शिक्षणाने मानवी मनावर चांगले संस्कार घडतात. विचारांमध्ये प्रगल्भता येते. माणसाची मनोवृत्ती बदलण्याची शक्ती ज्ञानात आहे. माणसाला चांगल्या-वाईटाची ओळख होते ती शिक्षणामुळेच. म्हणून प्रत्येकाने शिक्षण घेतलेच पाहिजे, असे अनेक विद्वानांनी सांगितले असले तरी शिक्षण न घेतल्याने काय अडते? असा विचार करणाराही एक वर्ग समाजात आहेच. त्याचे शिक्षणाशी काही देणेघेणे नाही. काही लोक असेही असतात ज्यांच्या डोक्यात फार उशिरा प्रकाश पडतो. आणि मग ते वेळकाळ न बघता पाटी-पेन्सिल हाती घेतात. शिक्षणाचे महत्त्व कुणाला आणि केव्हा पटेल हे सांगता येत नाही. आता हेच बघा ना ! हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांना तुरुंगात गेल्यावरच शिक्षणाचे महत्त्व कळले. सहस्रचंद्रदर्शनानंतर त्यांनी बारावीची परीक्षा दिली आणि उत्तीर्णही झाले. तेसुद्धा प्रथम श्रेणीत. तिहार तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या चौटालांनी नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ ओपन लर्निंगमधून बारावीचे शिक्षण घेतले. खास बात म्हणजे त्यांना ज्या घोटाळ्यात दहा वर्षांची शिक्षा झाली तोसुद्धा शिक्षण विभागाशी संबंधितच आहे. शिक्षक भरती प्रकरणात ते दोषी सिद्ध झाले होते. तुरुंगात गेल्यापासून चौटाला यांची शिक्षणाची ओढ फारच वाढली असल्याचे समजते. त्यामुळेच कारागृहातील हे दिवस सार्थकी लावण्याचे त्यांनी ठरविले आहे, असे म्हणतात. तुरुंगातील ग्रंथालयात ते नियमित जातात. पुस्तके वाचतात आणि तीही जगातील महान नेत्यांच्या जीवनावर आधारित. वयाच्या मावळतीला असताना शिक्षणाचे महत्त्व एवढ्या तीव्रतेने जाणवणे ही शिक्षण क्रांतीच म्हणायची. विशेष म्हणजे ते बारावीपर्यंत शिक्षण घेऊनच थांबणार नसून पदवीचे शिक्षण पूर्ण करण्याचाही त्यांचा मानस आहे. अर्थात यामागे त्यांचा राजकीय हेतू असल्याचे नाकारता येत नाही. त्याचे कारण असे की, आता हरियाणा सरकारने पंचायत निवडणुकीसाठी उमेदवाराच्या शिक्षणाची पात्रता निश्चित केली आहे आणि पुढील काळात विधानसभेसाठीही उमेदवार पदवीधर असावा, असा नियम करण्याचा तेथील सरकारचा विचार आहे. असे झाल्यास आपल्यावर निवडणुकीच्या राजकारणापासून वंचित राहण्याची वेळ येऊ नये यासाठीची ही तजवीज असू शकते. ते काहीही असो ! उशिरा का होईना हे शहाणपण त्यांना आले हे महत्त्वाचे. एरवी १९८९ साली त्यांचे वडील चौधरी देवीलाल उपपंतप्रधान असतानाही त्यांना शिक्षणाचे महत्त्व कळले नव्हते. ते कळले असते तर कदाचित शिक्षण क्षेत्राचे पावित्र्य राखण्यासाठी तरी त्यांनी शिक्षक भरती घोटाळा केला नसता.
भाष्य - चौटालांची तुरुंगक्रांती
By admin | Published: May 30, 2017 12:29 AM