिस यांना या प्रदेशात अधिक प्रभावी प्रचार करणे शक्य होणार आहे. अमेरिकेसारख्या प्रगत देशातील लोकशाहीमध्ये मतदारांना प्रभावित करण्यासाठी अशा प्रकारे धनदांडग्यांनी मैदानात उतरणे हा मुद्दा वादाचा बनला आहे. त्यामुळे आता ही निवडणूक ट्रम्प विरुद्ध हॅरिस अशी न राहता मस्क विरुद्ध गेट्स अशी बनली आहे. अनेक कायदेतज्ज्ञांच्या मते, मतदारांवर आर्थिक प्रभाव पाडण्यात आल्याचे सिद्ध झाल्यास उमेदवारांना गंभीर न्यायालयीन लढ्याला सामोरे जावे लागू शकते. जगाला ऊठसूट लोकशाही मूल्यांचा डोस देणाऱ्या अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत चाललेला हा प्रकार अनुकरणीय नाही. मतदारांना लावण्यात येत असलेला हा ‘मस्का’ लोकशाहीची मस्करी आहे!

टॅग्स :US ElectionAmerica ElectionKamala Harrisकमला हॅरिसDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाBill Gatesबिल गेटसelon muskएलन रीव्ह मस्क